तुरळचा शिमगा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेल्या तुरळ या गावात यंदा असाच शिमगा रंगला. आणि तो सगळा अनुभवण्याची संधी मिळाली. - आशुतोष बापट

तुरळचा शिमगा

गणपती उत्सव आणि शिमगा म्हणजे कोकणी माणसाचा जीव की प्राण असतो. कामानिमित्त कुठेही असला तरी या दोन सणांना तो हमखास गावी येतोच येतो. होळी असा शब्द सगळीकडे वापरत असले तरी कोकणात शिमगा हाच शब्द सर्वत्र वापरला जातो. कोकणातला शिमगा चांगला आठवडाभर चालतो. फाल्गुन त्रयोदशीपासून गावोगावी शिमग्याची धामधूम सुरु होते. प्रत्येक गावची होळी वेगवेगळ्या दिवशी असते. इकडे अनेक गावांतून दुपारी होळी पेटवतात. तर काही ठिकाणी रात्री असते. शिमगा म्हणजे नुसती होळी नाही तर त्याच्याजोडीने नमन, खेळे, रोंबाट, सोंगे असे वेगवेगळे खेळ सुद्धा असतात. कोकणातसुद्धा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वेगवेगळे खेळ खेळले जातात. प्रत्येक जिल्ह्याची खेळाची एकेक खासियत आहे. पण शिमग्याची ग्रामदेवतेची पालखी हा महत्त्वाचा प्रकार सगळ्या कोकणात दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालख्या फिरवत नाहीत तर इकडे खांब, तळीचे निशाण आणि रोंबटे असतात. पण रत्नागिरी जिल्ह्यात मात्र खेळवल्या जाणाऱ्या पालख्या हा सोहळा बघण्याजोगा असतो.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेल्या तुरळ या गावात यंदा असाच शिमगा रंगला. आणि तो सगळा अनुभवण्याची संधी मिळाली. फाल्गुनात उन्हाची तलखी वाढत असली तरीही पळस, पांगारा लालेलाल झालेला. आंबा काजूच्या मोहोराने सगळा आसमंत दरवळत असलेला. तुरळ गावचे खोत असलेल्या नितीन आणि शिल्पा करकरे यांच्या मामाच्या घरी हा सगळा सोहळा अनुभवता आला. त्रयोदशीपासून सुरु झालेला हा सोहळा. फाल्गुन वद्य द्वितीयेला ग्रामदेवतेची पालखी खोतांच्या घरी येते. पालखी मध्ये वरदायिनी, चंडकाई, धावडेश्वर अशा ग्रामदेवतांचे चांदीचे मुखवटे बसवलेले असतात. वर्षभर भक्त देवाच्या भेटीला मंदिरात जात असतो. आज शिमग्याला मात्र हे देव पालखीतून प्रत्येक घरी भक्ताला दर्शन देण्यासाठी येतात. किती सुंदर भावना आहे ही. ही पालखी गावातल्या प्रत्येक घरात जाऊन काही क्षण विसावते. आज खोतांच्या घरी पालखी येणार म्हणजे देवच येणार की आपल्या घरी. मग त्याच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातलेल्या, सगळं अंगण सारवलेलं, पालखी जिथे बसणार तिथे गालीचा घालून त्यावर फुलांची सजावट केलेली.

तासाभराने दूरवरून ढोलाचे आवाज ऐकू येतात. त्यापाठोपाठ गावकरी पालखी घेऊन येतात. घराचे यजमान पुढे होऊन पालखी खांद्यावर घेतात. सगळा लवाजमा खळ्यात येतो. घरच्या सुवासिनी पालखी घेऊन येणाऱ्यांचे पाय दूध-पाण्याने धुतात. पालखीचे खूर पाण्याने धुवून पुसून घेतले जातात. पालखी घरातल्या गोपालकृष्ण मंदिरात स्थानापन्न होते. खोतांच्या घरी आलेल्या पालखीचा सोहळा पण तितकाच दिमाखदार असतो. पालखीची साग्रसंगीत पूजा होते. गोडाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. मोठमोठ्याने आरत्या होतात. सनई, तुतारी, ढोल, घंटा वाजवल्या जातात. खोतांकडून ग्रामदेवतांची ओटी भरली जाते. मग सगळे मोठ्या खळ्यात जमतात. गावकरी आता पालखी उचलून खळ्यात आणतात. पुन्हा एकदा ढोल वाजायला सुरुवात होते आणि मग पालखी नाचवण्याचा खेळ सुरु होतो. गावातला जवळजवळ प्रत्येक जण काही सेकंद का होईना पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचतो. सगळेच पालखी नाचवण्यात तल्लीन. सगळीकडे एकाच जल्लोष. खोत म्हणजे गावातले मोठे मानकरी. त्यांच्या अंगणात पालखी बराच वेळ नाचवतात. सगळा सोहळा जवळजवळ दीड तास चालतो. मग पालखी पुढे गावातल्या घरात जाण्यासाठी रवाना होते. ढोलाचे आवाज आता मंद होतात. काही काळ पालखी घरात विसावून पुढे गेलेली असते. घरी पालखी येणे हा शिमगोत्सवातला सर्वोच्च प्रसंग. काहीकाळ विसावलेल्या पालखीच्या खुणा पुढे वर्षभराची उर्जा देऊन जातात.

खरंतर कोकणातल्या गावोगावी पालखी सोहळा असतो. प्रत्येक गावाची प्रथा निराळी. पण ग्रामदेवतेवर असलेली अपार श्रद्धा आणि परंपरा जोपासण्यासाठी सगळा गाव एकत्र येऊन करत असलेला हा सोहळा मोठा रमणीय असतो. विकास आणि प्रगतीच्या ओघात आजही या जुन्या रूढी-परंपरा कोकणात मोठ्या उत्साहात जपल्या जातात. सगळा गाव एकत्र येऊन या उत्सवात सामील होतो. तुरळसारखी कोकणातली कित्येक गावे सध्या शिमगा अनुभवताहेत. प्रत्येकाने एकदा तरी या शिमगोत्सवात सहभाग घ्यायला हवा. आपल्या प्राचीन रूढी-परंपरा अनुभवायला हव्यात. ज्यांची घरे कोकणात आहेत त्यांना ही सुवर्णसंधी मिळतेच, पण ज्यांचे कोकणात काही धागे नाहीत अशांनी शिमग्याला तुरळसारख्या ठिकाणी जाऊन मुद्दाम या उत्सवात सहभागही व्हायला हवे. काही क्षण का होईना ही परंपरेची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचायला हवे.

- आशुतोष बापट