सोमेश्वर - राजवाडी येथील दुमजली गाभाऱ्याचे मंदिर

कोकणात जसे अनेक निसर्गचमत्कार किंवा आगळ्यावेगळ्या मूर्ती बघायला मिळतात तसेच एक अगदी वेगळे मंदिर बघण्यासारखे आहे. ते काहीसे आडबाजूला तर आहेच परंतु त्या मंदिराचे वेगळेपण माहिती नसल्यामुळे ते पाहिलेच जात नाही. - आशुतोष बापट

सोमेश्वर - राजवाडी येथील दुमजली गाभाऱ्याचे मंदिर

मंदिरांचे निरनिराळे प्रकार आपल्याला भारतभर सगळीकडे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या शैली विकसित झाल्या आणि त्या त्या शैलीची मंदिरे देशभर सर्वत्र बांधली गेली. उत्तर भारतात दिसणारी नागर शैली, दक्षिणेकडची द्राविड शैली, ओडिशामध्ये दिसणारी नागर शैलीचीच एक शाखा असलेली कलिंग शैली. अशा निरनिराळ्या पद्धतीची मंदिरे आपल्याकडे आहेत. महाराष्ट्रात जुन्या मंदिरांना सरसकट हेमाडपंती मंदिर म्हटले जाते. खरेतर ती मंदिरे म्हणजे शुष्कसांधी मंदिरे आहेत. म्हणजे त्यांच्या बांधकामात कुठेही चुना किंवा तत्सम कोणतेही जोडणारे रसायन वापरलेले नाही. एकात एक दगड गुंतवून ही मंदिरे बांधली गेली आहेत.

कोकणात जसे अनेक निसर्गचमत्कार किंवा आगळ्यावेगळ्या मूर्ती बघायला मिळतात तसेच एक अगदी वेगळे मंदिर बघण्यासारखे आहे. ते काहीसे आडबाजूला तर आहेच परंतु त्या मंदिराचे वेगळेपण माहिती नसल्यामुळे ते पाहिलेच जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरजवळ मुंबई-गोवा महामार्गावर राजवाडी नावाचे गाव आहे. या राजवाडीला गरम पाण्याचे सुंदर कुंड आहे. इथे जमिनीतून येणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्याला कुंड बांधून बंदिस्त केलेले आहे. अगदी सुंदर असे हे कुंड, याच्या चारही बाजूंनी दगडी चिऱ्याचे बांधकाम केलेले दिसते. मुख्य रस्त्यापासून इथे जाण्यासाठी अतिशय सुंदर पाखाडी बांधून काढलेली आहे. या गरम पाण्याच्या कुंडाच्या शेजारीच एक सुंदर कौलारू मंदिर उभे आहे. या मंदिराला मोठे आवार असून त्याच्या चारही बाजूंनी याला तट बांधलेला आहे. पूर्वेकडच्या बाजूला एक उंच आणि अतिशय देखणी अशी दीपमाळ पाहायला मिळते. दीपमाळेच्या समोरून मंदिरात गेल्यावर एक प्रशस्त आणि उघडा सभामंडप बांधलेला आहे. त्याला तीन बाजूंनी बसायला कट्टे बांधले आहे. सभामंडपात लाकडी खांब असून ते लाकडी खांब आणि त्याच्या वर असलेल्या तुळया लाकडी कोरीव कामाने सजवलेल्या आहेत. बारीक कलाकुसर केलेले कोरीव काम आवर्जून पाहावे असे आहे. यात घोडेस्वार, मारुती, युद्धप्रसंग अशी चित्रे कोरलेली आहेत. परंतु या सर्वात अत्यंत वेगळे आणि देखणे चित्र कोणते असेल तर ते गंडभेरुंड या पक्षाचे. हा एक काल्पनिक पक्षी आहे. याला एक धड आणि दोन तोंडे असतात. कर्नाटक राज्याच्या परिवहन बसेसवर याचे चित्र पाहायला मिळते. म्हैसूरच्या राजांचे हे राजचिन्ह होते. या पक्ष्याच्या दोन चोचीत दोन आणि त्याच्या दोन पायात दोन असे चार हत्ती त्याने धरलेले दाखवले आहेत. हत्ती हे संपत्ती, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कोणती राजवट स्वतःला इतरांपेक्षा वरचढ दाखवण्यासाठी पायात हत्ती धरलेल्या या गंडभेरुंड पक्ष्याचे चित्र दाखवत असत. तुमच्या समृद्धीपेक्षा आम्ही सरस आहोत हे दाखवण्यासाठी हे चित्र कोरले जाई. कर्नाटकात बनवासी इथे या पक्ष्याचे अत्यंत देखणे शिल्प पाहायला मिळते.

इथून काही पायऱ्या चढून आपण दुसऱ्या मंडपात प्रवेश करतो. या मंडपाच्या दगडी प्रवेशद्वाराला सुंदर अशा द्वारशाखा कोरलेल्या आहेत. बाजूला घोड्याची तोंडे कोरलेली दिसतात. अशीच घोड्याची तोंडे राजापूर इथल्या धूतपापेश्वर मंदिर आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या मंदिरांच्या दाराच्या बाजूला कोरलेली पाहायला मिळतात. या मंडपातसुद्धा लाकडी खांब, त्यावर असलेल्या कोरीव तुळया पाहायला मिळतात. समोरच नंदी विराजमान आहे. त्याच्या मागे मंदिराचा काही भाग पाहायला मिळतो. स्थानिक सांगतात की हा मंदिराच्या कळसावरचा कलश आहे. नंदीच्या पुढे या मंदिराचे वैशिष्ट्य पाहायला मिळते ते म्हणजे इथे एकावर एक असलेले दोन गाभारे ! नंदीच्या पुढे चार पायऱ्या उतरून खालच्या गाभाऱ्यात शिवपिंडी ठेवलेली आहे. याला सोमेश्वर असे म्हणतात.

सोमेश्वर, आमलेश्वर, सप्तेश्वर, कर्णेश्वर ही शिवलिंगे पांडवांनी स्थापन केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा. खालच्या गाभाऱ्यातून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी छोट्या ३ पायऱ्या खोदलेल्या आहेत. याच्यावर दुसरा गाभारा आहे. त्यात उजव्या हातात नाग धारण केलेली गणपतीची मूर्ती विराजमान आहे. एकावर एक असे दोन गाभारे असलेले हे अत्यंत दुर्मिळ मंदिर म्हणावे लागेल. इतके सुंदर आणि रम्य असे हे मंदिर अवश्य पाहिले पाहिजे. मंदिर परिसर अतिशय रम्य आहे. पाठीमागे भवानीगड नावाचा किल्ला जणू या मंदिराची पाठराखण करतो आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी तुरळ-कडवई मार्गे रस्ता जातो. तसेच राजवाडी इथून सुद्धा जंगलातून या किल्ल्यावर जाता येते. या किल्ल्यावर असलेली भवानी आणि या मंदिरातला सोमेश्वर ही या परिसरातली महत्त्वाची दैवते समजली जातात. आजूबाजूला गर्द झाडी, त्यात अनेक विविध जातींचे पक्षी, मंदिरासमोरची देखणी दीपमाळ, शेजारीच गरम पाण्याचे कुंड असा हा सगळाच परिसर फार सुंदर आहे. कधीतरी पौर्णिमेच्या रात्री या रहाळात मुक्कामाला यावे. इथली शांतता अनुभवावी. आडवाटेवरच्या या आगळ्यावेगळ्या मंदिराला आवर्जून भेट द्यावी.

- आशुतोष बापट