वेट्टूवनकोविल - दक्षिणेतील कैलास लेणे
वेरूळच्या कैलास मंदिराचे लहान रूप शोभेल असे हे स्थापत्य. चेन्नईच्या दक्षिणेला ५५० कि.मी. वर थोट्टूकुडी जिल्ह्यात कलुगमलई गावी हे स्थापत्य बघायला मिळते.
वेरुळचे कैलासलेणे म्हणजे मंदिर स्थापत्यातील एक अद्भुत प्रकार समजला जातो. एकाच दगडातून खोदून काढलेले हे मंदिर.
तसेच आधी कळस मग पाया या नात्याने वरपासून खालीपर्यंत निर्माण केलेले हे स्थापत्य. अवघ्या जगाचे पाय हे नवल बघायला वळतात.
एकाश्म मंदिरे किंवा एकाच दगडात खोदून निर्माण केलेली मंदिरे आपल्याला तामिळनाडूमध्ये सुद्धा बघायला मिळतात.
महाबलीपुरम इथे असलेली रथमंदिरे हे त्याचेच एक उदाहरण. याच तामिळनाडूमध्ये अजून एक असेच सुरेख एकाश्म मंदिर निर्माण केलेले आहे.
वेरूळच्या कैलास मंदिराचे लहान रूप शोभेल असे हे स्थापत्य. चेन्नईच्या दक्षिणेला ५५० कि.मी. वर थोट्टूकुडी जिल्ह्यात कलुगमलई गावी हे स्थापत्य बघायला मिळते.
इ.स.च्या ८ व्या शतकात पांड्य राजवटीमध्ये या एकाश्म शिवमंदिराची निर्मिती झाली. कलुगमलई इथे असलेल्या डोंगराच्या पूर्वेकडील भागात जवळजवळ २५ फूट खोलीचा एक खडक आधी सुटा केलेला दिसतो आणि त्या खडकातून हे मंदिर खोदून काढले.
याच्या चहूबाजूंनी फिरून हे स्थापत्य बघता येते. अभ्यासकांच्या मते हे स्थापत्य अर्धवट राहिलेले आहेम कारण याचा वरचा भाग खूपच सुबक आणि सुडौल असा झालेला असून तळाकडचा भाग अर्धवट राहिलेला दिसतो.
या शिव मंदिरावर शिवाच्या तसेच विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. इतिहास अभ्यासक शिवराममूर्ती यांच्या सांगण्यानुसार इथे असलेली शिवाची एक मूर्ती अद्वितीय आहे. या मंदिरावर शिवाची दक्षिणामूर्ती असून, इथे शिव मृदंग वाजवताना दाखवलेला आहे. मृदंग वाजवणारी दक्षिणामूर्ती अन्यत्र कुठेही दिसत नाही असे शिवराममूर्ती म्हणतात.
याच डोंगराच्या वरच्या बाजूला काही जैन मूर्तींचे शिल्पांकन केलेले दिसते. जैन शिल्पपट इथल्या खडकावर कोरलेले दिसून येतात. डोंगराच्या पायथ्यापासून इथपर्यंत जाण्यासाठी दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत. पांड्य राजा परांतक नेतुंजयन याच्या कारकिर्दीत निर्माण झालेले हे शिवमंदिर आणि बाजूलाच असलेले जैन शिल्पपट तामिळनाडूच्या स्थापत्यवैभवात मोलाची भर घालतात.
- आशुतोष बापट