चंदखुरी - कौसल्येचे माहेर

कौसल्या एकुलती एक मुलगी असल्याने राजा भानुमंतच्या नंतर या राज्याची जबाबदारी राजा दशरथावर आली. पुढे जेव्हा रामाला वनवासात जावे लागले तेव्हा त्याचा बराच काळ याच कोसल प्रांताचा भाग असलेल्या दंडकारण्यात गेला.

चंदखुरी - कौसल्येचे माहेर

छत्तीसगड म्हणजेच रामायणकालीन दक्षिण कोसल प्रदेश. या प्रदेशाचा राजा होता भानुमंत. याची एकुलती एक कन्या होती कौसल्या. होय तीच कौसल्या जी अयोध्येचा राजा दशरथाची पत्नी, आणि प्रभू रामचंद्रांची माता. कौसल्या एकुलती एक मुलगी असल्याने राजा भानुमंतच्या नंतर या राज्याची जबाबदारी राजा दशरथावर आली.

पुढे जेव्हा रामाला वनवासात जावे लागले तेव्हा त्याचा बराच काळ याच कोसल प्रांताचा भाग असलेल्या दंडकारण्यात गेला. आजचा बस्तरचा भाग म्हणजेच रामायणकालीन दंडकारण्य होय. याच दंडकारण्यात महर्षी वाल्मिकींचा आश्रम होता, आणि इथेच लव आणि कुशांचा जन्म झाल्याचे समजले जाते.

राजधानी रायपूर पासून २७ कि.मी. अंतरावर आहे चंदखुरी. इथे असलेल्या जलसेन तलावाच्या मधोमध आहे माता कौसल्येचे मंदिर. हे भारतातील कौसल्येचे एकमेव मंदिर आहे. रामाचे आजोळ हे. छत्तीसगड मधल्या तलावांसारखा हा पण मोठा प्रशस्त तलाव आणि यात कमळेसुद्धा भरपूर. या मंदिरात प्रभू श्रीराम बालक रुपात असून ते कौसल्येच्या कुशीत विसावले असल्याचे शिल्प आहे.

इ.स.च्या आठव्या शतकात इथे सोमवंशी राजांचे राज्य होते. एकदा राजाला कौसल्येने स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की ती या ठिकाणी जमिनीखाली आहे. त्या स्वप्नानुसार राजाने लोकांना बोलावून इथे खोदले असता, प्रभू रामाला कुशीत घेतलेल्या कौसल्येची मूर्ती मिळाली. राजाने इथे या जागेवर मोठे मंदिर उभारले. पुढे या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केला गेला.

सध्याचे मंदिर म्हणजे १९७३ साली जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. गाभाऱ्यात कौसल्या आणि तिच्या जवळ श्रीराम अशा मूर्ती. देवळाचे खांब, छत, भिंती यावर विविध चित्रे काढलेली आहेत. मंदिर परिसर आता आधुनिक आणि आकर्षक केलेला आहे. मंदिराभोवती असलेल्या तलावात शेषशायी विष्णूची मूर्ती एका बाजूला तर समुद्रमंथनाचे शिल्प दुसऱ्या बाजूला केलेले आहे.

कौसल्या मंदिर परिसर जलसेन तलावाच्या मधोमध असल्यामुळे तिथे जाण्यासाठी एक मोठा सेतू बांधलेला आहे. हनुमान सेतू असे त्याचे नाव. हनुमान सेतूच्या दोन्ही बाजूंचे कठडे त्यावर दिवे लावून सुशोभित केलेले आहेत. हा सेतू जणू हातांवर उचलून धरला आहे असे दाखवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंनी ६-६ हात दाखवले आहेत. त्यामध्ये दिवे लावलेले आहेत. रात्रीच्या वेळी हे सगळे दिवे लागले की हा परिसर मोठा मनोरम दिसतो.

कौसल्या मंदिराच्या बाजूलाच वैद्य सुषेणाची मूर्ती बघायला मिळते. भारतभरात अन्यत्र कुठेही वैद्य सुषेणाची मूर्ती दिसत नाही. सुषेण हा रावणाचा वैद्य होता. लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागेल हा सल्ला याच सुषेणाने दिलेला होता. रावणवधानंतर सुषेण इकडे आला आणि तो इथेच राहिला अशी कथा आहे. चंदखुरी हे गाव आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध होते. वैद्य सुषेण आणि आयुर्वेदिक औषधी यांचा असाच काहीसा संबंध जोडला गेला असावा.

- आशुतोष बापट