जिजीसाहेब झुलता पूल व शंकराजी नारायण यांची समाधी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधलेला झुलता पूल जणू एक आश्चर्यच आहे.

जिजीसाहेब झुलता पूल व शंकराजी नारायण यांची समाधी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भोरपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले आंबवडे हे गाव नागेश्वर शिवमंदिर, शंकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी व जिजीसाहेब झुलता पूल या प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. नागेश्वर मंदिराबद्दल मागील लेखात आपण जाणून घेतलेच तेव्हा या लेखात जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या झुलत्या पुलाविषयी जाणून घेऊ. 

मुळात नागेश्वर मंदिर व शंकराजी नारायण यांच्या समाधीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास एका नैसर्गिक व रम्य ओढ्यावरील हा झुलता पूल पार करूनच जावे लागते. भोर संस्थानाचे अधिपती रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांच्या कारकिर्दीत हा पूल बांधला गेला.जिजीसाहेब या रघुनाथराव यांच्या मातोश्री .

जिजीसाहेब यांच्या निधनानंतर त्यांचे यथोचित स्मारक व्हावे याकरिता हा पूल आंबवडे  येथे बांधण्यात आला. १९३७ साली पुलाच्या स्मारकशिलेच्या फलकाचा उदघाटन समारंभ मिरजचे संस्थानिक गंगाधराव पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी त्यावेळी दहा हजार रुपये खर्च झाला होता. आंबवडे गावात उतरल्यावर उजव्या बाजूस पुलाची पाषाणी कमान दिसून येते. कमानीच्या वर गोलाकार रचना करून त्यामध्ये ओम काढला आहे. त्याच्या खाली मंदिराच्या स्मारकशिलेच्या फलकाचे आवरण केल्याची माहिती व तारीख संगमरवरी पाषाणात इंग्रजी भाषेत कोरलेली आहे याखाली लंबगोलाकार आकाराचा दरवाजा असून आत शिरल्यावर पुलास सुरुवात होते.

कमानीच्या पलीकडील बाजूसही तंतोतंत रचना असून शिलालेख मराठी भाषेत कोरलेला दिसून येतो. येथून आत प्रवेश केल्यावर पूर्णपणे लोखंडी असा हा झुलता पूल आपल्याला पार करावा लागतो. एखाद्या नवख्याला हा पूल पार करणे म्हणजे दिव्यच वाटू शकेल कारण हा पूर्णपणे झुलता असल्याने व फक्त पुलाची जेथे सुरुवात सुरुवात व शेवट होते त्याच ठिकाणी पुलास आधार असल्याने या पुलावरून चालताना पूल थोडा वर खाली होतो त्यामुळे चालताना एक तर पूल तरी पडेल अथवा मी तरी पडेन अशी अवस्था पहिल्यांदाच येथे आलेल्यांची होऊन जाते. मात्र हा पूल अतिशय सुरक्षित असून आजपावेतो ८४ वर्षे बांधकामास होऊन गेली तरीही अत्यंत सुरक्षित व मजबूत आहे. मध्यंतरी फक्त पुलावरील पदपथाची दुरुस्ती करून थोडे भक्कम साहित्य तेथे बसवण्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून समजले. बाकी हा पूल अतिशय प्रेक्षणीय असून दोन्ही बाजूस ओढा असल्याने या पुलावरील प्रवास एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा असतो.

शंकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी

पूल पार करून आपण जेव्हा नागेश्वर मंदिराच्या दिशेस जातो तेव्हा दृष्टीस पडते भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण यांची समाधी. मूळची समाधी ही अतिशय साधी असून काळ्या पाषाणात बांधली होती मात्र भोर संस्थानाच्या संस्थापकांना साजेशी अशी समाधी व्हावी अशी संस्थानातील प्रजाजनांची इच्छा असल्याने समाधीच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले. १९३५ साली समाधीच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरु झाले. नवीन समाधी बांधण्यास संगमरवरी पाषाणाचा उपयोग करण्यात आला यासाठी लागणारे पाषाण उत्तर भारतातील मकरणा येथून आयात केले गेले. समाधीच्या ठिकाणी तीन वृंदावने असून मधील वृंदावन हे शंकराजी नारायण यांच्या समाधीवर बांधण्यात आले आहे. पूर्वी समाधीच्या भोवतालचा भाग उंच सखल होता त्यामुळे आजूबाजूला झाडे झुडुपे वाढली होती तो जीर्णोद्धाराच्या वेळी सपाट करून तेथे बगीचा करण्यात आला. याशिवाय बाजूला असलेल्या ओढ्याचे पाणी पंपाद्वारे इमारतीमध्ये नेण्यात आले. या सर्व कार्यास त्यावेळी ३१००० रुपये इतका खर्च आला जो संस्थानिकांनी खाजगीतुन केला. 

आंबवडे हे गाव पर्यटकांसाठी एक पर्वणी असून नागेश्वर मंदिर, जिजीसाहेब झुलता पूल व शंकराजी नारायण पंतसचिव यांची समाधी हि तीन स्थळे एकाच वेळी पाहून झाल्याने ज्ञानात निश्चितच भर पडते.