आवळसचा सोनगिरी

“सोनगिरी”, कर्जत जवळचा मुंबई-पुणे लोहमार्गावरील छोटासा(फक्त म्हणण्यापुरता) किल्ला. सोनगिरीला जायच्या अनेक वाटा आहेत. त्यापैकी एक वाट लोहमार्गाच्या बाजूने जाते तर दुसरी वाट पायथ्याच्या नेवळीगावातून जाते. दोन्ही वाटांवरून जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबई-खोपोली मार्गावरील पळसदरी गाठावे. पळसदरी स्थानकात उतरल्यावर समोरच सोनगिरी उभा ठाकलेला दिसतो.

आवळसचा सोनगिरी
सोनगिरी

नोव्हेंबर मधील राजमाचीच्या मोहिमेनंतर पुढचे दोन महिने इकडे जाऊ तिकडे जाऊ म्हणत गेले. चाचणी परीक्षा झाली होती आणि सत्र परीक्षेला खूप वेळ असल्याने सह्याद्रीत भटकण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. वेगवेगळी ठिकाणे google search करून मागील वेळेस अर्धवट राहिलेल्या कर्जत जवळच्या सोनगिरीवर जाण्याचे निश्चित झाले. नेहमीच्या सदस्यांना फोनाफोनी केली. काही जण busy असल्याने व काहींनी मागील वेळेचा धसका घेतल्याने शेवटी कमलेश, मी आणि दिपक सोनगिरीसाठी सज्ज झालो.

१९ फेब्रुवारीला सकाळी छ.शि.ट.हून १ली खोपोली लोकल पकडून रवाना झालो. दिपक कर्जतला हीच लोकल पकडणार होता. पण त्याची लातूर एक्स्प्रेस चुकल्यामुळे आम्हीच कर्जतला उतरलो. दीपकला लोणावळ्याहून यायला खूप वेळ होता म्हणून आम्ही स्थानकातून बाहेर पडलो आणि दगडू वडेवालेंकडे गेलो पण इतक्या सकाळी त्यांचे दुकान उघडले नसल्याने दुसरीकडे न्याहारी उरकली. थोडा वेळ रेल्वे स्थानक भटकून timepassकेला. अखेर ८.०० वाजता सिंहगड एक्सप्रेसने दीपकराव कर्जतला हजर झाले. बाजूलाच उभी असलेली खोपोली लोकल पकडली. थोड्याच वेळात पळसदरीला उतरलो. समोरच सोनगिरी आपले पंख पसरून उभा होता.

“सोनगिरी”, कर्जत जवळचा मुंबई-पुणे लोहमार्गावरील छोटासा(फक्त म्हणण्यापुरता) किल्ला. सोनगिरीला जायच्या अनेक वाटा आहेत. त्यापैकी एक वाट लोहमार्गाच्या बाजूने जाते तर दुसरी वाट पायथ्याच्या नेवळीगावातून जाते. दोन्ही वाटांवरून जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबई-खोपोली मार्गावरील पळसदरी गाठावे. पळसदरी स्थानकात उतरल्यावर समोरच सोनगिरी उभा ठाकलेला दिसतो.

पळसदरीला उतरून लोहमार्गाजवळची वाट न पकडता आम्ही सरळ नेवाळी गावची वाट पकडली. कारण मागील वेळेस लोहमार्गाजवळच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला असता अनेक छोट्या फसव्या वाटांमुळे वाट चुकून समोर गड दिसूनसुद्धा अर्ध्यावरून परतावे लागले होते. तो trek ऐवजी आमचा track track खेळ झाला होता. म्हणून यावेळी नेवाळी गावातून जायचा निर्णय घेतला. नेवळी गावाकडे जाताना वाटेत आवळस गाव लागते. याच गावामुळे सोनगीरीला आवळसचा किल्ला असेही म्हणतात. गावात शिवजयंती(तारखेप्रमाणे) निमित्त ध्वनिक्षेपकावर मस्त गाणी लावली होती. गावात नेवळीची वाट विचारून मार्गस्थ झालो. थोड्याच वेळात डांबरी सडकेवरून नेवाळी गावात पोहोचलो. सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि उल्हास नदीच्या काठावर वसलेले नेवाळी गाव एक छोटंसं गाव आहे. गावात थेट गाडी रस्ता पोहोचला आहे. गावातील लोक मुंबई, खोपोली, कर्जतकडे शिक्षण, नोकरी निमित्त जात असल्याने त्याचा थोडा प्रभाव गावावर आहे. 

आम्ही गडावर जायला आलेले पाहून “काय ठेवलंय त्या वरच्या सुकलेल्या रानात, कशाला जातायत काय माहित” असा एका काकींचा टोमणा ऐकू आला. अर्थात त्याचे वाईट न वाटता हसत हसत आम्ही पुढे गेलो. एका काकांना वर जायचा रस्ता विचारला नि गावातील घरांच्या मागून डोंगरवाटेला लागलो.  सकाळी ९.०० वाजता आमची डोंगरयात्रा सुरुवात झाली. दमट हवामान जाणवू लागले होते. साधारण १० मिनिटांमध्ये थोड्या उंचीवर जाऊन पोहोचलो. तिथून पश्चिमेला पळसदरी धरण, स्थानक तिथून जाणाऱ्या आगगाड्या तर पूर्वेला सह्याद्री रांग, उल्हास नदी व तिच्या काठावर वसलेली छोटी गावे, ढाकचा किल्ला व त्याचा कळकराय सुळका असे नयनरम्य दृश दिसत होते.

नंतर थोडा वेळ खड्या चढाईमुळे व गरमीने घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यामुळे सावलीत बसून थोडा फलाहार केला व त्याच फळांच्या फायद्यांवर चर्चा ... यावेळी चुकू नये म्हणून पुढची योग्य दिशा ठरवली आणि पुन्हा मार्गस्थ झालो. पुढचा मार्ग डोंगराच्या सावलीतून जात होता. त्यामुळे प्रवास सुखाचा चालू होता. डोंगर उतारावर उतरत पुन्हा वर चढत मोठ्या वृक्षांच्या छायेतून सुकलेल्या धबधब्यातून, डोंगराच्या कडेने चालत अखेर एका सुकलेल्या धबधब्याच्या वाटेसमोर येऊन उभे राहिलो. आता सोनगिरी जवळ आला असे वाटू लागले होते. पण खरा प्रश्न होता तो पुढील मार्गक्रमणाचा... धबधब्याच्या वाटेवर छोटे-मोठे दगड पडले होते आणि गच्च रान माजले होते. शेवटी पाण्याचे दोन-चार घोट घेतले आणि याच वाटेने पुढे जायचे ठरवले. कारण आता मागे फिरून पुन्हा वाट शोधणे वेळ खाऊपणाचे होते.

सकाळचे १०.३० वाजले होते. ऊन जाणवू लागलं होतं. धबधब्याच्या वाटेवरून निघालो. जागोजागी पडलेल्या छोट्या-मोठ्या दगडांवरून वाट काढत, रानफुलं पाहत सोनगिरी जवळ करत होतो. झाडांच्या गर्दीमुळे ऊन लागत नव्हते. पण दमट हवामानामुळे आणि वाऱ्याचा काहीच पत्ता नसल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. काटेरी झाडांमधून वाट काढत अंतर कापत होतो. काही वेळानंतर समोर झाडांची दाटी वाढल्यामुळे काहीच दिसत नव्हते. उजव्या बाजूला डोंगराचा कडा आणि डाव्या बाजूला डोंगराची आडवी धार दिसत होती. धारेकडचा मार्ग सोपा वाटला म्हणून त्या बाजूला वळलो. बाभळीच्या काट्याची टोचण सहन करत, सोपे climbing करत सोंडेवर आलो. बाजूलाच असलेल्या वाटेने पुढे गेलो पण ही वाट पुन्हा धबधब्याच्या वाटेतच उतरत होती. त्यामुळे माघारी फिरलो आणि पठारावर आलो. खूप वेळानंतर सोनगिरीचा माथा दिसू लागला होता.

थोडे पुढे जाऊन खाली उतरलो नि समोर असलेल्या छोट्या टेकाडावर गेलो. तेथे आडव्या (न)असलेल्या पायवाटेवर चालू लागलो. सुकलेली पाने, गवत आणि भुसभुशीत मातीची टेकड्याच्या कडेची वाट पुन्हा धोकादायक वळणावर नेऊन थांबली. म्हणून पुन्हा मागे फिरलो. ऊन आता खूप तापू लागले होते. वर एक कपार दिसत होती.कसाबसा तिथे गेलो.खूप वेळानंतर वाऱ्याची थंड झुळूक अनुभवली. थोडा आराम केल्यावर पुढे कसं जायचे हा यक्ष प्रश्न होता. यावेळी मोहीम फत्ते झाल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असे ठरवल्यामुळे विचाराअंती सुलतानढवा करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यच ठरला. तापलेल्या कातळावरून केलेल्या सुलतानढव्यामुळे थंड गर्द रानात दाखल झालो आणि समोरच सोनगिरीवर जाणारी ठळक वाट दिसू लागली होती. हा! खूप काही मोठं मिळाल्याचा आनंद तिघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जणू याचसाठी केला होता सुलतानढवा.. 

याच वाटेवरून पुढे निघालो. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून एका काटेरी झाडाच्या सावलीत बसून जेवण उरकले आणि थोडा वेळ तिथेच पडून आराम केला. दोन वाजत आले होते. गड पण टप्प्यात आला होता आणि वाटही सुस्पष्ट होती. त्यामुळे वेळ न दवडता सोनगिरीकडे कूच केली. खड्या चढणीची वाट जंगलातून जात होती. मधेच काही प्रमाणात मुरमाड माती होती. थोड्या पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. त्यापैकी डावीकडची वाट अस्पष्ट, थोडी कठीण, प्रचंड घसारा व दाट काटेरी झुडुपांमधून जात होती. त्याऐवजी आम्ही उजवीकडची स्पष्ट आणि गडाच्या कातळकड्याला लागून असलेली वाट धरली. एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरळसोट दरी असलेल्या वाटेवर एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो व तेही अतिशय सावधपणे जावे लागते. या वाटेवरून आम्ही अर्धवट पार केलेली. धबधब्याची वाट आणि पळसदरी परिसर दिसत होता.

पुढची वाट चांगली होती व पुन्हा जंगलातील पालापाचोळ्यातून चढून उजाड जागी आलो. इथून गडाची तटबंदी दिसू लागली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या अंगात बळ संचारले आणि छोटे दगड, घसारा, किल्ल्याच्या मातीखाली गाडलेल्या उद्ध्वस्त पायऱ्यांचालत गड जवळ केला. गडाचे दोन भाग आहेत. गडप्रवेश करण्याआधी गडाच्या कोपऱ्यात असलेल्या एका दगडावर विसावा घेत थंडगार वाऱ्याचा आनंद लुटला.

गडप्रवेशाच्या सुरुवातीला तटबंदी शिल्लक आहे. तटबंदीच्या बाजूच्या वाटेने सावधपणे चढून गडप्रवेश केला. इथेही तुरळक तटबंदी आहे. बाकी गडाच्या कातळकड्यामुळे गडाला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. थोड्या अंतरावर एक पाण्याचे टाके आहे. त्यात थोडेफार पाणी होते. पण खूप गाळ साठून चिखल झाल्याने पाणी पिण्यास अयोग्य होते.ब तिथून पुढे वाटचाल करत गडाच्या उत्तर टोकाकडे गेलो. हा गडाचा सर्वोच्च भाग. इथून फार दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. त्यामुळेच येथे गडाची निर्मिती केली गेली असावी. या टोकावरून थोड्या खालील बाजूस असलेला बुरुज दिसतो. पण तिथे पोहोचण्याची वाट नाही.

आता माघारी फिरून माथ्यावरील अर्ध्या वाटेवरून डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेला लागलो. थोड्या अंतरावर इथे पाण्याचे टाके लागते. पण हे पाण्याचे पूर्णपणे सुकलेले होते व त्यात गवत वाढीस लागले होते. आल्या वाटेने पुन्हा पिछेमूड करत गडाच्या दुसऱ्या भागाकडे निघालो. इथे कोणत्याही अवशेषाच्या खुणा दिसट नाहीत. पण एके ठिकाणी दगडात एक Hole दिसला. असे holes गडावर अजून दोन ठिकाणी होते व ते नैसर्गिक वाटत नाहीत.

या दुसऱ्या भागातील वाट उताराकडे जाते. वातावरण अस्वच्छ असल्याने दूरवर राजमाची पण अस्पष्ट दिसत होता. दरवेळी पुण्याला जाताना सोनगिरी विविध बाजूने दर्शन द्यायचा पण यावेळी लोहमार्गाचे विविध बाजूने दर्शन होत होते. दुपारचे ३ वाजले होते. आता परतायची वाट जवळ करायला सुरु केली. माघारी येऊन दोन्ही भागांमधील खिंडीत आलो. आलेल्या वाटेने न उतरता दुसऱ्या बाजूच्या वाटेने उतरू लागलो. काटाकुटयांनी भरलेली, दगड धोंड्यांची वाट खूपच त्रासदायक ठरली. थोड्याच वेळात काटाकुटयांमधून वाट काढत पठारावर आलो नि समोर असलेल्या पायवाटेने गावाकडे निघालो.

थोडे अंतर पार केल्यानंतर समोर पाहतो तर जंगलात आग पेटली होती. मोठी झाडे वगळता सुकलेले गवत आणि छोटी झुडूपे जळत होती व आग पसरतच चालली होती. पुढे जाण्याच प्रयत्न केला पण आगीच्या गरमीमुळे व प्रचंड धुरामुळे पुढे जाणे शक्य नव्हते. आग थोडी कमी झाली तेव्हा तोंडाला रुमाल बांधत आगीचा दाह सहन करत धवत धावत वाट पार केली.आग लागलेल्या जंगलातून पुन्हा सपाटीवर आल्याने जीवात जीव आला. पुन्हा पुढची वाट वाटचाल करत उतरायला लागलो. तर पुन्हा इथेही आग लागली होती. मग पुन्हा ही वाट धावत उतरत पार करावी लागली.

तहान लागली होती व पाणी आधीच संपले होते. पण वाट सोपी असल्याने पटापट उतरू लागलो.  थोड्याच वेळात गावातील एका घराजवळ आलो पाणी प्यालो. समोरच उल्हास नदी खुणावत होती. मग काय आपोआप मोहित होऊन उल्हासात खेचलो गेलो....दिवसभर बुटांमध्ये जखडलेले पाय मुक्त केले आणि अतिउल्हासात “उल्हासात” प्रवेश केला. नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच दिवसभराचा सर्व क्षीण निघून गेला. थोडा वेळ पाण्यात बसून राहिलो. photoshoot वगैरे पार पाडले आणि नेहमीप्रमाणे पुस्तकांची अदलाबदल केली नि पळसदरी रेल्वे स्थानकाकडे निघालो. सूर्यराव मावळतीला चालले होते. पाखरे आणि चाकरमानी घराकडे परतत होते.

पळसदरी स्थानकात पोहोचल्यावर कळले की कर्जतकडे जाणारी ट्रेन १ तासाने होती. ट्रेनची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. मग काय तिथल्या मराठी भैय्याकडून भेळ घेतली अन् पायगाडीने रेल्वे मार्गावरून चालत चालत अंधारात कर्जत स्थानक जवळ केले. पुन्हा नव्या भटकंतीची आश्वासने देऊन दिपक लोणावळ्याकडे नि आम्ही छ.शि.ट.कडे मार्गस्थ झालो.

- अमित म्हाडेश्वर

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press