कमळगड - कावेच्या अथवा गेरूच्या विहिरीसाठी प्रसिद्ध किल्ला

कमळगडास कमालगड व कातळगड या नावांनी सुद्धा ओळखले जाते मात्र किल्ल्याचे सर्वात प्रचलित नाव कमळगड हेच आहे.

कमळगड - कावेच्या अथवा गेरूच्या विहिरीसाठी प्रसिद्ध किल्ला
कमळगड

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील कमळगड हा काहीसा अपरिचित पणअप्रतिम असा किल्ला वाई महाबळेश्वरच्या डोंगर रांगातून दुर्गप्रेमींना खुणावत असतो. 

कमळ गडाची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ४५२७ फूट असून किल्ल्यावर जाणारी वाट ही दाट वनराईतून जाणारी आहे.

कमळगडास कमालगड व कातळगड या नावांनी सुद्धा ओळखले जाते मात्र किल्ल्याचे सर्वात प्रचलित नाव कमळगड हेच आहे.

गडाच्या वाटेवरील एका टप्प्यावर गोरक्षनाथांचे मंदिरअसून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या मूर्ती असून देवस्थानाचा कारभार श्री गोरक्षनाथ सेवा मंडळ कमळगड मार्फत पाहिला जातो.  मंदिरासमोरील वृक्षाच्या सानिध्यात अनेक मूर्ती व नाथभक्तांसाठी पूज्य अशा वस्तू पहावयास मिळतात. 

मंदिराचे दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू केल्यावर वाटेत एक पिण्याच्या पाण्याची टाकी दिसून येते. इथून पुढील प्रवास दाट वाटेतून जाणाऱ्या पायवाटेने पुढे सुरूच राहतो.

काही अंतर चढून आल्यावर एक मोठे शेत, तेथील घरे आणि गोधन दृष्टीस पडते. गाई व म्हशींच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज मन मुग्ध करतो.

येथून काही अंतर पुढे गेल्यावर गडाच्या बांधकामाचे दर्शन होऊ लागते. या ठिकाणी आपल्याला गडाची नामशेष झालेली तटबंदी पाहावयास मिळते. 

यानंतर गडाच्या माथ्यावर प्रवेश करण्यासाठी दोन भल्यामोठ्या कातळांच्या मधून जाणाऱ्या शिडीवरून आपल्याला वर चढावे लागते. कातळ फोडून निर्माण केलेल्या वाटेतून वर आल्यावर आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो.

कमळगडाचा माथा पूर्णपणे कातळाचा असून सपाट असा आहे. गडाच्या माथ्यावरून चौफेर विहंगम असे दृश्य दिसून येते.

कमळगडावर इतर किल्ल्यांसारखे बुरुज, तटबंदी, टाके आदी बांधकामे फारशी नसली तरी गडावरील सर्वात प्रसिद्ध बांधकाम म्हणजे कावेची विहीर.

कावेच्या विहिरीस गेरूची विहीर या नावाने सुद्धा ओळखले जात असून गडावरील कातळ खोल चिरून या वैशिष्ट्यपूर्ण विहिरीची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रथम दर्शनी ही विहीर एखाद्या गुप्त भुयाराप्रमाणे असून विहिरीच्या आतमध्ये उतरण्यास पायऱ्या सुद्धा आहेत. विहिरीत जस जसे आत जाऊ तस तसा गारवा वाढत जातो. असे म्हणतात की वरून पाहिल्यास विहिरीचा आकार हा एखाद्या तलवारीसारखा दिसतो. 

या विहिरीस गेरूची अथवा कावेची विहीर म्हणायचे कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला गेरु अथवा कावेची लाल माती दिसून येते. विहिरीच्या तळाशी पाणी साठवणुकीसाठी गुहे सारखे बांधकाम आहे. विहिरीच्या खालून वरील दिशेस पाहिल्यावर हवेसाठी व उजेडासाठी तयार केलेले काही आयताकृती झरोके दिसून येतात. 

विहिरीच्या पलीकडे गेल्यावर गडावरील बांधकामाच्या जोत्याचे अवशेष दिसून येतात. या जोत्यावर स्वराज्याचा जरीपटका फडकताना दिसतो. 

गडाला नैसर्गिक कातळभिंतींचे संरक्षण लाभल्याने गडास तटबंदी अथवा बुरुज बांधण्यात आले नसावेत असे जाणवते.  गडाच्या माथ्यावरून महाबळेश्वर, रायरेश्वर पठार, केंजळगड, धोम धरण आदी विस्तृत प्रदेश दिसून येतो.

सह्याद्रीच्या कुशीत दडलेला व गेरूच्या विहिरीसाठी प्रख्यात असलेला कमळगड एकदातरी पाहायलाच हवा.