रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड

विचित्रगड किल्ल्यास शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, फत्ते व सदरेचा असे सहा बुरुज आहेत, पडझड होत चाललेली तटबंदी हे इतिहासकालीन अवशेष सध्या शिल्लक आहेत.

रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड
रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड

समुद्रसपाटीपासून अदमासे ३६६० फूट उंच असलेला रोहिडा हा ऐन मावळांत वसलेला गड भोरच्या दक्षिणेस सुमारे ९ कि.मी.वर आहे. रोहिड्यास विचित्रगड अथवा बिनीचा किल्ला या नावांनीही ओळखले जाते.

रोहिडा गडाच्या पायथ्याशी बाजारवाडी नामक छोटेसे गाव आहे येथे येण्यासाठी आधी भोरला येऊन मग बस किंवा जिप करुन बाजारवाडीस येता येते. बाजारवाडीकडून पश्चिमेकडे गडाची चढण सुरु होते. चढण तशी फार थकवा देणारी नाही. आजुबाजूस तुरळक झाडी व जागोजागी पाणी झिरपण्यासाठी चरे तयार केल्याचे दिसून येतात. अदमासे तासाभरात आपण गडाच्या पहील्या दरवाजात येतो, गडांत शिरण्यासाठी एकूण तीन दरवाजे ओलांडावे लागतात. ही गोमुखी पद्धतीची रचना आहे.

रोहिडा किल्ल्याच्या पहील्या दरवाज्याच्या माथ्यावर गणेशपट्टी तर दुसर्‍या दरवाजाच्या दोन्ही बाजूंस सिंह आणि शरभ ही यादवकालीन चिन्हे आहेत याच ठिकाणी पाण्याचे एक भुयारसदृश बारमाही टाके आहे, यातले पाणी अतिशय चविष्ट आहे . तिसर्‍या दरवाज्याच्या माथ्यावर हत्ती आणि एक फारसी तर एक देवनागरी असे दोन भाषेतील दोन शिलालेख आहेत, देवनागरीमधील हजरत सुलताना....मुदपाकशाला असे काही शब्द वाचता येतात. गडाचे तिन्ही दरवाजे ओलांडून आंत गेल्यावर सदर लागते. सदरेच्या बरोबर पाठीमागे भैरवाचे मंदिर आहे. भैरवासमोर दीपमाळ आणि काही स्मारक शिला आहेत.मंदिराकडून वाघजाई बुरुजाकडे येताना सलग सात पाणटाक्या लागतात येथेच एक भूमिगत टाके आहे, येथेच एक शिवलिंग व मानवी मूर्ती सुद्धा आहे. 

रोहिडा किल्ल्यास शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, फत्ते व सदरेचा असे सहा बुरुज आहेत, पडझड होत चाललेली तटबंदी हे इतिहासकालीन अवशेष सध्या शिल्लक आहेत. गडाच्या पूर्वेस असलेल्या फत्तेबुरुजावर तीन ढालकाठ्या आहेत. येथील वाघजाई बुरुजावरुन आसमंत निरभ्र असल्यास सिंहगड, राजगड, तोरणा,केंजळगड, कमळगड, रायरेश्वर पठार, पुरंदर आदी किल्ल्यांचे दर्शन होवू शकते. गड पाहण्यास दीड तास पुरतो.

रोहिडा किल्ला यादवकालीन आहे, आदिलशाहाने या गडाची दुरुस्ती केली होती, मे १६५६ मध्ये किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. यासाठी बांदल्-देशमुखांबरोबर लढाई करावी लागली ज्यात कृष्णाजी बांदल मारले गेले. घोडखिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे बांदलांचे मुख्य कारभारी म्हणून काम पहायचे, बांदलांच्या पराभवानंतर ते आणि त्यांचे सहकारी स्वराज्यात सामील झाले, यानंतरा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. 

पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेलेल्या किल्ल्यांत याचा समावेश होता. मात्र १६७० मध्ये किल्ला परत स्वराज्यात आला. जेधे, खोपडे आदि शिवकालीन घराण्यांचा या किल्ल्याशी घनिष्ट संबंध होता, पुढे भोरच्या पंतसचिवांनी औरंगजेबाशी लढून हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, प्रचंडगड, तुंग, तिकोना या सर्व किल्ल्यांप्रमाणेच रोहीडाही भोर संस्थानातच होता.

गडावरील मंदिरात सहा ते सात जण राहू शकतात. बाजारवाडी गावात उपहारगृह नसल्याने पुरेसा आहार येतानाच आणावा. जवळ तीन ते चार दिवसाचा अवधी असल्यास रोहीडखोरे व रायरेश्वर रांगेतील रोहिडा-केंजळगड्-रायरेश्वर यात्रा होऊ शकते.