भटकंती तळगड व घोसाळगडाची
खूप दिवसाआधीच विवेक सरांनी या मोठ्या ट्रेक आणि शिबिराची कल्पना दिली होती व यायचंच आहे म्हणून सांगितलं होतं आणि मीही येणारच असं सांगितलं होतं. त्यानुसार सरांचं व नानांचं नियोजन चालू होतं. माझ्या या आधीच्या न येण्याच्या अनुभवावरून स्नेहाताई वारंवार खात्री करून घेत होत्या. ७ फेब्रुवारी २०१९च्या एका गुंग दुपारी सौमित्र ‘सर’देसाई यांचा कॉल आला. जगभरच्या नि इतर बाता झाल्या नि शेवटी ‘‘खूप दिवस झाले कुठे गेलो नाही, कंटाळा आला आहे’’ असे दोन्हीकडचे सूर लागले नि त्याची परिणती “चल कुठेतरी ट्रेकला जाऊ’’ यात झाली.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
सुरुवातीला मुंबईच्या जवळपास पासून पार नाशिकपर्यंतच्या किल्ल्यांची बोली लागली. नि रोह्याजवळच्या किल्ल्याची निश्चिती झाली. पण एस.टी.च्या मनात आम्ही तिथे जाऊ नये असे होतं म्हणून बेत रद्द करून रोह्यापुढच्या तळा व घोसाळा आणि जमल्यास कुड्याच्या लेणी बघायला जायचं ठरलं. लगेच १० तारखेचं तळ्याच्या एस.टी.चं दोघांचं आरक्षण केलं आणि इथूनचं नकटीच्या लग्नाच्या सतराशे साठ विघ्नांची सुरुवात झाली.
९ तारखेच्या रात्री ११ वाजता पनवेल आगर गाठलं. गाडी यायला अवकाश होता त्यामुळे आगाराजवळच आम्ही आमच्या गाडीत इंधन भरलं नि पुन्हा गाडीची वाट बघत आगारात बसलो. अनेक गाड्या येत होत्या नि मार्गस्थ होत होत्या. येणारी गाडी आपली असेल या उत्सुकतेपोटी उठायचो नि निराशेने पुन्हा जागेवर बसायचो. अखेर रात्री ११.३०ची एसटी रात्री १.३० वाजता पनवेल आगारात आली ती पहिल्या विघ्नाचं रूप घेऊनच. आमचं आरक्षण आहे असं वाहकाला सांगितलं; पण ते आसन दुसऱ्यानेच आरक्षित केलं होतं असं ते सांगत होते. ते आणि आम्हीही गोंधळात पडलो. शेवटी एसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘तुम्ही उद्याच्या एसटीचं आरक्षण केलं आहे’ असा बॉम्ब टाकला. शेवटी आता काहीच पर्याय नसल्यामुळे आहे त्या भरगच्च एसटीमध्ये चढलो नि तळ्याच्या दिशेने एसटीने मार्गक्रमण केले. कशीबशी एसटीमध्ये उभं राहायला जागा मिळाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्डेयुक्त रस्त्यांवर हाडं खिळखिळी होत प्रवास चालू होता. वेळ सरत होता, गाडी वेगाने अंतर कापत होती, थंडीचा जोर पण वाढला होता नि उभं राहून पायांनी पण ‘थोडा तो रेहम करो’ असा सूर आळवला त्यामुळे चालकाच्या केबिनच्या सुरुवातीला मी मांडी घालून आणि सौमित्र थेट चालकाच्या केबिनच्या दुसऱ्या कोपऱ्यात राजेशाही थाटात बसला. (खरंतर झोपला.) गाडीने पेण, नागोठणे मागे टाकले नि तेवढ्यात कोलाडच्या अलीकडे रस्त्यात एसटी बाजूला घेण्यात आली. सर्वप्रथम कोणालाच काही कळलं नाही. पण नंतर कळलं की ते एसटीचंच गस्तीपथक होतं. त्यांनी वाहकाकडे चौकशी वगैरे केली त्यात जवळपास २०-२५ मिनिटे गेली. आधीच गाडी उशिरा होती त्यात हे. अखेर त्यांनी परवानगी दिली नि पुन्हा गाडी मार्गस्थ झाली. मधल्या काही ठिकाणांवर काही प्रवासी उतरले त्यामुळे माझी रवानगी खाली बसण्यापासून गाडीच्या बोनेटवर झाली. काही वेळाने गाडीने इंदापूर गाठलं. तिथे अनेक प्रवासी पुन्हा गाडीत भरले. व गाडी लगेच निघाली पण २-४ मिनिटांपूर्वी तिथे अपघात झाल्याने रस्ता साफ होईपर्यंत थोडा वेळ त्यात गेला. गाडीने थोड्याच अंतराने उजवीकडचे वळण घेतले आणि मुंबई-गोवा महामार्ग सोडून प्रवासाच्या अंतिम टप्प्याला लागली. पण विघ्न काही थांबली नाहीत. पुढच्या पाचंच मिनिटात गाडीने ब्रेक मारला आणि समोर रस्ता आडवा खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असल्याचे दिसताच प्रवाशांपेक्षा चालकच जास्त खवळले. मग गाडी कशी पुढे न्यायची यावर चर्चा होऊन गाडी खड्ड्यात न घालता तात्पुरत्या दगडांच्या सहाय्याने ती पार करण्याचा निर्णय झाला. यादरम्यान एसटीमधील अनेक प्रवाशांनी सुंदर भाषेत कामगारांचे वर्णन केले, एसटीमधील काही तज्ञ मार्गदर्शनासाठी घटनास्थळी गेले व काहींनी बसल्या जागेहून मार्गदर्शन केले, समोरच्या बाजूने येणाऱ्या एका सहा आसनी रिक्षा (विक्रम) चालकाने देखील वाग्बाणांचा प्रहार करून आपले कौशल्य दाखवत रिक्षा पार केली आणि त्या दृश्याचे चालकासह प्रथम साक्षीदार असणारे आम्ही अनेक दर्दभरी गाणी गात त्या दृश्याचे चित्रीकरण होतो. या संबंध घटनेत खूपच वेळ गेला. अखेर पाईपची कापाकापी करून, माती-दगड टाकून तात्पुरत्या तयार मार्गावरून एसटी पुढे गेली. ह्या घटनेचा चालकावर भयंकर परिणाम झाला नि त्यांनी मायकल शुमाकर अवतार धारण करून वेगेवेगे जात ‘तळा’ स्थानकात गाडी थांबवली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.
गाडी पोहोचली तेव्हा ५.१५ वाजले होते पण अजूनही मिट्ट काळोख होता. गाडीतून खाली उतरलो नि किल्ला कुठे आहे ते शोधत होतो पण तो काही दिसला नाही. पण असंख्य तारे एका घुमटाकार वास्तूवर चिटकवल्यासारखे सुंदर तारांगण दिसत होते. थंडीचा जोर तर अजूनच वाढला होता म्हणून जवळच असलेल्या एका छोट्या उपाहारगृहाचा आसरा घेतला. भूक तर लागलेली पण अशावेळी फक्त चहा मिळाला तरी खूप होता. थोड्याने वेळाने चहा व अल्पोपाहार करून उठलो. बाहेर थोडं उजाडायला सुरुवात झाली होती. किल्ला कुठे आहे ते विचारायला बाहेर निघालो तेवढ्यात काही मावशी व लहान मुलं शेकोटी घेत होती. अशा थंडीत त्या उष्णतेचा मोह न आवरल्यामुळे पावले आपोआप तिकडे वळली आणि मावशींनी पण आपुलकीने आम्हा ‘पोरांना’ जागा दिली आणि तिथूनच मागे किल्ला दिसू लागला. मग मोह आवरून किल्ल्याची वाट विचारली नि मार्गी लागलो.
साधारण ६.४५ वाजता सुरुवात केली आणि तेव्हापासूनच निसर्गाने आपले रंग उधळायला सुरुवात केली होती. सिमेंटचा रस्ता संपवून मातीच्या वाटेला लागलो व पाचंच मिनिटात एका तोफेजवळ पोहोचलो. तिथून डावीकडची लोखंडी कमान पार करत पुढच्या पाच मिनिटात थोड्या सपाटीवर आलो. इथून किल्ल्याच्या बालेकिल्ल्याचे पहिले दर्शन झाले. सकाळच्या कमी प्रकाशातदेखील बालेकिल्ला ‘कडक’ दिसत होता. तिथून मग जवळच असलेल्या पायऱ्यावरून गडाच्या दरवाजा(?)तून पहिल्या टप्प्यात प्रवेश केला. या दरवाजाला लागून थोडीफार तटबंदी अस्तिवात आहे व काही जोती देखील आढळतात.
किल्ल्याच्या पायऱ्यांची व तटबंदीची राखलेली निगा पाहून खूप आनंद झाला ज्यांनी हे काम केलं असेल त्यांचे मनोमन कौतुक करून पुढे निघालो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य वाटेवर माती कोसळल्याने वाट चिंचोळी झाली आहे त्यामुळे सध्या एक वळसा घालून जरा लांबचा मार्ग अवलंबवा लागतो. या वाटेत डाव्या हाताला एक बुरुज दिसतो तो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशाचा आहे (हे आम्हाला पण नंतर कळले) व पुढे डोंगरात साधारण ६-७ मीटर उंचीवर एक खोली दिसली (ती L आकाराची गुहा आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली). इथूनच पुढे गडाची मुख्य वाट सध्याच्या प्रचलित वाटेला मिळते. इथून काही पायऱ्या चढून हनुमान द्वारात पोहोचलो. द्वाराच्या समोरच्या बाजूला हनुमान कोरलेला आहे व तिथेच एक शरभ शिल्पाचा दगड आहे. हे शिल्प गडाच्या मुख्य द्वारात सापडले होते. हनुमान द्वाराने आत प्रवेश केल्यास उजव्या हाताला खांब असलेली पाण्याची टाकी दिसतात. इथून तटबंदीला समांतर समोर चालत गेल्यास तीन तोफा ठेवलेल्या दिसून येतात. या तोफांच्या बाजूने खाली जाता येते. किल्ल्याचा हा भाग तिन्ही बाजूने तटबंदीने संरक्षित केला आहे.
सूर्यनारायण पूर्णपणे वर आले होते व त्यांनी त्यांच्या रंगछटा सर्वत्र पसरल्या होत्या. तटावरून चालत चालत बालेकिल्ल्याचा दरवाजा जवळ केला. या तटात जागोजागी जंग्या आहेत. या बालेकिल्ल्याचा द्वाराच्या आधी एक अर्धगोलाकार बुरुज आहे. बालेकिल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे ढासळला आहे. तो आता अवशेषरूपातच पाहायला मिळतो. तर दरवाजाच्या उजव्या हाताला भक्कम असा निशाण बुरुज आहे. आम्ही उजव्या बाजूस न जाता डाव्या बाजूने गडफेरीस सुरुवात केली. बालेकिल्ल्याची लांबी खूप आहे पण त्या मानाने रुंदी कमी आहे व सर्व बाजूची तटबंदी अजूनही भक्कम आहे. या तटात जागोजागी शौचकूप देखील आहेत. या वाटेने पुढे गेल्यास वाटेत कातळात खोदलेली तीन पाण्याची टाकी आढळतात पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या पलीकडे उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत.
याच वाटेने पुढे चालत गेल्यास एक छोटे देऊळ लागते त्यात नवीन शिवपिंडी ठेवलेली दिसते व देवळावर एक गोमुख ठेवलेले आहे. हे गोमुख देवळाच्या मागे असलेल्या टाक्यात मिळाले होते. या देवळापासून वाड्यापर्यंत खोदीव सात टाक्यांचा समूह आहे. पाणी अडवण्यासाठी यातील काही टाक्यांमध्ये बांधकाम केले आहे. इथून पुढे माचीकडे जाताना टाक्यांच्या जवळच एक वास्तू आहे तिला लक्ष्मी कोठार असे म्हणतात. या कोठाराचा आतील भाग कोसळलेला आहे पण जोते व भिंती शाबूत आहेत. या कोठाराच्या पुढेच निमुळती माची आहे. या माचीच्या तटातदेखील जागोजागी शौचकूप तसेच जंग्या आहेत. या माचीच्या तटावरून टोकावरचा बुरुज गाठला. या बुरुजावरून खाली पाहिल्यास माचीच्या डोंगराला मिळालेली एक डोंगरसोंड दिसते. विशेष म्हणजे त्या डोंगरसोंडेवर काही भाग कापण्यात आल्याच्या खुणा दिसतात. दुर्गअभ्यासकांच्या मते संरक्षणासाठी सोंडेचा भाग कापण्यात आलेला आहे. त्या भागात एका स्थानिक देवीचं ठाणं आहे अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. थोडा वेळ बुरुजावर वारा खाल्ल्यावर पुन्हा बालेकिल्ल्याकडे निघालो.
लक्ष्मीकोठाराजवळ आल्यावर गावातील धनेश केतकर दादा भेटले. त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की हा किल्ला केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे, त्यासाठी खात्याने नेमलेला एक गडकरी देखील आहे व न चुकता ते रोज गडावर काम करतात, गावातील तरुण स्वखुशीने या गडाच्या संवर्धनात हातभार लावतात, इतकेच नाही तर गावातील एका तरुणाने पुरातत्वशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्याच्याच मार्गदर्शनाखाली इथले सर्व काम होते व त्यांनी आमचा त्या तरुणाशी थेट मोबाईलवर संपर्कदेखील साधला. मग दादांनीच गड दाखवायला सुरुवात केली. उत्खननाचे काम कसे झाले, त्यात कोणत्या वस्तू सापडल्या, तसेच तळा गावातील इतर वास्तूंची माहिती दिली. डावीकडच्या तटात एक चोर दरवाजा त्यांनी दाखवला. पण सध्या माती व दगडी अडकल्याने तो बुजला आहे. इतर गोष्टींची चर्चा करत शेवटी बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळील बुरुजावर आलो. या बुरुजाचा चौथरा व वरचा भाग बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. बुरुजाच्या वरील भागातून सबंध बालेकिल्ल्याचे दर्शन होते.
या बुरूजासमोर एक छोटी वास्तू आहे. या वास्तूला काही अभ्यासक देऊळ म्हणतात. बालेकिल्ला उतरून एका छोट्या वाटेने दादांमागोमाग आम्ही एका छोट्याश्या वाटेवरून किल्ल्याच्या डाव्याकडील तटाखालील गेलो. तिथे वाटेत दोन पाण्याची कोरडी टाकी लागली त्यातील एका टाक्यात खोदलेले खांब होते. या वाटेने पुढे चालत गेलो व तिथे सुख म्हणजे काय नक्की काय असतं ते प्यायला मिळालं. या खांब टाक्यातील पाणी प्यायलो आणि थोडावेळ तिथेच बसलो. या टाक्याच्या भिंतीवर एक शिल्प कोरलेले आहे. मनसोक्त पाणी पिऊन व बाटलीत भरून घेतले आणि किल्ला उतरायला लागलो. हनुमान दरवाजातून खाली आलो नि दादांनी गडाच्या मुख्य वाटेवर आणले. इथे एक बुरुज आहे व त्यापुढेच थोड्या उंचीवर डोंगरात एक टाके खोदलेले आहे. सौमित्रने क्लाइम्ब करून ते टाके पाहिले व त्यात देखील उतरण्यासाठी जागा व खांब असल्याचं सांगितलं.
मग त्या चिंचोळ्या वाटेवरून खाली उतरलो व वाटेतच गडाचे गडकरी पवार भेटले. मग त्यांनी गडावर चालणारं काम, उत्सव यांबद्दल माहिती सांगितली व मातीखाली दबलेला चुना मळण्याचा घाणा दाखवला. मग त्यांनी दिलेल्या ‘पुन्हा नक्की या’ या आमंत्रणाचा स्वीकार करून खाली उतरू लागलो. खाली उतरून लोखंडी कमानीच्या येथील तोफेजवळ आलो व धनेश दादांना धन्यवाद देऊन आम्ही तळा एसटी स्थानकाकडे व ते त्यांच्या घरी मार्गस्थ झाले. आता आमचे पुढचे लक्ष्य घोसाळगड होते. तिथे जाण्याची एसटीची माहिती दादांनी सांगितली होतीच म्हणून तळा स्थानकात आलो तिथे मुंबईला जाणारी १०.३०ची गाडी लागलेलीच. थोड्या वेळात ती सुटली नि पुन्हा एसटीच्या तपासणी पथकाने गाडी अडवली सर्व चौकशी केली या सर्व प्रकरणात पुन्हा १५ मिनिटे गेली. रात्रभर झोप न मिळाल्यामुळे दोघेही डुलक्या देत होतो. त्यात खिडकीतून वाऱ्याची झुळूक येत होती त्यामुळे चांगला डोळा लागला होता तेवढ्यात गाडीने करकचून ब्रेक मारला नि जाग आली नि गाडी तांबडी फाट्यावर थांबली. इथेच उतरून आम्हाला पुढे घोसाळा गावासाठी जायचं होतं मग काय भराभर झोपेला फाट्यावर मारून पटापट तांबडी फाट्यावर उतरलो.
तांबडी फाट्यावरील पोलीस चेकपोस्टवर गाडीची वाट पाहत बसलो होतो. ज्या गाड्या यायच्या त्या बरोबर उलट्या बाजूला जायच्या. वेळेचं गणित फिसकटत आहे असं वाटतं होतं. रात्रीची थंडी जाऊन कडक ऊन पडलं होतं. खूप भूक लागलेली. पण अचानक गाडी येईल म्हणून जेवताही येत नव्हतं. मग त्याचा मनावर वाईट परिणाम झाला नि स्वतःच्या परिस्थितीवर आम्ही दर्दभऱ्या गाण्यांचे विडंबन करत बसलो. अखेर सुमारे १२ वाजता घोसाळ्याला जाणारी एक सहा आसनी रिक्षा मिळाली. ५ मिनिटातच घोसाळे गावात उतरलो आणि समोरच उभा ठाकलेला घोसाळगड उर्फ वीरगड दिसत होता.
घोसाळगड उर्फ वीरगड
किल्ल्याच्या डोंगराच्या साधारण अर्ध्या उंचीवर गाव वसलेलं आहे. गावात गडाची वाट विचारली नि वाटेला लागलो. वाटेत सर्वप्रथम भवानी मातेचे मंदिर लागले. मंदिरात देवीची पुरातन मूर्ती आहे. त्यानंतर थोड्या उंचावर गणपती मंदिर लागले. गणपती मंदिरातील काकांना विचारून बाहेरच जेवायला बसत होतो पण त्यांनी आत जेवायला बसायला सांगितलं. सकाळपासून कडकडीत भूक लागली होती. घरून आणलेल्या खाण्यावर ताव मारला नि थोडा वेळ तिथेच विश्रांती घेतली. मग फक्त १५ मिनिटाच्या विश्रांतीनंतर बरोबर १२.३० वाजता घोसाळगडची वाट चढायला सुरुवात केली आणि फक्त १० मिनिटांतच गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. ढासळलेल्या द्वाराच्या दोन्ही बाजूला दोन शरभ शिल्प पडलेले आहेत.
प्रवेश केल्याच्या डाव्या बाजूला एक खोदीव वास्तू आहे ही वास्तू नक्की काय आहे हे कळत नाही. पण काही अभ्यासकांच्या मते हे कोरीव दारुगोळा कोठार आहे. द्वाराच्या समोरच्या तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. हा दरवाजा थेट सरळसोट कड्याकडे बाहेर पडतो. तेव्हा ह्या दरवाजातून बाहेर न पडलेलंच बरं!
घोसाळगडचे बालेकिल्ला व माची असे दोन मुख्य भाग आहेत. आम्ही सर्वप्रथम बालेकिल्ला पाहण्यास निघालो. प्रवेशद्वाराजवळील तटातील पायऱ्या चढून बालेकिल्ल्याच्या दिशेने कूच केली. सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांनी पुढे चालत राहिल्यावर उजवीकडे तीन पाण्याची टाकी लागतात. टाक्यातील पाण्यावर खूप माशा असल्याने लांबूनच बघून मागे फिरून मुख्यवाटेवर आलो. इथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा आहेत. आम्ही आमच्या boss is always left या नियमाप्रमाणे डाव्या बाजूची वाट पकडली. सुबक पायऱ्या उतरून दोन टाक्यांजवळ आलो. प्रचंड पालापाचोळा व छोटी झाडे यांच्यातून मार्गक्रमण करत करत पुन्हा एका मोठ्या टाक्याजवळ आलो. इथून पुढे चालत गेल्यावर वाटेत काही अवशेष पडलेले आढळले. इथपर्यंत आमची अर्धी गडप्रदक्षिणा पूर्ण झाली होती. आम्ही यापुढे उजव्या हाताला वळणारच होतो इतक्यात डावीकडे जाणारी एक सुकलेल्या गवताची वाट दिसली. सहज उत्सुकतेपोटी आम्ही पुढे पुढे सरकत होतो व अखेर जागी काही छोट्या पायऱ्या लागल्या व सावधानतेने उतरत आणखी खाली उतरलो. तर साक्षात एका दरवाजाची ती वाट होती. कदाचित हा गडाचा चोर दरवाजा असावा. पुढील भाग सरळ कापल्यासारखा असल्यामुळे इथून खाली उतरण्यास वाट नव्हती. पण खाली दोन कोरलेली शिल्प व त्या बाजूला एका गुहा दिसत होती व थोडं वाकून बघितल्यास खोदीव पायऱ्यासुद्धा दिसत होत्या.
वरून उतरणे शक्य नसल्याने आम्ही नंतर खालून हा दरवाजा पाहण्याचे ठरवलं व उतरलेल्या २१ पायऱ्या मोजत पुन्हा गडफेरी चालू ठेवली. या वाटेतच पुढे झाडाझुडूपात एक वास्तू दिसली. कदाचित हे दारुगोळा कोठार असावे असे वाटते. या वास्तूच्या दोन भिंती काही प्रमाणात शाबूत आहेत’;बाकी सर्व कोठारात झाडांचे साम्राज्य आहे. आता उष्ण वाफा शरीराला जाणवू लागल्या होत्या. वाऱ्याचा तर पत्ताच नव्हता. पुढे गडफेरी चालू ठेवत किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर गेलो. या बुरुजावर तळागडच्या दिशेने ठेवलेली एक तोफ आहे.
या बुरुजाच्या जवळूनच किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाण्यासाठी वाट आहे. ही वाट माती आणि सुकलेल्या गवतामुळे निसरडी झालेली आहे त्यातच खडा चढ आहे आणि आम्ही एका पुस्तकात वाचल्याप्रमाणे माथ्यावर कोणतेही अवशेष नव्हते. मग वर जायचं की नाही यावर विचारविनिमय झाला आणि दोघंही ‘मै करेगा’ या निर्णयावर आलो. पाठपिशव्या तिथेच ठेवल्या नि कातळाला भिडलो. सुरुवातीला उभं राहत, नंतर वाकत, हात खाली टेकवत, तोल सांभाळत नि शेवटच्या टप्प्यात अगदी छातीचा भाता धपापत माथ्यावर पोहोचलो. माथ्यावरून सभोवतालच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते.
माथ्यावर देखील मोठ्या प्रमाणात पालापाचोळा नि झाडांचेच राज्य आहे. या सर्व पसाऱ्यात काही अवशेष पडलेले आढळले व एके ठिकाणी जमीन थोडी ओली दिसली. (या माथ्यावर एका वाड्याचा चौथरा व कोरडे टाके आहे असं नंतर वाचनात आलं) फिरत फिरत माथ्याच्या दुसऱ्या टोकाकडे गेलो. तिथून खाली उतरायला सोपी वाट मिळते का पाहण्यासाठी सौमित्र पुढे गेला पण वाट न मिळाल्यामुळे आल्या वाटेवरून पुन्हा माघारी फिरलो. ज्या वाटेने वर येताना कष्ट पडले होते त्याच वाटेने उतरणे त्याहून जिकरीचे होते. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकणे आवश्यक होते. सुरुवातीला उभ्यानेच पाय घट्ट रोवून जात होतो पण नंतर खाली बसण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून खाली बसून हळू हळू सरकत खाली येत होतो. मध्ये काही ठिकाणी पाय जास्तच सरकले पण कसं-बसं सावरलं व एकदाचे खाली आलो नि हुश्श केलं. वर जाताना पाणी नेलं नव्हतं म्हणून खाली उतरल्यावर लगेच पाणी प्यायलो नि थोडावेळ त्याच जागी ‘करके दिखाया’चा आनंद मनात साठवत राहिलो.
आता २ वाजले होते आणि बाकी किल्ला देखील बघायचा होता. त्यामुळे पुढील वाटचालीस लागलो. आम्ही ज्या वाटेवरून चालत होतो त्या वाटेच्या खालच्या भागात एक कोरडे पाण्याचे टाके लागले. त्याच्याच पुढे वाटेत शिवलिंग कोरलेला एक दगड पडलेला होता. याच वाटेने पुढे चालत आल्यावर एक चौथरा व त्याच्या काही पायऱ्या दिसतात. तर उजव्या बाजूला डोंगराच्या पोटात ओबड-धोबड खोदलेली गुहा दिसते व तिला आडोसा म्हणून केलेले बांधकाम दिसून येते.
त्या थंडगार गुहेत थोडावेळ विश्रांती घ्यावी अशी खूप इच्छा होती पण घड्याळाचा काटा फिरत असल्याने पुढे जाणे क्रमप्राप्त होते. भराभर पावलं उचलत पुढच्या पाचंच मिनिटात बालेकिल्ल्याच्या सुरुवातीच्या पाण्याच्या टाक्यांपाशी आलो. आता माशांचं प्रमाण कमी होतं म्हणून शेवटचं टाकं पाहण्यासाठी पुढे गेलो. या शेवटचे टाक्यात नक्षीदार खांब आहेत. पण या टाक्याजवळ जाताना सावधगिरी बाळगावी अन्यथा कडेलोट नक्की..पुन्हा सावधगिरीने मागे आलो नि गडाच्या माचीच्या भागात आलो.
जास्त वेळ नसल्याने पूर्ण माची न फिरताच अर्ध्यावरून मागे आलो नि गड उतरण्यास सुरुवात केली. गड पूर्णपणे न उतरता वरून पाहिलेला दरवाजापर्यंत नीट पोहोचण्यासाठी अर्ध्यावाटेवरून ढोर वाटेने वा सरळ सरळ सुलतानढवा करत पुन्हा वर चढू लागलो. काटेरी झुडूपांतून मार्ग काढत अखेर कातळाला भिडलो नि त्याच्याच साथीने पुढच्या वाटेला लागलो. साधारण ५ मिनिटांनी दोन पाण्याची टाकी लागली. त्यात उतरण्यासाठी व त्याबाहेर उतरण्यासाठीदेखील पायऱ्यांची सोय होती. त्यापैकी एक टाके कोरडे होते तर खांब असलेल्या टाक्यात थोडेफार पाणी शिल्लक होते व या टाक्यांना लागूनच पुढे अजून एक टाके दिसले.
आलेलो दरवाजा पहायला पण अचानक हे दृश पाहून ‘दिल खूष हो गया’. आता नव्या उत्साहाने अंतर कापत कापत पाच मिनिटाच्या चालीने इच्छित स्थळी दाखल झालो. दोघांचाही चेहऱ्यावर आर्किमिडीजसारखे ‘युरेका-युरेका’ असे भाव होते. या द्वाराचा मार्ग घळीसारखा वाटतो. द्वारापाशी जाण्यासाठी सुरुवातीला थोडे क्लाइम्बिंग करावे लागते. नंतर थोड्या खोबण्या आहेत व पुन्हा खोदीव पायऱ्या व एके ठिकाणी देवडी देखील होती. मी खालीच थांबलो होतो व सौमित्रवर द्वारापाशी जाऊन हे सर्व पाहून आला.
एका वेगळ्याच आनंदात गड उतरण्यास सुरुवात केली. पण आता आलेल्या डावीकडील वाटेवर न जाता उजवीकडची वाट पकडली. या वाटेत देखील गडाचे काही दगड अस्ताव्यस्त पडलेले आढळले. थोड्याच वेळात एका सपाटीवर आलो. इथे अजून एक नवीन दृश्य आमची वाट पाहत होतं. गडाच्या डोंगराला जाऊन मिळालेली एक तटबंदी इथे पाहायाला मिळाली. या तटबंदीवरदेखील मोठ्या प्रमाणात झाडी माजली आहेत. आता त्रिगुणित झालेल्या आनंदासह रमत गमत खाली पुन्हा गणपती मंदिरापाशी आलो. मुख्य मंदिराच्या बाजूलाच असलेल्या छोट्याश्या घुमटीत गणपतीचे जुने शिल्प ठेवलेले आहे.
त्याला नमस्कार करून पिण्यासाठी पाणी शोधू लागलो. थोड्याच वेळात एका मावशींनी आपुलकीने चौकशी करून पाणी दिलं. त्यांचा निरोप घेऊन शेवटी घेऊन अखेर रस्त्यावर आलो. जवळच्याच एका बचत गटाने चालवलेल्या उपाहारगृहात अल्पोपाहार केला. (इथे गेल्यास कोणताही पदार्थ घ्या अतिशय सुग्रास व ताजे पदार्थ मिळतात) एसटीची चौकशी केल्यावर एका काकांनी सांगितलं थेट मुंबई एसटी येईल त्यात बसायला हमखास जागा मिळेल. त्यामुळे रोह्याला वगैरे जाणाऱ्या एसटी पकडू नका. या दरम्यान रोह्याला जाणाऱ्या २-३ एसटी सोडल्या. दीड तासानंतर मुंबईला जाणारी एसटी आली; पण त्यात काही बसायला जागा नव्हती. आम्हाला वाटलं की रोह्याला काही जण उतरतील नि आम्हाला जागा मिळेल म्हणून पनवेलचे तिकीट काढून उभे राहिलो. चालकाने आधीच शुमाकर अवतार धारण केला होता तो तसाच ठेवत त्यांनी थोड्याच वेळात एसटी रोहा स्थानकात आणली. पण त्या एसटीतील एकही प्रवासी उतरला नाही व याउलट बाजूलाच रोहा-मुंबई रिकामी गाडी लागली होती. पण आमच्याकडे या गाडीनेच प्रवास करण्यावाचून पर्याय नसल्याने ‘’सारी गाड़ियाँ छड़ के हमनें तेनु क्यूँ ही चुनेया?’’ असं म्हणत खाली बैठक मारली ती थेट पनवेलपर्यंत…
- अमित म्हाडेश्वर