शेतीची कार्यपद्धती

शेतीच्या पहिल्या प्रकारात प्रथम कोरडी जमीन भरपूर प्रमाणात नांगरून घेतात जेणेकरून माती फुटून ती मोकळी होते.

शेतीची कार्यपद्धती
शेतीची कार्यपद्धती

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि प्राचीन काळापासून भारतीयांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच राहिला आहे. शेती करणे यास कृषिकार्य अथवा कृषिकर्म या नावाने ओळखले जाते. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळात कृषी तंत्रज्ञानात अगणित बदल आणि सुधारणा झाल्या आहेत आणि त्यामुळे कमी श्रमात व कमी वेळात कृषीनिर्मिती शक्य झाली आहे मात्र या देशातील जो बहुसंख्य सामान्य शेतकरी आहे तो आजही शेतीची जी पद्धत वापरतो त्यास पारंपरिक शेती या नावाने ओळखले जाते व या पारंपरिक शेतीचे प्रकार काय आहेत ते या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

शेतीच्या पहिल्या प्रकारात प्रथम कोरडी जमीन भरपूर प्रमाणात नांगरून घेतात जेणेकरून माती फुटून ती मोकळी होते. यानंतर जमिनीस खत दिले जाते आणि पावसाची चाहूल लागली की जमिनीत धान्याची पेरणी केली जाते. पाऊस पडला की पेरणी केलेले बी भिजून त्यास मोड येतो आणि त्यापासून रोपटे तयार होऊन मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येते.  

शेतीच्या दुसऱ्या प्रकारात शेतात पाटाचे पाणी आधीच सोडण्यात येते आणि पाण्याने ओली झालेली जमीन नांगरली जाते आणि या जमिनीत प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. यामध्ये पक्व झालेल्या भाताचे रोपटे पाच सहा वेळा उन्हात सुकवण्यात येते आणि त्याच्या मुड्या बांधल्या जातात आणि ते पीक जमिनीत लावण्याचा काळ समीप आल्यावर आठ दिवस त्या मुड्या एकावर एक रचून त्यांवर चार पाच दिवस सकाळ संध्याकाळ पाणी ओतले जाते किंवा त्या मुड्या पाण्याच्या स्रोतात बुडवल्या जातात.

कालांतराने त्यांना मोड आले की त्या मुड्या फोडून त्या एका जमिनीवर एकत्र केल्या जातात आणि मुठी मुठीने शेतात लावल्या जातात.

दुसऱ्या प्रकारात एका शेतातील रोप काढून दुसऱ्या शेतात लावण्यात येते मात्र या शेतात ओलावा असावा लागतो आणि त्यात वाढलेले निढण उपटून टाकावे लागते. काही महिन्यांत शेतातील भाताची रोपे उंच वाढतात आणि त्यांच्या शेंड्यांवर कणस येतात. या कणसांना लोंबी असे म्हणतात आणि यामध्ये तांदूळ असतात.

या लोब्यांवर ऊन पडून त्या तांबूस रंगाच्या झाल्यावर शेतकरी त्यांची मुळे जमिनीवर चार अंगुळे ठेवून विळ्याने शेत कापतो ज्यास कापणी असे म्हटले जाते. कापणी झाली की भाताच्या पेंढ्या बांधल्या जाऊन त्या खळ्यात घेऊन जातात. खळे म्हणजे शेताजवळील उंच जागा. तेथे पेंढ्यातून कणसाचे भात काढण्यात येतात. या प्रक्रियेस मळणी म्हणतात.  

मळणी करताना पायाचा, बैलांचा अथवा झोडपणीचा वापर केला जातो. मळणी केल्यावर भात आणि पेंढा वेगळा होतो.

आपल्या कृषिव्यवस्थेत खरीप आणि रब्बी हे पिकांचे दोन प्रकार असतात ते म्हणजे पावसाळ्यात तांदळाव्यतिरिक्त ज्येष्ठ महिन्यापासून अश्विन महिन्यापर्यंत जी पिके तयार होतात त्यांना खरिपाचे पीक म्हणतात तर कार्तिक महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जी पिके होतात त्यांना रब्बीचे पीक असे म्हटले जाते.

तर ही होती आपल्या पारंपरिक कृषी प्रक्रियेची थोडक्यात माहिती. कृषी व्यवस्था ही खऱ्या अर्थी भारतास व मानवास मिळालेले एक वरदान आहे आणि त्याचे श्रेय हे अपार मेहनत घेऊन शेतात राबणाऱ्या बळीराजास जाते.