सुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला

रसाळ, सुमार, महिपत दुर्गत्रयी मधला किल्ले सुमारू उर्फ सुमारगड. मार्च महिन्यातील होळीचा सण ४ दिवस दुर्गराज रायगडावर साजरा झाला, अन आठवडाभरात करोना लॉकडाऊन घोषित झाला, सगळेच पिंजऱ्यात अडकलो, रायगडावरच्या मुक्त भटकंती नंतर ते आणि प्रकर्षाने जाणवलं.

सुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला
सुमारगड

नोव्हेंबर 2020 सुरू झालं, थोडीशी दार किलकिली झाली आणि दोन किल्याची थोडीफार भटकंती केली, तोवर वर्ष अखेर जवळ आली, दरवर्षीच्या शिरस्त्याने सेनापतीला आठवण केली यावर्षी काय ? कुठे ?? कधी ??? आणि जायचं ना !

सेनापतींनी इशारा दिला यावेळी रसाळ, सुमार, महिपत ! मी म्हणल रसाळ, महिपत ठीक पण सुमारपण ? म्हणला सुमार तर मेन आहे! उडालोच !! नेहमी रसाळ, सुमार, महिपत करताना सुमार लांबूनच टाटा, बायबाय करतो, वाकुल्या दाखवत अंगठा दाखवत राहतो,

असो, या सुमारची खरी ओळख दावली ती आप्पांनी, "गोनिदा" नी त्यांच्या "दुर्गभ्रमणगाथा" मध्ये काय वर्णन केलंय सुमारला भिडायच, झक्कास...

रात्रीच खेडच्या भरण्या नाक्यावर पोहोचलो, सकाळी पेट्रोल पंपावर दापोलीच्या रेवाळे भिडूना भेटलो अन स्वारी निघाली सुमारला...

पेट्रोल पंपाच्या उजव्या हाताच्या रस्त्यांनी निघालो, रस्त्यात रसाळगडचा फाटा मागे टाकला नी, पोहोचलो थेट वाडी मालदे गावी, गारवा होताच, पूर्वेला चकदेव आडून सूर्योदय झाला, अंन गावाच्या मागे दोन डोंगराच्या आडून सुमारगडची टोपी दिसली, तोवर गावातली मंडळी आजूबाजूला जमा झाली, रस्ता बेकार हाय! इथून जवळ दिसतय पण घामटा काढल!! तुमी पहिलं गेलाय का तिथं!!! गेल्या आठवड्यात वाघरानी गावात जनावर मारलंय!!!! एक ना अनेक प्रश्न ? पण गावचा पाटील दापोलीच्या भिडूच्या ओळखीचा!

त्याच्याच घरी चहा घेतला नि निघालो,

घराच्या मागेच गडावरून खाली आणलेल्या देवी भोलाईच सुंदर देऊळ आहे, त्याच्या बाजूने थोडं पुढे आलो की चढाई सुरु, गर्द झाडीतून तर कधी कारवीतून, ओढ्यातून, कधी गवताच्या सोन्यातून, तर कधी कड्यावरच्या वीतभर पाऊल वाटेवरून, दीड, दोन तासाच्या अवघड चढाई नंतर आपण पोहोचतो सुमारच्या तांदळ्या समोर...

त्याच देवपण डोळयांत भरलं, ऊन मी म्हणत होत, गच्च झाडीतून उघड्यावर आलो होतो, पाणी पिऊन ताजेतवाने झालो, समोर पहिली शिडी साद घालत होती, पण एक भिडू इथंच गळला...

शिडीकडे निघालो, तांदळाला भिडलो, खाली मुरमाड घसारा, बाजूला खोल कडे, उन्हाचा चटका, शिडी भर उन्हात तापली होती, अगोदरच चढाईच्या श्रमाने घामट्या निघाला होता, पाय गळ्यात आले होते, सुखकर ती एकच गोष्ट, म्हणजे हाताला धरायला कारवी होती...

पहिली शिडी पार केली, सुमारला चिकटलो, दुसरी शिडी काही पत्ताच नाही, सुमारच्या त्या मुरमाड वीतभर पायवाटेने, त्याला डाव्या हाती ठेवून पुढे निघालो, जवळपास 180° चा ट्रॅयव्हरस चालून पार झाला, एक छाती एव्हढा शिलाखंड पार केला आणि गडाच्या सावलीत आलो तर समोर चक्क स्वच्छ पाण्याने भरलेले गुहा टाके, धावलो नि पहिल्या बाटल्या भरल्या ते थंडगार पाणी पोटात रिचवल , थोडं पुढं झालो वाटेत डाव्या हाती आणि एक टाक आणि चौकोनी खोदीव गुहा आढळली आणि समोरच खोदीव पायऱ्या अन दुसरी शिडी...

पहिल्या शिडी नंतर जवळपास तासाभराने इथं आलो, शिडीवरून जाताना खाली डोकावलं, खाली पायऱ्या तोफेनी उडवलेल्या आहेत, त्यामुळे बाजूला खोल दरी दिसते, इंग्रजांनी या पायऱ्या उडवल्यामुळे हा गड बेबसाऊ आणि अतिदुर्गम झाला,

या दोन्ही शिड्या ज्यांनी बसवल्यात त्यांच खरंच कौतुक करावं तेव्हढं थोडं, इथपर्यत यायलाच पाय गळ्यात येतात, ह्या पोरांनी ही सामग्री इथे कशी आणली काय जाणे! शिवनिष्ठा आणि काय!!

दुसरी शिडी पार केली, पुढे 5,6 घडीव पायऱ्या आहेत, पहिल्या पायरीवर उभं राहून दम खाताना गोनिदा च दुर्गभ्रमणगाथा मधील स्वगत आठवलं, सुमार सर झाला...

गडाची दरवाजाची कमान शिल्लक नाही, पण दगडी उंबरा मात्र अजूनही जागेवर आहे, पायरी चढताना डाव्या हाती पहारेकऱ्यांच्या देवडीत सतीशिळा दिसते, थोडं पुढेच आणखी एक खोदीव गुहा आढळते, येथून पुढे डाव्या हाती वळसा घायचा, बालेकिल्याचा प्रस्तर उजव्या हाती ठेवत गवता भरल्या वाटेने पुढे झाल्यावर, दूरवरून झाडाखाली मंदिराचे अवशेष दिसतात, आयताकृती मंदिर अवशेषांच्या आत बरीच कोरीव देवदेवतांच्या मूर्ती, अवशेष आहेत, त्याचे दर्शन घायचे आणि मागे लक्ष वेधणाऱ्या पाण्याच्या मोठ्या टाकी समूहा कडे निघायचे, येथे खूपच मोठ्या दगडी खोदीव टाकी आहेत, त्यावर हिरवाई दाटली आहे पण याच्या बाजूला एक लहान, स्वच्छ पाण्याने भरलेले खोदीव टाके आहे, लोहगडाच्या माथ्यावरील टाक्यांची आठवण करून देणारे हे टाके, पाण्याच्या चवीने सिंहगडाच्या देवटाक्याची आठवण करून देते, एकदम अमृतासम...

या टाकी समूहाच्या पश्चिमेला एक खोदीव गुहा आहे, हे आहे गडावरील श्री शंकर, सुमारेश्वराचे मंदिर! गुहेत शंकराची पिंडी असून गुहा स्वच्छ आहे, गुहेमध्ये संवर्धनाची अवजारे आणि जेवणाची भांडी आहेत, इथून निघताना वाटेतील आणि एक जमिनीस समतोल असणारे खोदीव टाके आहे, ते पहायचे आणि पुढे पश्चिमेकडून बालेकिल्ल्यावर जाताना वाटेवर उजव्या हाती खोदीव दगडी खांब टाके आहे ते पहायचे , इथे आत उतरण्यास पायऱ्या आहे पण आतील पाणी हिरवे, गढूळ असून, आत झाडी वाढलेली आहे, तिथून उजवीकडे अजून थोडं चढून वर बालेकिल्ल्यावर यायचे, एक झाडाला बांधलेला भगवा जरीपटका भरभरून फडकत होता, त्या गवता भरल्या माथ्यावरून पूर्वेला समोर किल्ले महीपत दिसला अन बाजूला चकदेव, पूर्वीच्या ट्रेकचे रस्ते धुक्याभरल्या वातावरणात धुडाळू लागलो, मागे रसाळ दिसला, प्रतापगड, मंगळगड, प्रचितच्या दिशेचा अंदाज घेऊ लागलो, मागे पालगड दिसतो काय शोधू लागलो, पण धुक्याच्या चादरीने पडदा घातला, ऊन मी म्हणत होत, पोटात कावळे ओरडू लागले, खालच्या भिडूची आठवण झाली, परतीला निघालो, खूप वर्ष वाट पाहिली या सुमारगड ऍंगायला, आज भरून पावलो...

मित्रानो हा किल्ला छोटेखानी असला तरी समृध्द किल्ला म्हणून लागणाऱ्या सर्व खाणाखुणा बाळगून आहे, इतिहासात पुरंदरच्या तहात ह्याचा किल्ले सुमारुगड असा उल्लेख आहे, ह्याच्या अंगाखांद्यावर असणाऱ्या घडीव पायऱ्या, थोडीफार तटबंदी, गुहा, पाण्याची टाकी, खांबटाकी याच प्राचीनत्व अगदी शिलाहार काळापर्यंत सिद्ध करतात, रसाळगड, महिपतगड यांचा हा साथीदार, सुमारगड,!

पालगड, बाणकोट, मंडणगड, प्रर्णालकदुर्ग, सुवर्णदुर्ग याच्या साखळीतील महत्वाचा दुवा असणार हे निश्चित...

मित्रानो, किल्ल्यावरील वाट जरी आता दोन शिड्या लावल्या आहेत तरी अवघड, अनगड आणि मोडलेली आहे, खूप साऱ्या ढोरवाटा, गर्द जंगल, स्थानिक वाटाड्या घेऊन जाणे उत्तम, गाव सोडल्यावर वाटेत पाणी नाही, नवखे आणि मोठे ग्रुप घेऊन जाणे टाळा, किल्याची काळजी घ्या..

- ऍड हेमंत वडके