भवानगड - मराठ्यांच्या वसई विजयाचा साक्षीदार
मराठ्यांच्या वसई, माहीम मोहिमेचा शिलेदार, दांडाखाडीचा रक्षक, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार, भवानगड, भवानीगड उर्फ भोंडगड उर्फ किल्ले भुवनेश्वर.
पालघर जिल्ह्यात, पश्चिम रेल्वेवरील सफाळा स्टेशनला उतरून दातीवरे रस्त्यावर असणाऱ्या गडपायथ्याच्या भवानगड पाड्याला अर्ध्या तासात पोहोचलो की, रस्त्यावर उजव्या हाती (forest) जंगल खात्याने लावलेला किल्ले भवानगड नावाच्या फलका समोर असणाऱ्या बंद गेट समोर पायउतार व्हायचे, बाजूच्या अर्ध्या दिंडीतून गेटमध्ये प्रवेश करून दिसणाऱ्या मातीच्या प्रशस्त चढण रस्त्याने पायगाडी सुरू करायची, आजूबाजूला जंगलखात्याने लावलेल्या पक्षी, प्राणी छायाचित्रे बघत आणि माहिती वाचत, एक डावा वळसा मारला की ५ व्या मिनिटाला, आपण तटबंदी फोडून तयार केलेल्या रस्त्याने आपण प्रवेश करतो ते किल्याच्या माचीवर...
मोठाले दगड, माती एकमेकांवर रचून साधारण सहा ते आठ फूट रुंद आणि पंधरा,वीस फुटाची तटभिंत आढळते, माचीवर उजव्या हाती भवानगडेश्वर शिव मंदिर आहे, मंदिराला कुलूप असल्याने बाहेरून सभामंडपातील नंदी, गणेश, कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन, देवळाबाहेरील नव्याने बसवलेल्या संगमरवरी पादुका आणि देवी एकविरा मातेचे दर्शन घ्यायचे अंन माचीवरील पायवाटेने पुढे व्हायचे, या माचीवर जंगलखात्याने केलेली लहान मुलाची खेळणी असलेली छोटेखानी बाग आहे. ती मागे टाकली की मागे मोठमोठ्या झाडाच्या मुळानी ताबा घेतलेली वीस, पंचवीस फूट उंच तटबंदी दृष्टीस पडते, डाव्या हाताने नेणारी पायवाट थेट किल्याच्या महाद्वाराच्या जवळ पोहोचवते. गडाच्या पश्चिम दिशेला, या गोमुखी रचना असणाऱ्या महाद्वाराची कमान आता शाबूत नाही परंतु चुनेगच्ची बांधकाम केलेले भरभक्कम बुरुज आजही शाबूत आहेत, पायऱ्या ओलांडून, आत प्रवेशल्यावर, डाव्या बुरुजात बांधलेल्या पहारेकराच्या देवडीचे अंन दरवाजाचा अडसर, अडगळा अडकवायच्या बवळीचे अवशेष आढळतात...
किल्यात प्रवेशल्यावर ध्यान वेधतात ते भग्न अवशेष व मोठाले दगड एकमेकावर ठेवून बांधलेली गडाची तटबंदी. डाव्या हाताला वळसा घेऊन थोड पुढे आलो की आपण पोहोचतो किल्याच्या दुसऱ्या दरवाजा जवळ...
या दरवाजाचीही कमान शाबूत नाही, मात्र बालेकिल्ल्याची पायरी, बाजूचे बुरुज आणि उंच तटबंदी नजरेत भरते, आत दरवाजा समोरच एक पाण्याची टाकी आहे, त्यावर आतबाहेर सिमेंटचा गिलावा करून, वर जाळी लावलेली आहे. टाक्यामध्ये पाणी आहे यामुळे टाक्याचा नक्की काळ लक्षात येत नाही, आता बाजूच्या तटावर चढून बालेकिल्ल्याची फेरी सुरू करायची. आंबा, काजू, नारळ, वड, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या गर्द झाडीने भरलेला गडाचा माथा फार मोठा नाही, टाकीजवळ उभे राहिले असता.
तटावरून पुढे दूरवर दांडाखाडीचा परिसर पहात असताना या किल्याचे प्रयोजन लक्षात येते, किल्ल्याचा परिसर न्याहाळताना पूर्वेस तांदुळवाडी, त्याच्या बाजूस काळदुर्ग रांग, मागे वैतरणा खाडी असा दूरवरचा नजारा टप्प्यात येतो, गडाचा माथा आटोपशीर आहे. अगदी लहान टेकडीचा उपयोग करून हा किल्ला बांधलेला आहे, आतील तुटलेल्या तटावरून खाली जाणाऱ्या पायवाटेने उतरलो की गर्द झाडीत एक भुयार आहे. मात्र वाट मोडली असल्याने, तिथंपर्यंत पोहोचणे सध्या दुष्कर झाले आहे, त्यामुळे पुन्हा आल्या मार्गी परत येऊन पुन्हा तटफेरी चालू करताना, दोन शौचकूप सदृश बांधकाम दक्षिण तटातील आंब्याजवळ आढळतात, ह्याच बाजूस किल्याच्या आतल्या बाजूस बांधकामास दगड काढल्याने, तयार झालेला, पाणी साठवणीचा सुकलेला तलाव आहे, येथून पुढे आल्यावर आपण गोमुखी बांधणीच्या पहिल्या दरवाजाच्या उजव्या बुरुजावर पोहोचतो. गोमुखी दरवाजाचे bird eye view निरीक्षण करायचे आणि तटावरून पुढे भगवा ध्वज असणाऱ्या दुसऱ्या दरवाजाच्या बुरुजावर पोहोचलो, की इथेच आपली भवानगड फेरी पूर्ण होते...
ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास केल्यास,
इस १७३७च्या आसपास पोर्तुगीजांनी स्थानिक जनतेवर केलेल्या जुलूम, अत्याचाराच्या तक्रारी पुण्यास पेशवे दरबारात पोहोचल्या, त्यास पायबंद घालण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पाच्या नेतृत्वाखाली सरदार गंगाजी नाईक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर आणि इतर सरदाराची फौज मुक्रर केली गेली.
पोर्तुगीजांनी या परिसरात दांडा किल्ला, केळवे पाणकोट, केळवे किल्ला, फुटका बुरुज अश्या विविध किल्ले अंन पाणकोटाची फळी उभी केली होती. वसई, माहिमच्या मोहिमेत क्षणोक्षणी दांडा खाडीवर लक्ष ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे हा परिसर ताब्यात घेण्यासाठी आघाडी सुरू करण्याचे वेळी पोर्तुगीजांच्या साखळीतील कच्चे दुवे तोडण्यासाठी त्या समोरच मोक्याच्या ठिकाणी स्वतःचा दुसरा किल्ला असणे, चिमाजी आप्पांना आवश्यक वाटल्याने, इस १७३७च्या पावसाळ्यात दोन हजार मजूर कामास लावून केळवे माहिमच्या दक्षिणेस भवानगड बांधला.
चिमाजी आप्पांच्या एका पत्रात या किल्ल्याच्या निर्मिती संबंधात एक उल्लेख येतो तो असा, "दांडा-खटाली जवळ एक उंच टेकडी आहे. तिजवर अभेद्य तटफेल्या बुरुज बांधणे तत्काल गरजेचे आहे."
माहिमच्या किल्ला पोर्तुगीजाकडून घेताना युद्धात भवानगडचा बराच उपयोग झाला. या संबंधात सरदार शंकराजी केशवांनी चिमाजी आप्पांना पाठवलेल्या पत्रात असा उल्लेख सापडतो की, "माहिमच्या मोहिमेसाठी भवानीगडा पैकी चारशे माणूस शंकराजी केशवांनी सोबत घेतली, सामान तो भवानीगडास पोचविले असे. दारुगोळीहि किले मजकुरी पावली. येणेप्रमाणे सिद्धता केली असे. स्वामींनी लिहिले की द्वादशी त्रयोदशीस माहिमास जाऊन लिहिणे त्यावरून येकादसी भोमवारी भवानीगडास येऊन स्वामी माहीमास येताच सेवेसी हाजीर होतो."
यावरून वसई, माहीम युद्धाच्या धामधुमीत भवानगडाच्या संरक्षणासाठी मोठी शिबंदी, शस्त्र सज्जता ठेवल्याचे लक्षात येते.
पुढील काळात मात्र भवानगडाचा इतिहास मौन बाळगतो...
खरंतर एका खाजगी कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो, पण घरच्या मंडळीचा थोडासा रोष पत्करून, भटकंती करताना मागे राहिलेला हा भवानगड किल्ला पाहिला.....
भवानगड अगदी डांबरी सडके लगत आहे, फार काही चढ नाही. त्यामुळे या मराठ्याच्या या स्मारकास, सर्व वयोगटातील मंडळी भेट देऊ शकतील. फाटक उघडे असेल तर, जंगल खात्याने तयार केलेला चढण सडक, रस्ता अगदी किल्याच्या माचीवरील भवानगडेश्र्वराच्या मंदिरा पर्यंत चारचाकीने पोहोचवेल, मात्र यासाठी तोडलेली माचिची तटभिंत माझ्या सारख्या भटक्याचे मन निराश करते!!!
जंगल खात्याने लावलेल्या पक्षी, प्राणी छायाचित्रे वजा माहिती फलक खरंच स्वागतार्ह... परंतु दुर्दैवाने यामध्ये मूळ भवानगडाची माहिती सांगणारा एकही फलक आढळला नाही! ना आढळले स्थल, दिशादर्शक फलक!! याचे फार वाईट वाटते. बाग, गाडीरस्ता या पेक्षाही किल्याच्या तटभिंती, बुरुजांना आता खरचं गरज आहे गड संवर्धनाची...
अंन म्हणूनच भवानगड विस्मृतीत जाण्याआधी, सर्वांनी मराठ्यांचा इतिहास जागवणाऱ्या या भवानगडास नक्की भेट द्यायला हवी. तर मग कधी निघताय भेटीला, भवानगडच्या...
- ऍड. हेमंत वडके