किल्ले मृगगड

मित्रहो, ट्रेकिंग म्हणजे जनसेवा समितीचा आणि त्यासोबत संस्थेतील जवळपास सर्वांचा श्वासच! गेली ११ महिने सर्वजण ह्या ट्रेकिंग पासून विलग झाले होते जणू काही नवीन असामान्य गोष्ट घडत होती आणि ते कोणालाही आवडत नव्हते.

किल्ले मृगगड

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पण हळू हळू परिस्थिती पूर्ववत होत असल्याने आणि ट्रेकिंगची अनुमती मिळाल्याने बरं वाटलं. तरीही संस्थेने घाई न करता सुरक्षा लक्षात घेऊन एक दिवस ठरवला. ह्या ट्रेक चे लीडर्स होते यंग ब्रिगेडचे चे जान्हवी बोरले आणि यशोधन देवधर! अर्थातच खबरदारी घेणे हे अनिवार्य होते म्हणून काही ठराविक तरुणांना ह्या ट्रेक मध्ये सामील करण्यात आले. ठिकाण ठरले आणि ते म्हणजे आडवाटेवरील पाली जवळील जांभूळपाड्यापाशी फल्याण गावात असलेला मृगगड हा किल्ला!

ट्रेक ठरल्यावर सर्व नियोजन चालू झाले. कधी निघायचं, कोठे थांबायचं, बस बुकिंग, किती खर्च होईल, ट्रेकचं शेड्युल कसे असेल, नाश्त्याला काय असेल, इत्यादी अनेक कार्यक्रम ठरले आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. बोलता बोलता ट्रेकचा दिवस (खरंतर रात्र) उजाडली. ह्या वेळी मात्र सामानाच्या लिस्ट मध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने होत्या त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरील अलंकार बनलेला मास्क आणि कधी नव्हे ते वापरणारे हॅण्ड सॅनिटायझर! आयुष्यात कधीही कोणीही ट्रेक ला ह्या गोष्टी नेण्याची कल्पना केली नसेल. असो. बसमध्ये चढणायपूर्वो सर्वांचे थर्मल स्क्रिनिंग झाले आणि यशोधन ने नारळ तोडण्याचा सोहळा करून ट्रेकचा श्रीगणेश केला आणि गणपति बाप्पा मोरया च्या जयघोषात बस निघाली!

पण, वाटेत काहीच अंतरावर गाडी काही तांत्रिक कारणाने थांबली. आमच्या गाडीच्या यांत्रिकाने ती तांत्रिक बाजू सांभाळून घेतली आणि पुन्हा गाडी सुरू केली. वाटेतील काही पीक अप्स करीत आम्ही पुढे जात होतो.

रात्रीच्या १.३० च्या सुमारास आम्ही जांभूळपाड्यातील पंडितांच्या छानशा अश्या नेहमीच्या ठिकाणी थांबलो. थोडे झोपलो (कदाचित) .

पहाटे ५ वाजले आणि हळूहळू सर्वजण सूर्याच्या आधी उगवू लागले! “पहाटे” ६ वाजता सगळ्यांना भूका लागल्या होत्या. नाश्त्याला मस्तपैकी चविष्ट अश्या मिसळीचा बेत होता सोबत चहा पण होता. ६ वाजता सर्वांनी मिळून मिसळून त्या मिसळीवर आक्रमण केले!आणि सर्वजण ट्रेक साठी तयार झाले. पण…..

असं म्हणतात ना की शुभ कार्यात अडथळे येणे म्हणजे कहानी मे ट्विस्ट. गाडी चालूच होईना! सर्व बहुबलिनी आपली हल्क पॉवर वापरून गाडीला दे धक्का दिला पण गाडीनेच आम्हाला धक्का दिला, कारण गाडी काही सेंटीमीटर पण पुढे गेली नाही. गाडी सुरू व्हावी यासाठी अनेक तज्ञ मंडळींच्या तज्ञांच्या टिप्पण्या आल्या. शेवटी मात्र राजेंद्र काका आणि मी असे दोघांनी एका ट्रक ला थंबवून त्याच्या कडून साधने घेतली आणि आमच्या चालकाने त्या ट्रक ड्रायवर च्या मदतीने गाडी सुरू केली! हे करण्यात जवळपास ४५ मिनिटे गेली. एक तासाभरात गडाच्या पायथ्याशी फल्याण गावात पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर ट्रेक लीडर्सनी नी सूचना दिल्या. सोबत गावकरी मित्र श्री. पांडुरंगभाऊ भाकरे आम्हाला वाट दाखवायला आमच्यात सामील झाले. किल्ला चढायला साधारणपणे दीड तास लागतो.

मृगगड हा सुधागड तालुक्यांतील सह्याद्री च्या रांगेतील एक छोटेखानी किल्ला. तसा ह्या किल्याला फारसा इतिहास लाभला नाही पण ह्या सभोवताली लाभलेली भौगोलिक पार्श्वभूमी, तेथील जंगल हे वैशिट्य. ह्या किल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे फल्याण गावातून आणि दुसरे म्हणजे किल्याच्या दक्षिणेला असलेलं भेलीव गावातून. किल्यावर चढताना दाट जंगल लागते. हिवाळा सुरू झाल्याने अनेक अनेक पाने सुकून पडली होती. छान अश्या गर्द झाडी मधून आम्ही चालत होतो. वाटेत थरारक असे काही रॉक पॅचेस लागले. तेथून चढाई करताना सर्वानीच थरार अनुभवला. साधारणपणे अर्ध्या तासाने गडाच्या मध्यावर पोहोचलो. थोडा विश्राम घेऊन पुन्हा निघालो. गडावर काही ठिकाणी पायऱ्या कोरून ठेवल्या आहेत. दोन तासाच्या वेळेने आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. परागने आपल्या नेहमीच्या सुंदर शैलीने तेथील थोडका इतिहास सांगितला. गडाच्या उत्तरेकडे उधळ्या डोंगर दिसतो व पूर्वेला मोरडीचा सुळका आणि INS SHIVAJI आहे. अंबा नदीच्या मार्गात हा किल्ला येतो. दक्षिणेला तीन सुळके असलेलं घोडेजीन व त्याच्या अग्रभागी नेसणीची खिंड आहे।

तेथील इतिहास व भूगोलाची माहिती करून घेतल्यावर एका गुहेत आम्ही काहीजण गेलो. जाणे आणि येणे हे जरा कठीणच होते कारण एका मोठ्या रॉक पॅच ला कोरलेल्या पायऱ्या आणि दुसरीकडे खोल दरी! गुहेत गेल्यवर सर्वजण फोटोग्राफी करण्यात मग्न झाले. ह्या गुहेतच बसून सर्वांनी जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाबाजी केली आणि पूर्वेकडील सारा परिसर निनादून गेला. आम्ही पुढे किल्ल्यावरील काही अवशेष बघण्यासाठी निघालो. गडावर पाण्याची टाक सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे त्या टाकात उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत.तेथील पायऱ्यांची बांधणी पेशवे कालीन आढळते. वाटेत महिषासुरमर्धिनी ह्या देवीचे छोटे शिल्प सुद्धा आहे. गडाची दोन्ही टोक बघितली आणि संपूर्ण गड पाहण्यात साधारणपणे २ तास गेले. आता वेध लागले परतीचे.

खरंतर फार वेळ लागला नाही म्हणून गडावरून खाली उतरून डबा खायचे ठरले. खाली उतरून एका नदी पाशी थांबलो. त्या नदीतील पाणी पिऊन सर्वजण रीफ्रेश झाले. मग उघडले सर्वांचे डबे आणि सर्वांनी आणलेल्या चविष्ट पदार्थानी ने पोट भरले. पांडुरंगभाऊंचा आणि गडाचा निरोप घेऊन आम्ही निघालो. वाटेत तिवरे गावात असलेल्या बाळाजी आवजी चिटणीस ह्यांची समाधी पाहण्याच भाग्य लाभले. बाळाजी आवजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव होते. दुर्दैवाने इतिहासात महाराजांच्या निकट असलेल्या अनेकांचा बळी गेला होता त्यापैकी बाळाजी आवजी चिटणीस एक. आता तेथे एक शेड बांधून आणि दिवाबत्ती करून ती समाधी जपण्याचे कार्य सुरू आहे. समाधीचा निरोप घेत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.

वाटेल पुन्हा एकदा पंडितांकडे थांबलो. निघताना ओळख परेड झाली, काही नवीन जण ह्या ट्रेकला नाशिक व औरंगाबादहुन आली होती. . आणि शेवटी निघालो.

ह्या ट्रेकची अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यातील तीन वैशिष्ट्ये मी सांगतो. एक म्हणजे काही नवीन तर काही जुने मित्र ह्या ट्रेकला आलेले. दुसरं नवीन मंडळींपैकी दोन जण नाशिक व औरंगाबाद येथून आली होती. आडवाटेवरील किल्ला असल्याने इतर कोणीही तिकडे नव्हते. थोडक्यात आपलाच एकाधिकार होती आणि तिसरं म्हणजे. मार्गशीर्ष महिन्यात केलेला हा मृगगड! मार्गशीर्ष म्हणजे रात्रीच्या आकाशात रात्रभर दिसणारे मृग नक्षत्र आणि अश्या महिन्यात केलेला हा मृगगड!

जवळपास वर्षभराने केलेल्या ह्या ट्रेकमुळे सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. हा ट्रेक संपूर्णपणे यशस्वी झाला. आणि हे ”यश”रुपी बीज ज्यांनी “बोरले”” ते म्हणजे यशोधन देवधर आणि जान्हवी बोरले या दोघांचे कौतुक. शाब्बास!!

शेवटी सह्याद्रीला एव्हढेच सांगायचं आहे आणि ते म्हणजे “आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ!

- अंबरीश अनंत पवार