ताम्हिणी घाटाच्या निर्मितीचा इतिहास

१९८१ ते २००१ या भारतीय रस्ते विकास योजनेअंतर्गत इंडियन रोड काँग्रेसने १९८४ साली ताम्हाणी घाटाला मंजुरी दिली. याच घाटाचे काम कुठवर प्रगतीपथावर आहे हे पाहण्यासाठी आम्ही पत्रकार मंडळी ताम्हाणी घाट चढत होतो.

ताम्हिणी घाटाच्या निर्मितीचा इतिहास
ताम्हिणी घाट

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सन १८२६ मध्ये पूर्वीच्या कुलाबा जिल्हयात पुण्याहून तीन रस्ते येत होते. एक मार्ग पुण्याहून सावे घाटात संस्थान ओलांडून कुलाबा जिल्ह्यातील उन्हेरे येथे प्रवेश करून राबगाव व चिकणीवरून नागोठण्यापर्यंत जात होता. या १०३ कि.मी. रस्त्याचा १९ कि.मी. भाग कुलाबा जिल्ह्यात येत होता. पुणे-रत्नागिरी या दुसऱ्या २६२ कि.मी. लांबीच्या या रस्त्याचा ६१ कि.मी. भागही कुलाबा जिल्ह्यात येत होता. तो रस्ता जिल्ह्यात शेवटच्या घाटात प्रवेश करी व रायगड नदी पार करून पुढे दहिवड, बिरवाडी, खरोशी, माटवण, कणधुळे या गावातून पुढे सावित्री नदी ओलांडून पोलादपूर येथे जात असे. पोलादपूरनंतर सावित्रीस २२ ठिकाणी ओलांडून पोलादपूरच्या दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावरील गोंगारा घाटात हा रस्ता प्रवेश करून जिल्ह्याचा निरोप घेत असे.

पुणे ते गोरेगाव (घोडेगाव) पर्यंत जाणारे दोन रस्ते होते. त्यापैकी कुंभा घाटमार्गे निजामपूरहून गोरेगावला जाणाऱ्या मार्गाची लांबी १०५ कि.मी. होती. त्यापैकी १०५ कि.मी. भाग कुलाबा जिल्ह्यात होता. निजामपूरनंतर हा मार्ग काळ नदी पार करून कटापे या गावाहून जात असे. या मार्गावर जिल्ह्यात हरवंडी, ताम्हणे, पळसगाव, हातकेणी, तळेगाव, कुरवडे आणि वडगाव ही गावे येत होती. म्हणजे आपण आज ज्याला ताम्हाणी घाट म्हणतो त्या घाटाचे नाव ताम्हाणी या गावावरून पडले ते गाव १८२६ मध्ये पुणे ते गोरेगाव (घोडेगाव) या मार्गावर होते हे आपणास लक्षात येईल, आजही हे गाव तेथेच आहे. शासनाच्या रस्ते विकास योजनेअंतर्गत १८२६ मधील या जुन्या गोरेगाव-पुणे मार्गाला दिघी-पुणे-औरंगाबाद मार्ग ताम्हाणी घाट म्हणून मान्यता मिळून या घाटाचे काम सहाव्या अंतीम टप्यात पूर्णत्वाला येऊन २००१ साली हा घाट वाहतुकीस खुला होणार आहे.

हे सर्व वाचत असताना माझ्या बरोबरच्या आणि नंतरच्या पिढीला हा प्रश्न पडणार आहे की, १८२६ मध्ये पुणे-घोडेगाव (गोरेगाव) हा रस्ता सुरू होता तर मग नवीन ताम्हाणी घाटाचे प्रयोजन काय? या प्रश्नाचे उत्तर हेच की, १८२६ मध्ये हा रस्ता ताम्हाणी डोंगराच्या टेकड्यावरून जंगलातून जात होता. रोहे, माणगाव, गोरेगाव, म्हसळे ही तांदुळ व्यापाराची त्यावेळी महत्वाची केंद्रे असल्याने हंगामात या घोडेगाव-पुणे रस्त्यावरून तांदुळ पुणे मार्गे घाटावर नेला जात असे. पावसाळ्यात हा रस्ता (पायवाट) बैलगाडीच्या वाहतुकीस अयोग्य असल्याने तांदळाची बोचकी डोक्यावरून, घोड्यावरून, बैलावरून नेली जात असत. त्यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या या मालात श्रीवर्धनची सुकी मासळी, नारळ, रोठा सुपारी आदींचा समावेश असे. हा सर्व माल पुणे येथे विकून झाल्यावर किंवा या मालाच्या बदल्यात गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, कांदे, मिरची, हळद, शेंगदाणा, गुळांच्या ढेपी इत्यादी माल गोरेगाव येथे येऊन पुढे तो जिल्हाभर आणि समुद्रमार्गे मचव्याद्वारे वितरीत होत असे. पुढे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, वाढती वाहने यामुळे खंडाळा, बोरघाट, वरंधघाट, वाईघाट यावर जोर पडू लागला.

१९८१ ते २००१ या भारतीय रस्ते विकास योजनेअंतर्गत इंडियन रोड काँग्रेसने १९८४ साली ताम्हाणी घाटाला मंजुरी दिली. याच घाटाचे काम कुठवर प्रगतीपथावर आहे हे पाहण्यासाठी आम्ही पत्रकार मंडळी ताम्हाणी घाट चढत होतो. मुसळधार पावसाने या मार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने काही ठिकाणचा रस्ताच धुपून गेला होता. काही ठिकाणी रस्त्यावर माती आली होती म्हणून या ताम्हाणी घाटाचे हे चढणे कधी पायाने, कधी जीपने, कधी डंपरने तर कधी जीसीपीने रोहे तालुक्यातील पत्रकार मंडळी हा घाट चढत होती. सायंकाळ उंबरठ्यावर उभी होती, सह्याद्रीतून उगम पावणारी काळ नदी, डोंगरावरचे लाल पाणी येऊन निजामपूरहून माणगावकडे जाताना दिसत होती. समोर पाहिले तर माणगाव, निजामपूर खोऱ्यातील धरणीवर हिरवेगार आच्छादन पसरले होते. घाटाच्या पायथ्याशी आम्ही ठेवलेल्या गाड्या कांडीपेटी एवढ्या छोट्या दिसत होत्या. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा टप्पा करीत आम्ही घाटाच्या सहाव्या टप्यावर येऊन पोहोचलो होतो, हा सहावा टप्पा समुद्र सपाटीपासून सुमारे ६५० मीटर उंचीवर आहे. या टप्प्याकडे जाताना रस्त्यावर दगड-धोंडे पडले होते. त्यावर पाण्याचा प्रचंड फेसाळणारा प्रवाह होता.

सहाव्या टप्याजवळ पोहोचतो नाही तोच झंझावातासारखा पाऊस आला. नखशिखांत भिजलो, तरी कड्यावरून धरणीकडे झेपावणारे पाणी स्नान घालीत होते. या टप्प्यावरून निसर्गाच्या विविध अंगाचे दर्शन घडत होते. हिरव्यागार डोंगराच्या माथ्यावरून धरणीकडे झेपावणारे निर्झर अधून-मधून चिवचिवाट करणारे आपले पूर्वज, वेगवेगळे पक्षी सारं काही मन तृप्त करणारं वातावरण, सचिन शेडगे आपल्या व्हिडिओ कॅमेरात तर ज्ञानेश्वर दळवी आपल्या प्रेस कॅमेरात हे चित्रण बंदिस्त करीत होते. रोहे तालुका पत्रकार संघाने यापूर्वी जे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यातील 'रोहे वार्ता' या नवीन उपक्रमासाठी तालुक्यातील पत्रकार ताम्हाणी घाटात मार्गस्थ झाले होते. ताम्हाणी घाटाचे हे चित्रण रोहे तालुक्यातील केबलधारकांना दिसावे म्हणून ताम्हाणी घाटाचे सचित्र चित्रण शेडगे बंधूंकडून होत होते. त्यासाठी घाटाची पूरक माहिती मिळण्यासाठी रोहे तालुक्यातील बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता पवार व घाट बांधणारे फिनिक्स कन्स्ट्रक्शनच्या प्रतिनिधीला पत्रकार संघातर्फे आमंत्रित करण्यात आले होते. महाड विभागाचे कार्यकारी अभियंता साळुके यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता, उपअभियंता अप्पासाहेब पवार, शाखा अभियंता माळिया सूरभोड, अधीक्षक अभियंता पोळ ही सर्व मंडळी ताम्हाणी घाटासाठी काम करीत आहेत. त्यासाठी फिनिक्स कन्स्ट्रक्शन, प्रकाश बिल्डर्स असोसिएट, मुंबई या कंपन्या ताम्हाणी घाटासाठी आपल्या अवजारांसह कार्यरत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या १९८१ ते २००१ या रस्ते विकास योजने अंतर्गत पूर्वीच्या पुणे ते घोडेगाव या रस्त्याला मुरुड ते औरंगाबाद असा राज्यमार्गाचा दर्जा दिला असून या मार्गावर मुरुड, रोहे, पुणे, अहमदनगर व औरंगाबाद ही शहरे येतात. पूर्वी या मार्गावर सात-आठ खेडी येत होती, आता रस्त्याची लांबी वाढविल्याने वर उल्लेख केलेली शहरे या मार्गावर येतात. जिल्ह्यातील दिघी बंदर त्याचबरोबर उत्तर-दक्षिण महाराष्ट्राचा विकास लक्षात घेऊन या ताम्हाणी घाटाचा जन्म झाला आहे. घाटातून वाहनाने व दिघी बंदरातून बोटीने मालाची ने-आण करून माल परदेशात निर्यात करणे हा ताम्हाणी घाटाचा आताच्या निर्मितीचा मूळ उद्देश आहे. परदेशी निर्यातीबरोबर रायगड जिल्ह्यात होणारे औद्योगिकीकरण, जिल्ह्यातील विविध पर्यटन केंद्राकडे पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटकांचा ओघ वाढण्यास हा घाट महत्वपूर्ण ठरणार आहे.

आज पुण्याला जाण्यासाठी महाड, श्रीवर्धन, म्हसळा व माणगाव येथील प्रवाशांना वरंध घाटातून किंवा भोर घाटातून पुण्याकडे जावे लागते. रोहे, मुरुड, सुधागड येथील प्रवासी खंडाळा घाटातून पुणे येथे जात असतात. येत्या वर्षभरात ताम्हाणी घाट वाहतुकीस खुला झाला तर रायगड जिल्ह्याला पुणे जिल्हा हाकेच्या अंतरावर येऊन प्रत्येक ठिकाणाहून ४० ते ५० कि.मी. अंतर कमी होणार आहे. पर्यायाने इंधन व वेळ वाचूनही प्रवास सुलभ होणार आहे. रोहे-मुरुड मार्गावरील खाजगी पुलामुळे श्रीवर्धन व म्हसळा ही शहरेही या मार्गाजवळ येणार आहेत. सुमारे १४ कोटी रूपये खर्चाचा हा ताम्हाणी घाट डिसेंबर २० पर्यत वाहतकीस खुला होईल असे गेल्या वर्षी सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष २००० सालाला पाच महिने बाकी असतानाही ताम्हाणी घाट प्रगती का करू शकला नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना कनिष्ठ अभियंता पवार म्हणाले पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारा हा घाट पूर्णपणे डोंगराळ भागातून जातो. या घाटाची लांबी १३ कि.मी. आहे. कमीत कमी वळणे, कमी चढ, रस्त्याची आडवी वळणे, कमीत कमी ४० मी व जास्तीत जास्त १०० मीटर आहेत. परंतु हे सर्व करीत असताना पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या दरडींमळे कामात सतत व्यत्यय येत आहे. अर्थात गेल्या पावसाळ्यात या मार्गावर कोसळलेल्या दरडी दूर करून नव्याने कामाला प्रारंभ करण्यासाठी आठ महिन्याचा काळ गेला.

गेल्यावर्षी केलेले माती काम, खडीकरण, मार्गावरील मोयान पूल या दरडीखाली आल्याने मूळ अंदाजपत्रकातील खर्चाचे काम नैसर्गिक आपत्तीमुळे वाढत आहे, याशिवाय या डोंगरावर असलेले बेसॉल्टचे थर वेगळ्या प्रकारचे आहेत. डोंगरावर असलेले पोहई या खनिजाचे थर सामान्यतः अनेक प्रकारचे व संयुक्त प्रकारचे आहेत. प्रत्येक थरामध्ये तळाकडील भाग नळीसारखा किंवा पुंगळीसारखा असल्याने हा पोहईचा थर मऊ असतो, त्याचे वातावरणात क्रियेने सहज विघटन होते. त्यामुळे रस्त्याच्या माती कटईचे किंवा भरावाचे काम सुरू असताना पावसाळ्याच्या सुरूवातीला दरडी कोसळण्याचे काम वाढत जाते. हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे तयार झालेला हा रस्ता दरडींबरोबर खचून जाऊन या तयार रस्त्याचेच अस्तित्व नष्ट होते. त्यासाठी उपाय काय? या प्रश्नावर पवार म्हणाले, त्याला उपाय एकच. डोंगर कड्याला छेद देऊन रस्ता पाच फुट डोंगरकड्यात घेणे, तसे केले तर नैसर्गिक आपत्तीतही रस्त्याचे आयुष्यमान वाढणार आहे.

हे सर्व होऊनही होणारे नुकसान टाळण्यासाठी फक्त तेरा कि.मी. बोगद्याचे काम करून हे नुकसान टाळता आले नसते काय? यावर पवार म्हणाले, सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे डोंगराच्या प्रत्येक थरातील डोंगराकडील भाग नरम आणि पिंगोळीसारखा असल्याने आणि मूलतः डोंगर भुसभुशीत असल्याने डोंगराला बोगदा पाडला तरी दर पावसाळ्यात बोगद्याची पडझड होईल, त्यापेक्षा कातळ छेदून रस्ता तयार केला तर तांत्रिक दृष्ट्या घाटातील रस्ते जास्त वर्षे टिकणार आहेत. एकूण सर्व भौगोलिक परिस्थिती पाहाता पवार यांचे म्हणणे पटत होते. त्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान वापरून २००१ सालापर्यंत हा रस्ता आम्ही वाहतुकीस खुला करू असे पवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

दुपारी चार वाजता आम्ही ताम्हाणी घाटात शिरलो होतो. त्यानंतर घड्याळाकडे पाहिले तेव्हा पावणेसात वाजले होते. परतायला हवे... निसर्गाने काळोखाची चादर पृथ्वीवर टाकायला सुरूवात केली होती. दीड कि.मी.चा पल्ला वाचविण्यासाठी पायवाट नावाच्या शॉर्टकटने जायचे ठरविले. पावसाने पायवाटही धुपून गेलेली. डोंगरमाथ्यावरून आलेली बारीक दगडे बॉल बेरींगसारखी आमच्या बुटाखाली येऊन एके ठिकाणी मी भुईसपाट झालो होतो, पण पुन्हा उठून लाल मातीने रंगलेले कपडे निरखित आणि हातातील छत्रीचा काठीसारखा आधार घेत आम्ही ताम्हाणी घाटाचा डोंगर उतरत होतो. मुक्कामावर आलो तेव्हा खिशात एक छोटा दगडाचा तुकडा होता. ताम्हाणी घाटाच्या सहाव्या टण्यावरून मुद्दामहून आणलेला तो तुकडा होता. काय होते त्या तुकड्यात? इतर दगड दिसतात तसाच तो तुकडा होता. परंतु त्या तुकड्यात एक श्रद्धा होती. ताम्हाणी घाट आधुनिक तंत्रज्ञान देणारं एक महत्वपूर्ण ठिकाण ठरलं होतं, माझ्या राज्यात, माझ्या जिल्हयात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, परंतु नवीन युगातील माणसा-माणसातील अंतर पूर्वी पायाने आता वाहनाने कमी करणारे ताम्हाणी घाट नावाचे एक नवीन तीर्थक्षेत्र माझ्या जिल्ह्यात जन्माला येत होतं, त्याचा अभिमान म्हणून ताम्हाणी घाटातील सहाव्या टप्प्यावरील तो दगडाचा तुकडा मी श्रद्धापूर्वक मस्तकाकडे नेवून ताम्हाणी घाटाचा निरोप घेतला.

- नवीन सोष्टे (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)