तुका ब्रह्मानंद - शिवकाळातील एक संत व विद्वान

तुका ब्रह्मानंद यांच्या घराण्यात वेदाध्ययन, संस्कृत भाषा यांची परंपरा असल्याने तुका ब्रह्मानंद यांचे उपनयन संस्कार झाल्यावर वडिलांनी त्यांना वेदांचे, संस्कृत व्याकरण आणि अलंकार यांचे शिक्षण दिले.

तुका ब्रह्मानंद - शिवकाळातील एक संत व विद्वान

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्रास संत व विद्वानांची महान परंपरा लाभली आहे. वेगवेगळ्या काळात या संत महात्म्यांनी जन्म घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य केले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील असेच एक विद्वान मात्र काहीसे अपरिचित संत म्हणजे श्री तुका ब्रम्हानंद.

तुका ब्रह्मानंद यांचे मुख्य वैशिट्य म्हणजे त्यांची कारकीर्द ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होती त्यामुळे शिवकाळात होऊन गेलेल्या संतांच्या यादीत तुका ब्रह्मानंद यांचे नाव समाविष्ट आहे.

तुका ब्रम्हानंद यांचा जन्म सातारा येथे एका सुवर्णकार (सोनार) समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नागनाथ व आडनाव कर्मार असे होते. 

तुका ब्रह्मानंद यांच्या घराण्यात वेदाध्ययन, संस्कृत भाषा यांची परंपरा असल्याने तुका ब्रह्मानंद यांचे उपनयन संस्कार झाल्यावर वडिलांनी त्यांना वेदांचे, संस्कृत व्याकरण आणि अलंकार यांचे शिक्षण दिले.

कालांतराने तुका ब्रह्मानंद देवशिल्प या शास्त्रांत सुद्धा निपुण झाले. तुका ब्रह्मानंद हे सुवर्णकार समाजातील असल्याने त्यांच्या वडिलांकडे स्वराज्याच्या सरकार कचेरीतील पोतदारीची अर्थात खजिनदारीची जबाबदारी होती. 

वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी तुका ब्रह्मानंद यांच्याकडे आली व ही जबाबदारी सुद्धा त्यांनी कुशलतेने पार पाडली.

पोतदारीचे काम करीत असताना तुका ब्रह्मानंद यांना संन्यास दीक्षा घेण्याची वारंवार इच्छा होऊ लागली व त्यांनी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांच्याकडून अनुज्ञा घेतली आणि श्री ब्रह्मानंद स्वामी यांना आपले गुरु करून व त्यांचा अनुग्रह घेऊन एका शुभमुहूर्तावर संन्यासदीक्षा घेतली. 

संन्यासदीक्षा घेण्यापूर्वी तुका ब्रह्मानंद हे तुका नागनाथ कर्मार या नावाने ओळखले जात असत मात्र त्यांचे गुरु श्री ब्रह्मानंद स्वामी यांनी त्यांना तुका ब्रह्मानंद हे नवी ओळख दिली.

संन्यासदीक्षा घेतल्यावर तुका ब्रह्मानंद यांनी श्रीब्रह्मानंद स्वामी यांच्या आश्रमात वास्तव्य करून तेथे हठयोगाचे अध्ययन केले आणि प्रस्थानत्रयादी आदी वेदांतग्रंथांचे परिशीलन केले.

तुकब्रह्मानंद हे फक्त एक उत्तम लेखक आणि कवी सुद्धा होते. भर्तृहरी शतकत्रयावर तुका ब्रह्मानंद यांनी समश्लोकी टीका केली होती. या शतकत्रयाचे भाषांतर तुकाराम बाबा वर्दे यांच्याप्रमाणे दशकवार विभाग पाडून केले आहे.

तुका ब्रह्मानंद यांनी वेदान्तरहस्य, शांकरभाष्यटीका, शतकत्रयसम, विश्वकर्मामाहात्म्य, प्रणवाष्टक, सप्तशती टीका, नाटकरामायण, गीतगोविंद समश्लोकी आदी विपुल असे ग्रंथ व काव्यलेखनं केले. 

अशा प्रकारे अध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य केल्यावर तुका ब्रह्मानंद यांनी सातारा येथील माहुली येथे कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांच्या संगमावर आपला देह ठेविला.ज्या ठिकाणी त्यांनी देह ठेवला त्या ठिकाणी तुका ब्रह्मानंद स्वामी यांची समाधी, घाट आणि एक देवालय सुद्धा त्यांच्या कार्याची स्मृती म्हणून बांधण्यात आले.

आपल्या विद्वत्तेने समाजप्रबोधन करणाऱ्या संत माहात्म्यांत तुका ब्रह्मानंद यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.