संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे सी. डी. देशमुख

महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहास म्हणजे गंभीर तत्वनिष्ठ लढ्याचे आणि अनेक हर्ष विषादांच्या प्रसंगाची झालर असणारे एक महाभारतच आहे. या महाभारतातील अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांचा राजीनामा हे अविस्मरणीय असे पर्वच आहे.

संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे सी. डी. देशमुख
सी. डी. देशमुख

मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडण्याचा काँग्रेसने घाट घातला होता. त्याविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड असंतोष होता. सी.डी. देशमुख देखील अस्वस्थ होते. मुंबईत झालेला गोळीबार आणि त्यात झालेले १०५ हुतात्मे याची जखम ताजी असतानाच केंद्र सरकारने गोळीबाराची चौकशी करण्याचे देखील नाकारले. परिणामतः सी.डीं.च्या अस्वस्थतेचा स्फोट झाला आणि त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी केवळ राजीनामाच दिला असे नाही तर २५ जुलै १९५६ रोजी लोकसभेत केलेल्या घणाघाती भाषणात नेहरुंचा हुकुमशहा अशा शब्दात उल्लेख केला. अर्धा तास केलेल्या भाषणाने सारा देश हादरुन गेला. महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले. आचार्य अत्रे यांनी त्यांचा 'महाराष्ट्राचा कंठमणी' अशा यथार्थ शब्दात गौरव केला.

भारत सरकारच्या मंत्रिमंडळातला कारभार किती पोरकटपणाने आणि घटनाविरोधी रीतीने चाललेला आहे यावर देशमुखांनी झगझगीत प्रकाश टाकला. मंत्रिमंडळाची सर्व सत्ता नेहरु आणि 'त्रिमूर्ती समिती' यांनी बळकावून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी का करावी याचे एकही समर्थनीय कारण न देता किंवा त्या योगाने महाराष्ट्राचे नि भारताचे कल्याण कसे होईल हे न दाखविता तसा निर्णय घेतला. मुंबईसारखे हत्याकांड (Carnage) इतर कोणत्याही देशात झाले असते, तर त्याची न्यायालयीन चौकशी कायद्यानेच करणे भाग पडले असते. पण मुख्य प्रधानाने आणि गृहमंत्र्याने मुंबईमधल्या अत्याचाराची चौकशी करण्याची विनंती झटकली आणि असभ्यपणे (discourteously) नाकारली. हाशापूरच्या अत्याचाराची चौकशी होते आणि मुंबईच्या गोळीबाराची चौकशी होत नाही, यावरुन राजकर्त्या पक्षाच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध वैरभाव आहे असे आपल्याला वाटते म्हणून त्या पक्षाच्या संगतीत रहावयास आपण यापुढे मुळीच तयार नाही असे देशमुखांनी साफ सांगून टाकले. एवढेच नव्हे तर मंत्रिमंडळाची सर्व सत्ता बळकावणारे आणि नागरिक स्वातंत्र्यांची गळचेपी करणारे तुम्ही एक हुकुमशहा आहात असा टोलाही देशमुखांनी नेहरुंना लगावला. (क-हेचे पाणी खंड ५)

चिंतामण द्वारकादास देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्म महाड तालुक्यातील नाते गावी १४ जानेवारी १८९६ रोजी झाला. नाते हे त्यांचे आजोळ. देशमुख घराणे मूळचे तळ्याचे. वडील द्वारकादास देशमुख व्यवसायाने वकील. १९०४ च्या सुमारास रोह्यात कोर्ट सरु झाल्यावर देशमुख कुटुंब रोह्यात आले. सी.डी.चे प्राथमिक शिक्षण रोह्यातच झाले माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईत आर्यन हायस्कूलमध्ये गेले. मॅट्रिकच्या परीक्षेत इलाख्यातन ते पहिले आले. १९१९ साली ते आयएएस झाले. १९३१ साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले त्याबद्दल राणीने त्यांना 'सर' हा किताब दिला. इंग्लंडमध्ये त्यांनी रोझिना सिल्कॉक्स यांच्याशी विवाह केला होता. त्यांची नयी प्रिमरोझ इंग्लंडमध्येच स्थायिक झाली. १९४९ मध्ये रोझिना यांचे निधन झाल्यावर पनी दर्गाबाईंशी दुसरा विवाह केला. विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या लीलया पूर्ण करणाऱ्या सी.डी. देशमुखांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर म्हणून आपली छाप पाडली.

१९५० मध्ये भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून पंडित नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले. अर्थमंत्री झाले तेव्हा ते पंजाब प्रांतातून राज्यसभेवर निवडून आले होते. पुढे १९५२ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसने त्यांना तेव्हाच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पंडित नेहरु स्वतः त्यांच्या प्रचारासाठी आले होते. स्वाभाविकपणे सी.डी. देशमुख विजयी झाले. त्यानंतर अवघ्या चार वर्षांतच त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आपल्या बाणेदारपणाचे दर्शन जगाला घडविले. सी.डी. देशमुख केवळ अर्थनीतिज्ञच नव्हते तर ते साहित्यिकही होते. त्यांनी ज्याप्रमाणे इंपिरिअल बँक आणि आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले त्याचप्रमाणे त्यांनी कवी कुलगुरु कालिदासांच्या 'मेघदूत' या खंडकाव्याचे मराठी श्लोकात भाषांतर केले.

त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. प्रतिष्ठेचा ‘रेमन मॅगासेसे' पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. लेस्टर (इंग्लंड), प्रिन्स्टन (अमेरिका) या परदेशी विद्यापीठाच्या डी.लिट. पदव्यांखेरीज देशातील ८-१० विद्यापीठांनी त्यांना डी.लीट देऊन सन्मानित केले. २ ऑक्टोबर १९८२ रोजी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.

- एस. एम. देशमुख