टेरॅरियम - बाटलीतला बगीचा

जसे असंख्य शोध अपघातानेच लागतात तसाच या बाटलीतल्या बगीच्याचा शोध अपघातामधून लागलेला आहे.

टेरॅरियम - बाटलीतला बगीचा
टेरॅरियम

तुम्हाला काही आगळं-वेगळं करायची इच्छा आहे का.. मग तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. आमची ही चित्रफीत बघा आणि नवनिर्मितीचा मनसोक्त आनंद लुटा. टॅणॅंऽऽग... तर चला, आपण सुरु करुया...". मी सुरुवातीचे ते इतकेच शब्द ऐकून कंटाळलो.

त्याचं असं झालं की चिरंजीव खूप दिवसांपासून मागे लागले होते. बाबा एकदा तरी हे बघ. काहीतरी मस्त दिसतयं. आपण करुन बघायला(च) पाहिजे. या त्याच्या 'च'ला मी जरा घाबरुन असतो. एखादी गोष्ट पूर्णपणे स्वीकारली गेल्याचं ते एक लक्षण असतं. हल्ली फावल्या वेळात हा 'यू ट्यूब' वर अशा 'तुम्हीच करुन बघा'वाल्या फीती बघत बसलेला असतो. त्याच्या आय पॅडवर 'पालक नियंत्रण' वगैरे लावून ठेवलेलं असल्याने आम्ही तसे निर्धास्त असतो. काही गैर तर नक्कीच दिसणार नसतं, पण जे चांगलं आहे ते सुद्धा आपल्यासाठी किती गैरसोयीचं होऊ शकतं हे मी सांगायला नकोच! तर नुकताच चिरंजीवांनी 'टेरॅरियम' (Terrarium) नावाच्या प्रकाराचा कीस काढून ठेवलेला होता. आता बाबांना जवळ बसवून प्रेमाने लाडीगोडी लावत तो भरवणं सुरू होतं.

एके काळी मला ह्या अशा 'डू इट युवरसेल्फ', 'स्वत: करुन बघा' गोष्टींमध्ये भयानक रस वाटायचा. कितीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू मी घरीच तयार केल्या होत्या. आता हे बाळकडू पुढे तर जाणारच. फरक एवढाच, की त्या वेळी हे सगळे उपदव्याप मी स्वत:च करायचो आणि आत्ताही मीच करणार आहे पण आज ते 'मुलगा बोले'च्या धर्तीवर होणार आहेत. "सिद्धार्थ म्हणजे ना - मोड तोड तांबं पितळ" हे मी इतक्या वेळेला ऐकून न ऐकल्यासारखं केलंय की काही विचारु नका! असो, एवढी आत्मस्तुती पुरेशी आहे.

तर ती टेरॅरियमची चित्रफीत फारच भारी निघाली. एक गेलेला बल्ब घ्यायचा. व्यवस्थित हळूवारपणे त्याच्या मागचा काळा भाग तोडायचा. हलक्या हाताने आतले फिलॅमेंटचे तंतू साफ करुन आतल्या काचांचा कचरा बाहेर काढायचा. बल्ब आतून बाहेरुन स्वच्छ धुवून घ्यायचा, सुकवायचा. नंतर तो थोडासा तिरपा पकडून त्यात छोटे दगड भरायचे. त्यावर बारीक वाळूचा थर द्यायचा. त्यावर थोडा लाकडाचा बारीक भुस्सा पसरुन मग आतमध्ये हलक्या हाताने माती भरायची. दात कोरण्याच्या काडीने या मातीचे टप्पे किंवा पायऱ्या तयार करायच्या. ही सर्व प्राथमिक तयारी झाली की मग त्यात शेवाळं, थोडी बुरशी, इवलीशी गवतं, छोट्या खुज्या वनस्पती आणि असं काहीही लावायचं. काडीने इकडे तिकडे हलवून छान दिसेल असं समायोजन करायचं. पाच थेंब पाणी आत टाकून, बूच लावून, बल्ब बंद करायचा आणि जोरात "ढॅण टॅणॅंऽऽग..." असं म्हणायचं. झालं की टेरॅरियम तय्यार!

बघताना वाटत होतं त्याहीपेक्षा करायला जास्त सोपं गेलं. मी, मुलगा आणि त्याची आई, तिघांनीही मिळून फार तर अर्धा पाऊण तास काम केलं. बल्बसाठी बूच तयार करणं तेवढं जड गेलं पण सुबाभूळीची फांदी कापून तेही जमवलं. रविवारची संध्याकाळ मस्त गेली. पोरगं खूष झालं. आजी आजोबांनी कौतुक करुन झालं. दिवाणखान्याच्या ऐसपैस छज्ज्यामध्ये एक वडाचं बोन्साय आहे त्याच्या खोडावर बल्बची स्थापना झाली. त्याचा फोटो काढत असताना, हे आपण नक्की काय केलं आहे, कसा शोध लागला असेल याचा, असं काहीतरी डोक्यात यायला लागलंच!

जसे असंख्य शोध अपघातानेच लागतात तसाच या बाटलीतल्या बगीच्याचा शोध अपघातामधून लागलेला आहे. अठराव्या शतकातील एका ब्रिटीश डॉक्टरचा मुलगा, नथॅनीयल वॉर्ड, हा लहानपणापासून वनस्पति, किडे वगैरे गोष्टींच्या प्रेमात पडला होता. मोठा होऊन तो त्याच्या वडिलांसारखाच डॉक्टर तर झाला खरा पण त्याचं ते निसर्गवेड त्याला शांत बसू देत नव्हतं. फावल्या वेळात तो कीटकांवर प्रयोग करायचा. असाच एक कीटक त्याने एका हवाबंद बाटलीत ठेवल्याचं तो विसरुन गेला. काही महिन्यांनंतर जेव्हा बाहेर अंगणाच्या कोपऱ्यात ठेवलेली ती बाटली परत त्याच्या हाती लागली, तेव्हा तो थक्कच झाला. सीलबंद बाटलीत देखील फर्नची (नेचं/ नेचरी) वाढ फोफावली होती. मानवाने कैद करुन ठेवलं खरं पण निसर्गाचं कार्य त्या बंदोबस्तातही व्यवस्थितपणे सुरु राहिलेलं होतं.

अभ्यासाअंती त्याला आढळलं की काचेच्या बाटलीत पोचणाऱ्या प्रकाश किरणांनी हवाबंद वातावरणातही सृष्टीचक्र सुरू ठेवलेलं होतं. त्यांनी उष्णता आत पोचवली होती. बाटलीमध्ये अनावधानाने राहिलेल्या, नंतर मरुन गेलेल्या त्या मोठ्या कीटकाच्या अंगातलं पाणी बाष्पीभवनाने परत आतमधल्या चिमूटभर मातीला मिळालं होतं. मातीमधले फर्न्सचे बिजाणू रुजले होते. त्यांच्या वाढण्याच्या क्रियेनंतर प्रकाशामुळे त्यांचं प्रकाशसंश्लेषण होत राहिलं. कीटक कुजण्यामुळे कर्बवायू आणि त्यामुळे प्राणवायू तयार होत राहिला. बाष्पीभवनाने पाण्याची निर्मिती होत राहिली, जीवन फुलत गेलं आणि असा हा आपल्या टेरॅरियमचा जन्म झाला. त्याकाळी हा बाटलीतला बगीचा लंडनच्या गृह सजावटीसाठी लगोलग लोकप्रिय झाला होता.

वॉर्ड साहेबांनी सुताराकडून काचेच्या सीलबंद पेट्याच तयार करुन घेतल्या आणि त्या पेटीचं नाव ठेवलं ‘वॉर्डियन केस’. त्यांनी त्या पेट्यांमधून ब्रिटीश झाडं झुडुपं ऑस्ट्रेलियाला पाठवली आणि तिथली झाडं इंग्लंडमध्ये मागवली. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला. वनस्पति पारदर्शक बंद पेटीमध्येही स्वत:ला सांभाळू शकतात, वाढू शकतात, जगाच्या कानाकोपऱ्यात सुखेनैव पाठवल्या जाऊ शकतात हे जगाला कळून चुकलं. एका नव्या वेडाचा जन्म झाला.

बरं झालं आमच्या मुलाने यू ट्यूब वर टेरॅरियम पाहिलं. जर विवॅरियम अथवा पॅलुदॅरियम बघितलं असतं तर मात्र माझं काही खरं नव्हतं. मला नकारघंटाच वाजवायला लागली असती. विवॅरियम हे छोट्या किड्यांचं, सरपटणाऱ्या जीवांचं काचेचं घर असतं तर पॅलुदॅरियम हे एक जणू चिखलयुक्त जलगृहच असतं.

तर, मुलांच्या वार्षिक सुट्ट्या लवकरच सुरू होतील. आपण एकदा वेळात वेळ काढून गुगलवर, यू ट्यूबवर टेरॅरियम (Terrarium) शोधून बघा. छायाचित्रं बघा, चित्रफिती पाहा. आपल्यातल्या बहुतेकांना बागकामाची आवड असते. फावल्या वेळात असा एक बगीचा फुलवून बघाच. मजा येईल. घरात ठेवायला म्हणून एक छान शोभिवंत निर्मितीही होईल. बल्बच पाहिजे असं काही नाही. सीलबंदच बाटलीच पाहिजे असंही काही नाही. झाकण हरवलेली जराशी रुंद बाटलीसुद्धा चालून जाईल. त्यावर काचेचं किंवा इतर रंग नक्षीकाम तेवढं शक्यतो नको. कारण प्रकाश आतमध्ये व्यवस्थित पोचणं खूप महत्वाचं आहे. हो.. आणि जर उघडी बाटली वापरलीत तर फक्त ह्या बगीच्यामध्ये वापरायच्या मातीचं मिश्रण थोडं बदलेल. झाडाझुडुपांचे प्रकार बदलतील पण त्याचं लावण्य अबाधितच राहील. आवश्यक ती सर्व माहिती तुम्हाला ‘गुगल’वर मिळेलच, पण नाहीच मिळाली तर बंदा हाजीर है. घरातल्या छोट्या बाळगोपाळांना सुद्धा यामध्ये ओढा. त्यांना छोटे दगड गोळा करण्यासारखं काही काम द्या. ह्या छंदाची तोंडओळख करुन द्या. एक आगळंवेगळं वेड आपल्यालाही घरबसल्या जोपासता येईल.

टॅणॅंऽऽग... तर चला, आपण सर्वजण आजपासून तयार करणार आहोत... एक सुबक सुंदर टेरॅरियम..!!

- सिद्धार्थ अकोलकर