नऊ अंकाचे माहात्म्य
रोमन भाषेमध्ये IX अशी लिहिली जाणारी नऊ ही एक विषम संख्या असून ती ‘पूर्ण वर्ग संख्या’ म्हणून गणितात ओळखली जाते.
पूर्वी वादविवादात आवडीने भाग घ्यायचो. ‘प्रत्येक जण आपापल्या जागेवर योग्यच असतो’, हे समोरच्याला पटवून देताना मला इंग्लिश नऊ आकड्याची फार मोठी मदत व्हायची. हो, म्हणजे तो एका बाजूने नऊ आणि उलटा पाहिला तर सहा दिसतो ना! समोरचा हमखास निरुत्तर व्हायचा. वादविवाद करताना या नऊला मी हुकूमी पानाप्रमाणे, शेवट करण्यासाठी जपून ठेवलेलं असायचं. वय वाढलं तसं वादविवादात पडायचं वेड दूर होत गेलं आणि आकड्यांची माहिती, जमेल तशी, मिळेल तेव्हा, जमा करायचं नवं वेड मागे लागलं.
रोमन भाषेमध्ये IX अशी लिहिली जाणारी नऊ ही एक विषम संख्या असून ती ‘पूर्ण वर्ग संख्या’ म्हणून गणितात ओळखली जाते. दशमान पद्धतीत जर एखाद्या संख्येतील आकड्यांची बेरीज ९ येत असेल, तर त्या संख्येला ९ या संख्येने पूर्ण भाग जातो. नऊ ही एक ‘कापरेकर संख्या’ म्हणूनही ओळखली जाते. संख्येच्या वर्गाचे दोन हिस्से केले आणि त्या हिश्श्यांची बेरीज मूळ संख्येइतकीच आली तर त्या मूळ संख्येला कापरेकर संख्या म्हणतात. उदा. ९ चा वर्ग = ८१ , ९ = ८ + १. कै. श्री. दत्तात्रेय कापरेकर हे पेशाने शिक्षक आणि जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. आयुष्यभर गणिताशी खेळून अनेक अद्भुत संख्या शोधणाऱ्या, ‘रॅंग्लर परांजपे पारितोषिक’ विजेत्या, कापरेकर गुरूजींना या नऊच्या निमित्ताने नमन करूया!
प्राचीन भारतीय उपखंडामध्ये नऊ ही ब्रह्मदेवाची संख्या समजली जात असे. परिपूर्ण, जादुई आणि दैवी मानली जाणारी ही संख्या, गणितातील सर्वात मोठी एक अंकी संख्या म्हणूनही ओळखली जाते. दशांश प्रणालीमध्ये नऊचा आकडा, एक-अंकीय गणिती चक्राच्या समाप्तीचं प्रतिनिधित्व करतो. गणितातील नऊचा पाढा हा जादूई पाढा म्हणून ओळखला जातो. उदा. पहिला अंक ०९ तर शेवटचा ९०, वरून दुसरा म्हणजे ९ x २ = १८ हा अंक खालून दुसऱ्या, म्हणजे ९ x ९ या गुणाकारात ८१ होऊन, म्हणजेच अंकांची जागा बदलून उत्तरात येतो. वरून तिसऱ्याचं उत्तर २७ तर खालून तिसऱ्याचं ७२ असतं, वगैरे. या नऊच्या पाढ्यातील सर्व संख्यांमधल्या आकड्यांची बेरीज नऊच येते. नऊचा वर्ग ८१, घन ७२९ आणि क्रमगुणित (factorial) ३६२८८० आहे. या अंकांची बेरीज पुन्हा नऊच येते. नऊला फक्त तीनच संख्यांनी विभाजित करता येतं - १, ३, आणि स्वतः ९!
प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या एकूण सहा शाखांमधल्या ‘वैशेषिक’ नामक शाखेमध्ये नऊ वैश्विक घटक मानले जात होते. पृथ्वी, पाणी, वायु, अग्नि, आकाश, वेळ, अवकाश, आत्मा आणि मन! इ.स.पूर्व सहाव्या ते दुसऱ्या शतकाच्या सुमारास कणाद ऋषींनी स्थापना केलेल्या वैशेषिक शाखेमध्ये, ज्ञान आणि मुक्ती ही फक्त जगाच्या पूर्ण आकलनानेच प्राप्त होते, असं मानलं जायचं. हे नऊ घटक जीवनावश्यक आणि जीवनदायी आहेत. त्यांच्या शिवाय जीवन आकारच घेणार नाही.
मानवी शरीराला दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड आणि उत्सर्जनाचे दोन असे एकूण नऊ दरवाजे असतात असं योगसाधनेत सांगितलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये नवमी या तिथीवर, श्रीराम नवमी, महानवमी, खांडेनवमी, श्री राघवेंद्र स्वामी जयंतीची फाल्गुन शुक्ल नवमी, स्वामीनारायण जयंती, असे महत्त्वाचे उत्सव प्रसंग येतात. या उपरोक्त गोष्टींसोबतच नवरात्र, नवग्रह, नवरत्नं आणि नवरस या संपूर्ण भारतीय असलेल्या प्रथा-परंपरा-विश्वासांचा विशेष उल्लेख इथे केलाच पाहिजे.
शारदीय नवरात्र हा शरद ऋतूच्या प्रारंभी येणारा शाक्तपंथीय उत्सव आहे. शक्तिशाली राक्षसांचा किंवा सैतानी शक्तींचा मुकाबला करून समस्त जगाला भयमुक्त करण्यासाठी देवीने नऊ दिवसांच युद्ध केलेलं होतं. श्री दुर्गा देवीच्या त्या नऊ अवतारांचं पूजन करणारी नऊ दिवसांची नवरात्री परंपरा गेल्या हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय साजरा करणारा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गामातेचं पूजन करताना प्रत्येक दिवशी निरनिराळ्या फुलांच्या माळा तिला अर्पण केल्या जातात.
नवरात्रीतील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेलेली आहे. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरलेला असतो. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. आदिमाया स्त्रीशक्तीच्या या उत्सवात स्त्रियासुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी रोज एक या प्रकारे ठरलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसतात. मजा म्हणजे, ही ‘अलीकडची प्रथा’ असं वाटत असलं तरी इतिहासात, अगदी थेट पेशवाईमध्ये, नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवायची पद्धत होती, असे उल्लेख आढळून आलेले आहेत.
प्राचीन भारतातील ऋषी-मुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नऊ ग्रह अवकाश मंडळात आहेत असं मानलेलं/ शोधलेलं होतं. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति किंवा गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे ते नवग्रह होत. जुन्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचं वागणं-बोलणं आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांचा निसर्गाशी आणि नवग्रहांशी काहीतरी संबंध असतो, असं मानलेलं आहे. हिंदू धर्मानुसार या नवग्रहांकडे मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ‘ज्योतिष’ नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे. हे शास्त्र उपयोगी की निरुपयोगी वा खरं की खोटं हा वेगळा विषय आहे.
या नऊ ग्रहांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव अधिक बळकट किंवा क्वचित कधी कमी करण्यासाठीही काही रत्नं धारण करावी, असं ज्योतिषशास्त्र म्हणतं. या नऊ रत्नांनाच नवरत्नं म्हणतात. प्रत्येक ग्रहासाठी ज्योतिषशास्त्रात एक रत्न दिलेलं आहे. सूर्य - माणिक, चंद्र - नैसर्गिकरीत्या तयार झालेला मोती, मंगळ - पोवळं, बुध - पाचू, बृहस्पति - पुष्कराज, शुक्र - नैसर्गिक हिरा, शनी - निलम, राहू - गोमेद, आणि केतू - लसण्या. आसपासच्या बऱ्याच व्यक्ती, खासकरून व्यापारी लोक, नवग्रहांची अंगठी घालताना दिसतात. हल्लीच्या काळात शुद्ध नैसर्गिक रत्नं मिळणं अवघड झालेलं आहे.
विक्षिप्त प्रवृत्तीच्या मुघल सम्राट अकबराने अनेक कलांना आणि कलाकारांना राजाश्रय दिलेला होता. स्वभाव विचित्र असला तरी माणसांची पारख करण्याची क्षमता त्याच्या ठायी होती. त्याच्या दरबारातील प्रमुख, कर्तृत्वसंपन्न, अशा नऊ व्यक्तींना अकबराचा ‘नवरत्न दरबार’ म्हटलं जायचं. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’, अबुल फझल, अबुल फैजी, तानसेन, राजा तोरडमल, राजा बिरबल, राजा मानसिंग, मुल्ला दो प्याजा आणि हकीम हुमाम, ही त्या नऊ मानवी रत्नांची नावं आहेत.
रस या शब्दाचा शब्दशः अर्थ, चव/ रूची किंवा फळांचा द्रवरूपी अंश असा असला तरी ‘कलेतील रस’ हा एक वेगळा प्रकार आहे. अंतःकरणाच्या वृत्तीचं काही कारणांनी उद्दीपन होतं आणि त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवाने किंवा अवलोकनाने अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते तिला रस म्हणतात. हे नऊ प्रकारचे रस पुढीलप्रमाणे आहेत - शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत. हे रस योग्य प्रमाणात वापरले गेले तर उत्कृष्ट साहित्य निर्मिती साधता येते, नवरसांच्या मिलाफाने नृत्य अनोखं होऊन जातं, गाण्यामधले भाव वेगळीच उंची गाठू शकतात, अभिनय अत्युच्च स्वरूपाचा आणि खराखुरा वाटून जातो.
श्री शंभू महादेवांना आदिनाथ मानून स्थापन झालेला नाथ संप्रदाय हा भारतातील हजार ते बाराशे वर्षं जुना पंथ आहे. या पंथाच्या उच्चतम गुरुस्थानी नऊ नाथ, म्हणजे नवनाथ आहेत. महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध सांप्रदायिक श्लोकानुसार गोरक्ष, जालंधर, चरपट, अडबंग, कानिफ, मच्छिंद्र, चौरंगी, रेवण, भर्तृहरी अशी या नवनाथांची नावं आहेत. ‘नवनाथ भक्तिसार’ या सांप्रदायिक मराठी ग्रंथात, नवनाथ हे नव-नारायणांचे अवतार मानलेले आहेत. या ग्रंथाप्रमाणे मत्स्येंद्रनाथांना कविनारायण, गोरक्षनाथांना हरिनारायण, जालंधरनाथांना अंतरिक्षनारायण, कानिफनाथांना प्रबुद्धनारायण, चर्पटीनाथांना पिप्पलायन, नागनाथांना अविर्होत्र, भर्तृहरींना द्रुमिलनारायण, रेवणनाथांना चमसनारायण व गहिनीनाथांना करभाजन नारायणाचा अवतार मानले गेलेले आहे.
संख्याशास्त्राप्रमाणे ९ हा मंगळाच्या अधिपत्याखाली येणारा, म्हणजेच मंगळाचे गुणधर्म दर्शवणारा आकडा आहे. जिद्द, अफाट उर्जा, शक्ती, उग्रपणा, वर्चस्व हे सर्व या नऊचे गुण आहेत. राजकारणात असलेल्यांच्या अंगी हे गुण हमखास दिसतात. त्यामुळेच कदाचित त्यांना ९ हा आकडा प्रिय असावा. सन २०१९च्या लोकसभा मतदानाच्या तृतीय टप्प्यात अनेक नेत्यांनी सकाळी ठीक नऊ वाजता मतदान केलेलं होतं. महाराष्ट्रातले बरेच राजकारणी, गाडीची नंबरप्लेटही नऊ आकड्याची/ शेवट नऊने होणारी किंवा तशी बेरीज असणारी घेतात. मात्र या गुणांबरोबरच संख्याशास्त्रात ९ आकड्याचे काही दुर्गुणही सांगितलेले आहेत. हा आकडा अपघातप्रवण आहे असं संख्याशास्त्र म्हणतं. राजकारणातील फंदफितुरी, घातपात, अपघात, दगाफटका हा या ९ आकड्यामध्ये असलेल्या दुर्गणांचा प्रभावही असू शकतो. अभिनेता सलमान खानच्या गाडीच्या क्रमांकांची बेरीजही ९ आहे. आता हे चांगलं म्हणावं की वाईट?
आता आपण जरा हिंदुस्थान सोडून बाकीच्या जगाचा फेरफटका मारूया. प्रत्येक प्राचीन संस्कृतीतील पौराणिक कथांमध्ये नऊ या संख्येने ‘भारलेल्या’ कितीतरी गोष्टी आहेत.
प्राचीन इजिप्तमध्ये नऊ धनुष्यं (Nine Bows) हा इजिप्तच्या पारंपरिक शत्रूंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जाणारा शब्द होता. नऊ धनुष्यांची चित्रलिपीतील चिन्हं मिस्र सिंहासनांच्या पायथ्याशी, राजांच्या पुतळ्यांच्या पायाखाली आणि तुतनखामेनच्या चप्पलांवर आढळलेली आहेत. “शत्रू पायदळी तुडवतो आम्ही”, हेच त्यातून ध्वनित केलं जात असे. इ.स.पू. १३४१ (बेरीज ९) मध्ये जन्मलेला तुतनखामेन, वयाच्या केवळ नवव्या वर्षी इजिप्तच्या सिंहासनावर बसला होता. ‘द एन्नेड’ हा एक नऊ इजिप्शियन देवतांचा समूह आहे. ओसिरिस मिथकांच्या काही आवृत्त्यांमध्ये, ‘होरस’ किंवा ‘सेट’ला इजिप्तचा वारसा मिळावा की नाही हे या नऊ देवतांनी एकत्र येऊन ठरवलेलं दिसतं.
युरोपमध्ये नऊ ऐतिहासिक योद्धे (Nine Worthies) आहेत, ज्यांना मध्ययुगात ‘शौर्याचे आदर्श’ असं म्हटलं जात असे. जर्मनीतील न्यूरेमबर्ग या ठिकाणी १४व्या शतकातील १९ मीटर उंचीच्या सुंदर कारंज्यावर या योद्ध्यांची शिल्पं आहेत. नॉर्स पौराणिक कथांमध्ये, समग्र विश्व नऊ जगांमध्ये विभागलं गेलेलं असून ते एका मोठ्या वृक्षाद्वारे (Yggdrasil - Tree of Life) जोडलेलं आहे, असा उल्लेख आहे. नॉर्स पौराणिक कथांमध्ये नऊ क्रमांक ओडिन या देवतेशी संबंधित आहे. रून्सचे ज्ञान प्राप्त करण्यापूर्वी त्याने स्वतःला नऊ दिवस आणि नऊ रात्रींसाठी त्या वृक्षावर टांगून घेतलेलं होतं, असं समजलं जातं. रुन्स ही ‘रूनिक अक्षरं’ म्हणून ओळखल्या जाणार्या संचामधली अक्षरं आहेत. लॅटिन वर्णमाला स्वीकारण्यापूर्वी विविध जर्मेनिक भाषा लिहिण्यासाठी रुन्सचा वापर केला जात होता.
ग्रीक पौराणिक कथेतील नऊ कला देवता, त्या त्या गोष्टीचं रक्षण करीत असतात. म्हणजे, कॅलिओप (महाकाव्य), क्लिओ (इतिहास), एराटो (कामुक कविता), युटर्प (गीत काव्य), मेलपोमेन (शोकांतिका), पॉलिहिम्निया (गाणे), टेरप्सीकोर (नृत्य), थालिया (विनोदी), आणि युरेनिया (खगोलशास्त्र)! ग्रीक पुराणांमध्ये स्वर्गातून पृथ्वीवर येण्यासाठी नऊ दिवस लागतात आणि पृथ्वीवरून टार्टारसमध्ये (नरकातले तुरुंग) पडण्यासाठीसुद्धा नऊ दिवस लागतात असा मजेशीर उल्लेख आढळून येतो.
डेलियन अपोलोच्या होमरिक स्तोत्रानुसार ‘झ्यूस’चं (सर्वोच्च ग्रीक देव, आपल्या इंद्राप्रमाणे) प्रेमप्रकरण होतं. त्याचे लेटो (निशा देवी, रात्रदेवता) सोबत प्रेमसंबंध होते. त्यातून लेटो गरोदर राहिली. तिला हेराच्या (झ्यूसची पत्नी) रागामुळे पळ काढावा लागला आणि एका बेटावर आश्रय घ्यावा लागला. नऊ दिवस आणि नऊ रात्री भीषण प्रसूती वेदना सोसल्यानंतर तिने आर्टेमिस (शिकाराची देवी) आणि अपोलो (संगीत आणि भविष्यवाणीची देवता) या जुळ्यांना जन्म दिला, असं ही पुराणं आपल्याला सांगतात.
मेसो-अमेरिकन पुराणांनुसार ‘द लॉर्ड्स ऑफ द नाईट’ या नऊ देवतांच्या समूहाने प्रत्येक नवव्या रात्री त्यांच्या दिनदर्शिकेचं एकेक आवर्तन चक्र तयार केलेलं आहे. ऍझ्टेक पौराणिक कथांच्या मिक्लान नामक पाताळात एकूण नऊ स्तरांचा समावेश आहे. मायन लोकांच्या पाताळलोकांत म्हणजे झिबाल्बामध्येही असेच नऊ स्तर आहेत. मेक्सिकोच्या चिचेन इत्झा प्रांतामधील मायन स्टेप-पिरॅमिड, ‘एल कॅस्टिलो’मध्ये नेमक्या नऊच पायऱ्या आहेत. त्या झिबाल्बाच्या नऊ टप्प्यांचं प्रतिनिधित्व करतात, असं समजलं जातं.
चीन देशाची संस्कृती ही आपल्यासारखीच प्राचीन आहे. चिनी संस्कृतीत नऊ हा आकडा शुभ मानला जातो. चिनी नववर्षाचा नववा दिवस हा जेड सम्राटाचा वाढदिवस आहे. ताओ पंथामध्ये जेड सम्राट हा सर्वोच्च देव असून त्याला स्वर्ग आणि पृथ्वीचा शासक मानून त्याची पूजा केली जाते. जादू आणि शक्तीचं प्रतीक असलेल्या चिनी ड्रॅगनशी नऊ ही संख्या बऱ्यापैकी संबंध ठेवून आहे. ड्रॅगनची नऊ रूपं आहेत, त्याचं वर्णनही नऊ गुणधर्मांनुसार केलेलं आहे आणि त्याला नऊ मुलं आहेत. त्याच्यावर ११७ खवले आहेत - ८१ यांग (पुल्लिंगी, स्वर्गीय) आणि ३६ यिन (स्त्रीलिंग, पृथ्वी)! या तिन्ही संख्या ९ चे गुणाकार आहेत. चिनी ड्रॅगन हे त्यांच्या सम्राटाचं प्रतीक आहे. हाँगकाँगमधल्या कोलून (Kowloon) नामक प्रांताच्या नावाचा शब्दशः अर्थ ‘नऊ ड्रॅगन’ असा आहे.
बिजिंग शहराच्या दक्षिण-पूर्व भागात, पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलं गेलेलं, एक ‘स्वर्ग मंदिर’ (Temple of Heaven) आहे. या मंदिरातल्या वर्तुळाकार वेदीच्या व्यासपीठावर मध्यभागी एक गोलाकार संगमरवरी चपटी शिळा (Heart of Heaven) आहे. या मुख्य प्लेटच्या भोवती शुभ समजल्या जाणाऱ्या नऊच्या गुणाकारात बसवलेली पायऱ्यांची रिंगणं आहेत. म्हणजेच ही मुख्य प्लेट नऊ प्लेट्सच्या रिंगणाने वेढलेली आहे. मुख्य प्लेटच्या भोवती मग १८, नंतर २७, मग ३६ प्लेट्स, अशी एकूण नऊ रिंगणं आहेत. सर्वात बाहेरच्या रिंगणात ९ x ९ = ८१ प्लेट्स/ पायऱ्या आहेत.
चीनच्या पारंपरिक वैद्यकशास्त्रात अमरत्वासाठी मानवी शरीरावर करायचे नऊ उपचार आहेत. त्यामध्ये, स्पर्धात्मक आरोग्य आणि उपचार पद्धती, लोक विश्वास, साहित्य सिद्धांत आणि कन्फ्यूशियन तत्त्वज्ञान, वनौषधी, अन्न, आहार, व्यायाम, वैद्यकीय विशेषीकरण आणि सारासार विचार यांचा समावेश आहे. काही चिनी राजवंशांच्या काळात वापरण्यात येणारी ‘नागरी सेवा नामांकन प्रणाली’ एकूण नऊ टप्प्यांची होती. दक्षिण चिनी समुद्राची नऊ भागांनी साकारलेली बिंदूरेषा, दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीनचे दावे प्रस्थापित करणारी आहे.
बौद्ध धर्मात, गौतम बुद्धांमध्ये नऊ गुण आहेत असं मानलं जातं. १) सिद्ध, २) परिपूर्ण ज्ञानी, ३) ज्ञान आणि आचरण किंवा सरावाने संपन्न, ४) सुसंस्कृत आणि जे चांगलं तेच बोलणारे, ५)जगाचे जाणते, ६) मार्गदर्शनाद्वारे अतुलनीय पुरुषांना समुदायात सामील करणारे ७) देव आणि पुरुषांचे शिक्षक, ८) प्रबुद्ध आणि ९) धन्य. महत्त्वाच्या बौद्ध विधींमध्ये आजही सामान्यतः नऊ भिक्षूंचा समावेश असतो.
ख्रिश्चन धर्मामध्ये पवित्र आत्म्याची नऊ लक्षणं - प्रेम, आनंद, शांती, संयम, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्म-नियंत्रण अशी आहेत, जी ख्रिस्ती अनुयायांनी स्वभावधर्म म्हणून स्वतःमध्ये बिंबवणं अपेक्षित आहे. ख्रिश्चन देवदूतांच्या पदानुक्रमात भक्ती गीतं गाणाऱ्या गायकांचे नऊ समूह आहेत. बायबलमध्ये येशूचा मृत्यू हा दिवसाच्या नवव्या तासाला, दुपारी तीन वाजता, झाल्याचा उल्लेख आहे. कॅथलिक धर्मात नॉवेना म्हणजे सलग नऊ दिवसांचं एक प्रार्थना पर्व आहे. नोव्हेनाच्या प्रार्थना विशेष स्वरूपाच्या आणि विशिष्ट कारणासाठीच्या आहेत. ‘नोव्हेना’ हे नाव लॅटिन शब्द ‘नोव्हेनस’पासून आलेलं आहे, ज्याचा अर्थ ‘प्रत्येकी नऊ’ असा आहे.
अगदीच अलीकडे (इ.स. १८४४) इराण देशात तयार झालेल्या बहाई धर्मामध्ये ते लोक त्यांच्या विश्वासाचं प्रतीक म्हणून नऊ टोकं असलेल्या ताऱ्याचं चिन्ह वापरतात. बहाई उपासनागृहांना नऊ बाजू, त्यांना नऊ दरवाजे आणि सभोवताली नऊ बागाही असतात. नऊ-बिंदू असलेला त्यांचा तारा कबरीच्या दगडांवर वापरला जातो. त्यांच्या अध्यात्मिक विधानसभा किंवा ‘हाऊस ऑफ जस्टिस’मधील सदस्यांची किमान संख्या नऊ आहे.
एकेश्वरवाद शिकवणारा बहाई धर्म नऊ क्रमांकाला उच्च एकल अंकी संख्या म्हणून, पूर्णता आणि पूर्ततेचं प्रतीक मानतो. बहाई धर्म बाकीच्या सर्व जुन्या धर्मांची पूर्तता करीत असल्याचा दावा करतो. भगवान कृष्ण, अब्राहम, बुद्ध, येशू आणि मुहम्मद यांना बहाईंनी धर्म-दूत म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यांचा नऊ-बिंदू असलेला तारा जगातील नऊ महान धर्मांचं एकत्र प्रतीक म्हणूनही मान्यता पावलेला आहे. बहाई, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम, जैन, यहुदी, शिंटो आणि शिख असे हे नऊ धर्म वा पंथ एका छत्राखाली सुखाने एकत्र नांदत आहेत.
इस्लाम धर्मामध्ये नऊ क्रमांकाला थोडंफार महत्त्व आहे. उपवासाचा पवित्र रमजान हा महिना इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. इस्लाममध्ये नऊ हा सुलतानी (राजाचा/ सर्वश्रेष्ठ) क्रमांक मानला जातो. यहुदी लोकांमध्ये एव (Av) नावाच्या हिब्रू महिन्याचे पहिले नऊ दिवस एकत्रितपणे ‘द नाइन डेज’ (तिशा हयामीम) म्हणून ओळखले जातात. हा शोकदर्शक काळ, तिशा बाव (Tisha B’Av), म्हणजेच नवव्या दिवसापर्यंत पाळला जातो. एव महिन्याच्या याच नवव्या दिवशी जेरूसलेमची दोन्ही प्राचीन मंदिरं नष्ट होऊन जेरुसलेमचा नाश झालेला होता.
नववी सिम्फनी तयार केल्यानंतर मरण पावलेल्या काही प्रसिद्ध संगीतकारांमध्ये गुस्ताव महलर, लुडविग व्हॅन बीथोव्हेन, अँटोन ब्रकनर आणि अँटोनिन ड्वोराक यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक परदेशी संगीतकार आजही स्वतःच्या नवव्या सिम्फनीला फार भितात. अंधश्रद्धा कशीही, कुठेही आणि कुठल्याही स्वरूपात पाळली जाऊ शकते याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
मानवाच्या गर्भधारणेचा कालावधी नऊ महिन्यांचा धरला जातो. भारतात कोणे एके काळी नऊवारी साडीचं बरंच प्रस्थ होतं. जपानमध्ये नऊ हा क्रमांक बरेचदा अशुभ मानला जातो, कारण नऊ क्रमांकाचा उच्चार ‘वेदना’ या अर्थाच्या जपानी उच्चारासम वाटतो. ब्रिटीश इतिहासात ‘नऊ दिवसांची राणी’ म्हणून ओळखली जाणारी लेडी जेन ग्रे, फक्त नऊ दिवसांसाठी (१० जुलै - १९ जुलै १५५३) इंग्लंडची राणी होती. युरोपात ९ मे हा युरोप दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त युरोपीय राष्ट्रगीताची धुन बीथोव्हेनच्या नवव्या सिम्फनीवर आधारित आहे.
नवजात बाळाचं मुखकमल पाहण्यासाठी त्याच्या व्हायकिंग बाबांना नऊ रात्रींपर्यंत थांबावं लागत असे. नॉर्वेजियन धावपटू ग्रेटे वेट्झने नऊ वेळा न्यूयॉर्क मॅरेथॉन जिंकलेली आहे. हिब्रू लोकांसाठी नऊ हे सत्याचं प्रतीक आहे. राशींमध्ये धनु ही नववी रास आहे तर कुंभ राशीसाठी ९ हा आकडा भाग्यवान आहे. अंकशास्त्र (Numerology) १ ते ९ या आकड्यांवर चालतं. टॅरो कार्ड्समध्ये नऊ हे हर्मिटचं कार्ड आहे. हर्मिट हा आत्म-परीक्षण आणि प्रतिबिंब यांचं प्रतीक आहे.
चीनी परंपरेनुसार क्रायसॅन्थेमम फुलांशी संबंधित दुहेरी नववा सण, नवव्या चंद्र महिन्याच्या नवव्या दिवशी (इंग्लिश दिनदर्शिकेचा ऑक्टोबर) साजरा केला जातो. तैवानमध्ये हाच दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जातो. ‘नाइन मेन्स मॉरिस’ हा दोन खेळाडूंसाठीचा प्राचीन रोमन ‘स्ट्रॅटेजी बोर्ड गेम’ आहे. मध्ययुगीन इंग्लंडमध्ये तो अत्यंत लोकप्रिय होता. पत्त्यांमधल्या ‘नाइन ऑफ डायमंड्स’ला, म्हणजेच ‘चौकट नऊ’ला ‘स्कॉटलंडचा शाप’ म्हणतात. या पत्त्याशी निगडित अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात.
“A cat has nine lives”, हा इंग्लिशमधला अंधश्रद्धा दर्शक वाक्’प्रचार आहे. “To the Nines”, ही मूळची स्कॉटिश म्हण, ‘परिपूर्णता’ किंवा ‘सर्वोच्च पदवी’ अशा अर्थी वापरली जाते. “The whole Nine Yards”, या अमेरिकन वाक्’प्रचाराचं मूळ अज्ञात असल्याने त्याचं वर्णन ‘प्रमुख व्युत्पत्तीशास्त्रीय कोडं’ असं केलं जातं. नवीन गोष्टींचं कौतुक फार काळ राहात नाही हे सांगण्यासाठी आपल्याकडे “नव्याची नवलाई नऊ दिवस” असं म्हटलं जातं. “आठ हात लाकूड अन् नऊ हात ढपली”, अशी अतिशयोक्ति दर्शवणारी एक म्हण आपल्या मराठीमध्ये आहे. बऱ्याच जणांनी “नाकी नऊ येणे” हेसुद्धा अनुभवलेलं असतंच. आता नऊच्या आकड्याबद्दल इतकं काही वाचून झाल्यानंतर ही म्हण या नऊच्या आकड्याला लागू होते की नाही हे मात्र तुम्हीच ठरवायचं आहे..!! धन्यवाद!!
- सिद्धार्थ अकोलकर