मेजर धनसिंग थापा - चीनचे चक्रव्यूह भेदलेला अभिमन्यू
यावेळी भारतीय सैन्यात नुकतेच कप्तान या पदावरून मेजर या पदी बढती मिळालेले धनसिंग थापा कार्यरत होते.
दिनांक २० ऑक्टोबर १९६२, लडाखची पूर्व दिशा ते तिबेटची पश्चिम दिशा व्यापलेल्या निळाशार अशा पँगॉंग सरोवर चा परिसर आदल्या दिवशीपर्यंत शांत होता. सर्वत्र धुके पसरले होते व या धुक्यामुळे पलीकडील टेकडीमध्ये असलेल्या चीनच्या सैनिकी चौक्या दिशेनाशा झाल्या होत्या.
अचानक हॉर्नचा कर्णकर्कश आवाज वाजू लागला व भारतीय सैनिक सावध होऊन समोरील चीनच्या चौक्यांच्या दिशेने टेहळणी करू लागले. दूरवर चिनी चौक्यांमध्ये संशयास्पद हालचाली दिसू लागल्या होत्या. अचानक चौक्यांच्या आजूबाजूस असंख्य चिनी सैन्य दिसू लागले आणि बघता बघता चीनच्या चौक्यांमधून भारतीय सैन्याच्या दिशेने तोफांचा मारा सुरु झाला.
तोफांचे मोठमोठे गोळे भारतीय चौक्यांवर कोसळू लागले. यावेळी भारतीय सैन्यात नुकतेच कप्तान या पदावरून मेजर या पदी बढती मिळालेले धनसिंग थापा कार्यरत होते. अगदी कालच त्यांच्या बढतीची खबर मिळाल्याने संपूर्ण गुरखा बटालियन आनंदित होती व आदल्या रात्री त्यांच्या बढतीच्या आनंदात सैनिकांनी मेजवानी केली होती.
अचानक हा प्रसंग उभा राहिल्याने मेजर धनसिंग थापा यांनी सर्व साथीदारांना सावध केले आणि म्हणाले, माझ्या जवानांनो सावध व्हा, आपले शत्रू सुरुवातीस तोफांचा मारा करून आपणास बिथरवतील आणि मग आपल्यावर चाल करतील. त्यामुळे प्रत्येकाने आपली पोजिशन घेऊन तयारीत राहा व मी हुकूम देताच गोळीबार सुरु करा.
मेजर धनसिंग थापा यांच्या आदेशाने सर्व बटालियनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व प्रत्येक सैनिक हाती बंदूक घेऊन चीन सैन्याला प्रत्युत्तर देण्यास तयार झाला. चिनी लोकांनी चौक्यांच्या मागे सैनिकांना वेगाने प्रवास करता यावा म्हणून मोटारींची योजना केली होती, बघता बघता चिनी सैनिकांनी भरलेल्या अनेक मोटारी भारतीय चौक्यांच्या दिशेने येऊ लागल्या.
मोटारी भारतीय सीमेच्या दिशेने येऊ लागल्यावर दुर्बिणीतून निरीक्षण करीत असलेल्या धनसिंग थापा यांनी उजवा हात वर करून ठेवला होता जेणेकरून मोटारी बंदुकांच्या टप्प्यात आल्यावर सैनिकांना आक्रमणाचा इशारा देता येईल. चिनी सैन्य टप्प्यात आल्यावर थापा यांनी उजवा हात खाली करून सैन्यास गोळीबार सुरु करण्याचा आदेश दिला आणि भारतीय सैनिकांनी खंदकातून गोळीबार सुरु केला. या गोळीबाराने मोटारींमधील चिनी सैनिक धडाधड खाली कोसळू लागले. मोटारींचे सुद्धा खूप नुकसान झाले, काही मोटारींची चाके फुटली तर काहींची इंजिन्स निकामी झाली. बंद पडलेल्या मोटारीतून चीनचे सैन्य आपला जीव वाचवत टेकड्यांचा आसरा घेण्यासाठी पळू लागले.
अशा प्रकारे चीनचा पहिला हल्ला गुरखा सैनिकांनी परतवून लावला असला तरी परत वळून चीन हल्ला करणार याची सर्वानाच खात्री होती त्यामुळे सर्व सावध राहून दुसऱ्या हल्ल्याची वाट पाहू लागले. काही काळ सरल्यावर चीन चौक्यांतून पुन्हा तोफगोळे बरसू लागले व हे गोळे थेट भारतीय खंदकात पडू लागले त्यामुळे भारतीय सैनिकांचे प्राण जाऊ लागले.
खंदकात पडलेल्या तोफगोळ्याने प्राणांतिक जखमा झालेला एक सैनिक धनसिंग याना म्हणाला की, साहेब आता मी हुतात्मा होणार पण माझ्या शस्त्राने चिनी सैन्य गारद व्हायला हवेत. तुम्ही माझ्या कमरेस लावलेला हातगोळा काढून घ्या आणि चिनी सैन्य जवळ आल्यावर माझ्या नावाने तो त्यांच्यावर फेका.
हे शब्द ऐकून मेजर धनसिंग थापा म्हणाले, शाबास..आपण भारतीय आपल्या एका जवानाच्या प्राणाच्या बदल्यात २० चिनी सैनिकांचे बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.
मेजर साहेबांचे हे शब्द ऐकून जखमी झालेल्या सैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले. थोड्याच वेळात पुन्हा एकदा चीनच्या सैनिकांच्या तुकड्या मोटारीतून भारतीय सीमेच्या दिशेने येऊ लागल्या. यावेळी मोटारी व सैनिकांची संख्या अधिक होती. या मोटारी टप्प्यात आल्यावर धनसिंगांनी 'फायर' असा हुकूम केला आणि भारतीय शस्त्रे चिनी सैनिकांवर बरसू लागली.
चीनचे सैन्य भारतीय जवानांच्या माऱ्यापुढे मार खाऊ लागले मात्र भारतीय सैनिकांची संख्या सुद्धा कमी झाली होती. मेजर थापा यांनी सर्व भारतीय सैनिकांना एकत्र करून त्यांचा धीर वाढवला. आता उरलेल्या सैन्याचे एकच ध्येय होते, मारू किंवा मरू!
दोन हल्ल्यांमध्ये जबर मार खाल्लेल्या चीनने आता तिसऱ्या हल्ल्याची तयारी केली होती. यावेळी त्यांनी मोटारींसोबत रणगाडे सुद्धा तैनात केले होते. भारताच्या गुरखा बटालियन समोर चीनच्या पायदळाने गुडघे टेकल्याने चीनने रणगाड्यांचा आश्रय घेतला. यावेळी भारतीय शिबंदीजवळ रणगाडा विरोधी तोफा नव्हत्या. रणगाडे हा असा शस्त्रप्रकार आहेत की त्यांना रणगाडेच प्रत्युत्तर देऊ शकतात त्यामुळे भारतीय सैनिकांची बाजू थोडी कमकुवत पडली होती.
मात्र याही परिस्थितीत गुरखा बटालियन खंबीर होती त्यांनी बॉम्ब, मशीनगन्स आणि बंदुकी या रणगाड्यांवर रोखल्या, चीनचे रणगाडे पुढे येऊ लागले तसे भारतीय सैनिक आपल्या हातातील शस्त्रांनी रणगाड्यांवर मारा करू लागले. चिनी रणगाड्यांमुळे संपूर्ण गुरखा बटालियन संपली होती. मेजर थापा यांनी दोन्ही बाजूंच्या खंदकाकडे नजर टाकली व तेथे त्यांना आपल्या साथीदारांचे मृतदेह दिसले. थापा सोडून सर्व सैनिक चिनी रणगाड्यांमुळे हुतात्मा झाले होते.
मेजर थापांनी समोर नजर टाकली आणि त्यांना चीनचे प्रचंड सैन्य रणगाड्यांसोबत भारतीय सीमेवर चाल करून येताना दिसत होते. हजारो चिनी सैन्य विरुद्ध एक भारतीय मेजर अशी लढाई होणार होती.
धनसिंग यांनी आपल्या हुतात्मा सहकाऱ्यांचे स्मरण केले व एका भारतीय सैनिकाच्या बदल्यात २० चिनी सैनिक हा मंत्र मनात बिंबवून त्यांनी हाती मशीन गन घेतली व सरळ ती वेगाने फायर करीत शत्रू सैन्यावर चालून गेले. या माऱ्याने अनेक चिनी सैन्य जमिनीवर कोसळू लागले मात्र धनसिंग हे वेगाने पुढे जात राहिले. चिनी सैन्याच्या चक्रव्यूहात हा आधुनिक युगातील अभिमन्यू शिरला होता.
चिनी सैनिकांनी त्यांच्या दिशेने अनेक राउंड्स फायर केले, धनसिंग थापा यांच्या शरीरात असंख्य गोळ्या शिरल्या, या जखमांनी त्यांची शुद्ध हरपली व ते शत्रूच्या गदारोळात हरवून गेले.
धनसिंग थापा हे शत्रूच्या गदारोळात हरवून गेल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली असे वाटून त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र बहाल करण्याचे भारत सरकारने ठरवले मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की इतक्या गोळ्या लागूनही धनसिंग थापा हे हुतात्मा झाले नव्हते तर जखमी होऊन युद्धकैदी म्हणून चीनच्या कैदेत सापडले होते.
युद्धसमाप्ती झाल्यावर त्यांची कैदेतून सुटका करण्यात आली. धनसिंग थापा यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल २० ऑक्टोबर १९६२ रोजी त्यांना भारत सरकारतर्फे मानाचा परमवीर चक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९८० साली धनसिंग थापा लष्करी सेवेतून निवृत्त झाले व त्यांचे पुढील आयुष्य लखनऊ येथे व्यतीत केले. आपल्या निवृत्तीनंतर सहारा एरलाईन्स मध्ये त्यांनी संचालक या पदावर कार्य केले. ६ सप्टेंबर २००५ साली थापा यांचे पुणे येथे निधन झाले व त्यांच्या निधनाने १९६२ साली पॅंगॉन्ग लेक वर अभिमन्यू बनून चीनला दे मे धरणी ठाय करून सोडणारा एक वीर भारतीय अनंतात विलीन झाला.