चहा व कॉफी - दोन लोकप्रिय पेय

चहा व कॉफी ही दोन्ही पेये उत्तेजक असून ती प्यायल्यावर शरीरात उत्साह येतो व मरगळ दूर होऊन मनुष्य ताजातवाना होतो म्हणून या दोन पेयांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात केला जातो.

चहा व कॉफी - दोन लोकप्रिय पेय
चहा व कॉफी

आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याव्यतिरिक्त ज्या पेयांचे सेवन आपण बहुतांशी करतो ती दोन पेय म्हणजे चहा आणि कॉफी. आपल्याकडे अनेकांचा दिवस चहा अथवा कॉफी प्यायल्याशिवाय सुरु होत नाही. या लेखात आपण चहा आणि कॉफी या दोन पेयांविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

चहाचा पेय म्हणून वापर तसा फार पूर्वीपासून होत असावा मात्र जगभरात चहाचा प्रसार ब्रिटिशांमार्फत झाला. चहा ची झाडे प्रामुख्याने चीन, जपान आणि भारताच्या ईशान्येकडील भागात आढळतात. या झाडाच्या पानापासून चहा तयार होतो. चहाच्या झाडांची उंची पाच ते सहा फूट असते. 

चहाच्या झाडास जंगली गुलाबाप्रमाणे भुरकट रंगाची फुले येतात. चहाच्या झाडांच्या पानांपासून चहा तयार केला जात असल्याने झाडाची पाने प्रथम तोडावी लागतात व ही पाने तोडण्याचे एकूण तीन हंगाम असतात.

चहाची पाने जेवढी कोवळी तेवढा त्यांपासून होणारा चहा उत्कृष्ट असतो. चहाची पाने तोडल्यावर ती वाऱ्यावर काही प्रमाणात वाळवली जातात. वाळवल्यानंतर ती पाने हाताने वळवून त्यांच्या वळकट्या तयार केल्या जातात आणि नंतर लोखंडाच्या तव्यावर त्यांना अग्नीने शेकवण्यात येते.

आता जाणून घेऊ कॉफी या दुसऱ्या लोकप्रिय पेयाविषयी. कॉफीचे झाड आठ ते बारा फूट उंच वाढते. या झाडास बारीक फळे येतात. या फळांच्या टरफलात जो दाणा असतो तोच कॉफी. या झाडास कॉफी असे नाव पडण्याचे कारण म्हणजे आफ्रिका खंडात काफा नावाचे एक गावं आहे व या गावात कॉफीची झाडे विपुल प्रमाणात आढळतात त्यामुळे या गावावरून या झाडासही कॉफी असे म्हणायचा प्रघात सुरु झाला.

कॉफीच्या झाडाची लागवड प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, अरब देश, श्रीलंका, इंडोनेशियातील जावा बेटे आदी ठिकाणी बऱ्याच प्रमाणात होते. भारतात सुद्धा काही प्रमाणात कॉफीची लागवड केली जाते.

कॉफीच्या झाडास एक कांड असून झाडाच्या फांद्या लांब, सरळ आणि नाजूक असतात आणि त्यांवर सदाहरित प्रकारातील पाने असतात. कॉफीच्या झाडाची फुले पांढऱ्या चमेलीसारखी असतात आणि त्यांना सुंदर सुवास असतो मात्र ही फुले फारशी टिकत नाहीत. फुलाच्या मागे फळ असते आणि त्या फळाच्या गरात दोन अंडाकृती डाळिंब्या असतात.

कॉफीची फळे पिकली की ती एका घरटीत घालून चांगली भरडतात म्हणजे फळांचे टरफल आणि गर निघून आतील दाणा वेगळा होतो. नंतर ते दाणे उन्हात वाळवले जातात. कॉफीचे दाणे कच्चे असतात त्यावेळी त्यांचा रंग पिवळसर असतो.

चहा व कॉफी ही दोन्ही पेये उत्तेजक असून ती प्यायल्यावर शरीरात उत्साह येतो व मरगळ दूर होऊन मनुष्य ताजातवाना होतो म्हणून या दोन पेयांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात केला जातो.