स्वागत पावसाचे

कोरोनाच्या संकटाचे ढग विरळ होत असून मोसमी पावसाचे ढग आकाशात दाटू लागले आहेत. यंदा मोसमी पाऊस सुद्धा अगदी वेळेवर दाखल झाला आहे.

स्वागत पावसाचे
स्वागत पावसाचे

पाऊस अगदी उंबरठय़ावर येऊन दाखल होतोय. आदरणीय व्यक्ती, आवडता मित्र सखा जर आपल्याकडे काही दिवस मुक्कामाला येणार असेल तर त्याच्या स्वागताला काही अंतर चालून जाण्याची आपली परंपरा आहे. गावाच्या वेशीवर म्हणा किंवा अजून काही अंतर पुढे जाऊन त्या व्यक्तीला सामोरे जाणे ही प्रथा! मग ज्या पावसाची आपण एवढी डोळ्यात प्राण आणून वाट पाहतो आहोत,त्याच्या स्वागताला आपण घर सोडून काही अंतर जायलाच हवे.

पावसाचे स्वागत आपण सखा सह्याद्रीच्या हातात हात घालून जर केले तर त्यासारखा दुसरा दुग्धशर्करा योग नाही. सह्याद्रीसुद्धा या पावसाची आपल्या इतकीच तीव्रतेने वाट पाहतो आहे. सह्याद्रीच्या ऐन कण्यावर म्हणजेच घाटमाथ्यार, पावसाचे स्वागत करायला अनेक ‘स्वागतकक्ष’ सह्याद्रीने निर्माण केलेले आहेत. भीमाशंकरला जावे. तिथे असलेल्या नागफणीवर जावे. तिथून सगळा आसमंत सुंदर दिसतो. आभाळात सर्वत्र काळे ढग जमा झालेले, किंचित वारा वाहतोय, सिद्धगड, पदरगड तिकडे लांबवर गोरखगडाचे माथे कधी ढगांनी झाकले जाताहेत तर कधी ढग बाजूला होताहेत. अशावेळी पावसाच्या पहिल्या सारी भीमाशंकराच्या साक्षीने अंगावर घ्याव्यात.

जुन्नर तालुक्यातही अनेक स्वागतकक्ष आहेत. नाणेघाटात जावे. पावसाच्या स्वागताला नानाच्या अंगठय़ावर उभे राहावे. उजवीकडे अंजनावळ्याचे डोंगर, त्यापलीकडे डोकावणारा मोरोशीचा भैरवगड, डावीकडे देखणा जीवधन आणि त्याचा वांदरलिंगी सुळका यांच्या सोबतीने पावसाचे स्वागत करावे. सगळी दरी ढगांनी भरून गेलेली असते. ढग बाजूला झाले तर खाली कोकणातली टुमदार खेडी आणि त्यातली कौलारू घरे फार सुंदर दिसतात. प्राचीन नाणेघाटाच्या साक्षीने पहिल्या पावसात चिंब होऊन जावे. ट्रेकिंगची आवड असेल तर धाकोबाचा स्वागतकक्षदेखील असाच सुंदर. अगदी उंचावर असलेले हे ठिकाण, दुर्गवाडीवरून किंवा दारम्य़ा घाटाच्या तोंडाशी असलेल्या आंबोली गाव वरून धाकोबाला जावे. खूप उंचीवर आपण असल्यामुळे नानाचा अंगठा आणि जीवधन किल्ला आपल्यापेक्षा खाली दिसतात. खूप लांबवरचा परिसर इथून दिसतो. आहुपे घाटात असाच एक सुंदर पावसाचा स्वागतकक्ष आहे. गर्द झाडीत वसलेले गाव. गावापर्यंत गाडी रस्ता. घोडनदीच्या उगमाचे ठिकाण, आणि जवळच राखलेली देवराई. इतके सुंदर ठिकाण पावसाच्या स्वागताला तयार आहे. आहुपे घाटाच्या तोंडाशी गेल्यावर गोरखगडाचे सुंदर दर्शन होते. आकाशात काळे ढग दाटून आलेले, त्या पार्श्वभूमीवर गोरखगड फार सुंदर दिसतो. पाऊस सुरु झाल्यावर किल्ला ढगात मिसळून जातो आणि सर्वत्र पावसाचा कल्लोळ ! इतका सुंदर क्षण कधीच चुकवू नये.

कधी तिकडे दक्षिणेला अगदी आंबोलीच्या पण पुढे जाऊन पारगडावर जावे. घनदाट अरण्यात वसलेला हा सुंदर किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा सगळाच परिसर. ऐन सह्यद्रीच्या कण्यावर असलेली नेसरी, इसापूर, चौकुळ ही गावेसुद्धा पावसाच्या स्वागतासाठी उत्तम आहेत. ऐन पारगडावर उभे राहून पावसाचे स्वागत करावे. एका बाजूला गोवा तर दुसरीकडे कर्नाटकचे सान्निध्य असलेल्या या भागात पावसाचे स्वागत करण्याची पर्वणी साधावी.

गगनबावडा हे असेच अजून एक सुंदर ठिकाण. घाटाच्या तोंडाशी असलेल्या गगनगडावर जावे. इथून खाली कोकणात उतरणारा करूळ घाट कधी ढगात लुप्त होतो तर कधी आपली वेडीवाकडी वळणे दाखवतो. क्वचित एखादी लालपरी घाट चढत असताना इथून दिसते. पावसाळी ढग इथे अगदी आपल्या जवळ आल्याचा भास होतो. पहिला पाऊस इथून अनुभवावा. किल्लय़ावर जायचे नसेल तर करूळ घाटात एक—दोन वळणे उतरून जावीत आणि तिथून पावसाला सामोरे जावे. आपल्या पाठीशी असतो गगनगड आणि समोर पसरलेला कोकणाचा अफाट देखावा ! नगर जिल्ह्यच्या उत्तरेला असलेल्या अकोले तालुक्यात जावे. तिथे असलेला किल्ले रतनगड आणि सांधण दरी इथे जाऊन पावसाचे स्वागत करावे. सांधण दरी म्हणजे डोंगराला पडलेली मोठीच्या मोठी भेग. इंग्रजीत ज्याला कॅनियन म्हणतात. त्यात उतरून अर्धा तास चालले की आपण दरीच्या तोंडाशी येतो. समोर आहेत रतनगडाचे कभिन्न कडे. इथे उभे राहून पावसाचे स्वागत करावे. दरीत घोंगावणारा वारा आणि पावसाचे नर्तन हे केवळ अफाट असते.

रतनगडावर जावे. राणीचा हुडा इथे उभे राहून पावसाचे स्वागत करावे. आपल्या पाठीमागे कात्राबाईचे सरळसोट कडे उभे असतात. ढग बाजूला झाले तर कळसुबाई आणि अलंग—मदन—कुलंग आपल्याला दर्शन देतात. समोरचा सुळका आपल्या साथीला असतो. अशावेळी पश्चिमेकडून येणारा मोसमी पाऊस आपल्या अंगावर झेलावा. त्याचे मनमुराद स्वागत करावे. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या लहानपणी शिकलेल्या कवितेनुसार उशीर झाला तरीही आपला सखा पाऊस हा येणार असतोच. तो आपले आयुष्य फुलवायला येतोय. पीक—पाणी, अन्नधान्यांनी आपले आयुष्य समृद्ध करायला येतोय. तो आपल्यासाठी चार महिने इथे तळ ठोकून राहणारे. मग जो पाऊस आपल्यासाठी इतके करणार आहे त्याला आपण सामोरे जायला नको का?

हा पाऊस आपल्यासारखाच सह्यद्रीलासुद्धा फुलवणार, नटवणार आहे. मग त्याचे स्वागत करायलाच हवे. मग कधी रायगड असो, तर कधी पन्हाळा. कधी वरंधा घाट असो तर कधी कळसुबाई. पावसाच्या पहिल्या धारा आपल्या अंगावर झेलायला अशी नाना ठिकाणे आहेत. तिथे जाऊन या पावसाचे स्वागत करायला हवे, तृप्त व्हायला हवे. शरीरासोबतच मनावर जमा झालेली किल्मिषेसुद्धा दूर करण्याचे सामथ्र्य या पावसात असते. एकदा त्याच्या स्वागताला जाऊन चिंब भिजून घ्यावे. ठिकाणे असंख्य आहेत, निवड आपली आपण करायची आहे. नवीन भटकंतीचा श्रीगणेशा या सख्या पावसाच्या पहिल्या वर्षांवातच केला म्हणजे पुढचे सगळे बेत सुफळ संपूर्ण होतात.

- आशुतोष बापट