वाघ समजून घेताना

वाघ नावातच सर्व काही आहे. शूर व्यक्तीस वाघ हेच विशेषण जोडले जाते किंबहुना याच उपमेने संबोधले जाते. रुबाब, करारीपणा, नजरेचा करडेपणा, डौल, लय इत्यादी गुण वाघाच्या व्यक्तिमत्वात सामावलेले आहेत.

वाघ समजून घेताना

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

भारतीय संस्कृतीत दुर्गेचे वाहन वाघ आहे त्यामुळे वाघास पौराणिक महत्वही प्राप्त झाले आहे. पौराणिक काळापासून वाघ हा आपणा सर्वांना परिचित आहे किंबहुना तेव्हापासून अस्तित्वात आहे असे म्हणावयास हरकत नाही. शास्त्रीय भाषेत पॅन्थेरा या जिनस मध्ये सिंह, बिबट्या, जग्वार, बर्फाळ अथवा हिम बिबट्या यांचे सोबत वाघाचा समावेश होतो. पॅन्थेरा टायग्रिस हे वाघाचे शास्त्रीय नाव आहे. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वात उच्च स्थानावर विराजमान झालेला मुख्य मांसभक्षक प्राणी आहे. 

वाघ स्वतः शिकार करून खातो. शाकाहारी सस्तन प्राणी जसे हरिणवर्गीय चितळ, सांबर, भेकर यांसारखे प्राणी वाघाच्या खाद्ययादीत समाविष्ट आहेत. बिबट्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत वाघ टिकून राहू शकत नाहीत. वाघाने जगातील बराचसा भूप्रदेश आपल्या वास्तव्याने व्यापलेला आहे. दक्षिण पश्चिम व मध्य आशिया, रशियाचा पूर्व किनारा, जावा, बाली,दक्षिण पूर्व व पूर्व आशिया, सैबेरिया व तैगा प्रदेश असा विस्तृत प्रदेश वाघाने व्यापलेला आहे.

वाघाच्या शरीरापासून विविध औषधी फायदे मिळवले जातात. चिनी औषधशास्त्र व इतर अनेक भागांत वाघाच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा विविध औषधांसाठी फार प्राचीन काळापासून उपयोग होत आलेला आहे.

वाघाचा नैसर्गिक अधिवास प्रामुख्याने वर्षावाने, सदाहरित वने, उष्णकटिबंधीय वने, कांदळवनाचे पट्टे, गवताळ कुरणे व सव्हाना प्रदेश यात राहिलेला आहे. वाघाचे स्वतःचे असे एक क्षेत्र असते. या क्षेत्रात इतर वाघाने पाऊल ठेवणे त्यास बिलकुल सहन होत नाही. आपल्या क्षेत्राची निश्चिती वाघ स्वमूत्र व नखांच्या ओरखड्यांचे साहाय्याने करतो. नैसर्गिक अवस्थेत निसर्गात मुक्तपणे वाघाचे छायाचित्र टिपणे हे जवळपास सर्वच निसर्ग छायाचित्रकारांचे स्वप्न असते.

वाघाचे बंदिस्त अवस्थेतील वयोमान सरासरी सुमारे २५ ते २६ वर्षांचे आहे. त्यामानाने मुक्त अवस्थेत जगण्याच्या संघर्षामुळे त्याचे आयुष्यमान कमी असते मात्र बंदिस्त अवस्थेतील हा राजस प्राणी मुक्त अवस्थेत निसर्गात पाहणे जास्त आनंददायी असते.

या शकतात मात्र गेल्या शतकाच्या तुलनेत निसर्गात वाघ पाहावयास मिळणे काहीसे दुरापास्त झाले आहे. मानवी वसाहती, त्यायोगे निर्माण होणारे प्रदूषण औद्योगिकरणामुळे होणारा वनांचा ऱ्हास व या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळे वाघांचा नैसर्गिक अधिवासाच धोक्यात येत आहे. याशिवाय अवैध चोरटी शिकार, औषधी उपयोग, श्रीमंती प्रदर्शन, शिकारीचा शौक या इतर कारणांमुळे आज संबंध मार्जार कुळच धोक्यात आले आहे. काही शतकांपूर्वी लाखोंच्या संख्येने वावरणारे वाघ या शतकात काही हजारांच्या संख्येत आले आहेत. वाघांचा ऱ्हास याच वेगाने होत राहिला तर पुढील पाच वर्षांत वाघांचे अस्तित्व पृथ्वी तळावरून नष्ट होईल.

आज भारत, बांगलादेश, भूतान, मलेशिया व दक्षिण कोरिया यांनी आपला राष्ट्रीय पशु म्हणून वाघाची निवड केली आहे. अनेक देशांच्या संरक्षण दलाचे चिन्ह, ध्वज, नाणी इत्यादींवर वाघाची मुद्रा आढळते यातून वाघाचे महत्व अधोरेखित होते. वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण व्हावे यासाठी भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलमांद्वारे तरतूद केलेली आहे. विविध राजेमहाराजांची खाजगी शिकारगृहे आज राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यामध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहेत. 

भारतात एकूण ४७ व्याघ्र प्रकल्प आहेत. बांधवगड, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे खास पट्टेरी वाघांकरिता प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रही एकूण ६ राष्ट्रीय उद्याने ही व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वाघांच्या संख्येत होणारी घट ही निसर्ग संपदा व आरोग्याच्या होणाऱ्या हानीचे द्योतक आहे हे जाणून जागतिक संघटनेने वाघांच्या सर्वच प्रजाती संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केल्या आहेत. जगातील वाघांचा वावर आढळणाऱ्या देशांनी एकत्र येऊन वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण व्हावे यासाठी रशियाने सेंट पिटर्सबर्ग या ठकाणी सन २०१० मध्ये जागतिक सभा घेऊन जागतिक व्याघ्र दिवसाचे प्रयोजन केले. यातून २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित झाला आहे.

यानिमित्ताने वाघ व त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन व संरक्षण या दृष्टीने भरीव कामगिरी अपेक्षित आहे. आपण सर्वानी सुद्धा अशा उपक्रमात सहभागी होऊन निसर्गाप्रती आपली सक्रिय सेवा व कृती देऊन आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे तरच येणाऱ्या पिढीस वाघ पाहावयास मिळेल अन्यथा वाघ हा शब्द केवळ वाक्प्रचारात वापरण्यापुरताच राहील.

- निलेश देविदास चांदोरकर