मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी
रायगड जिल्हा हा विवीधतेने नटलेला जिल्हा असून येथे दर आठवड्यास लाखो पर्यटकांनी गजबजणारी पर्यटनस्थळेही आहेत व दुर्गम भागातील अपरिचीत व पर्यटकांना पारखी अशी स्थळेही आहेत. रायगड जिल्ह्याची भौगोलिक विवीधता पाहता येथे डोंगर, दर्या व अरण्यांनी व्यापलेला असा खुप मोठा प्रदेश आहे व या प्रदेशातली अनेक वैशिष्यपुर्ण स्थळे अजुन प्रसिद्धीच्या झोतात यावयाची आहेत. मात्र यासाठी रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडवाटेचा प्रवास करायला हवा तरच ही रहस्यमयी स्थळे पाहता येतील.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणार्या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पुर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचिन रस्ता म्हणजे चौल या प्राचिन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पुर्वेस वळतो. याच प्राचिन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचीतगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्त्या कुंडलीका खाडीच्या पुर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पुर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत. यशवंत खार हून एक वळण घेतल्यावर खर्या अर्थी कुंडलीका नदी संपून खाडीस सुरुवात होते, डोंगर दर्यामधून प्रवास करताना अधुन मधुन या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत मात्र मुळ रस्ता रामराहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.
रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदीरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा असून कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत, प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत त्याच परिसरात हे संग्राम झालेले असायचे त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी ही विरगळी वेगळी व अद्भुत आहे. ही विरगळी तीन स्वरुपांत पहायला मिळत असली तरी मुळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकुण तिन झाल्या असाव्यात असा अंदाज येतो. या विरगळींची कालनिश्चीती करणे कठीण आहे कारण येथे को़णताही लेख नसल्याने किंवा प्राचिन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहार कालीन आहेत की यादव कालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तिन प्रसंग कोरले असून पहील्या भुमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसर्या तथा तिसर्यामध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठा दोरखंडास धरुन हे सैनिक चाल करीत आहेत असे प्रथमदर्शनी पाहील्यावर वाटते मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झिज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही. दुसर्या विरगळीचेही तिन भाग असून या तिनही भागात एकून सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते, तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही या सर्वाचा सांकेतीक अर्थ काय ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल.
अर्थात या सर्व विरगळी प्राचिन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधीत्व करतात, चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मीती येथे करण्यात आली असवी. हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पुर्वीपासून समुद्रमार्गे येथे परकियांचे हल्ले होत असत व या भुभागाचे रक्षण करण्याकरीता येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत तेव्हा असेच एखादे परकिय आक्रमण थोपावताना हे अज्ञात विर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचिन काळातील लिखीत पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात विरांची नावे मिळणे दुरापास्तच असते मात्र त्यांनी या भुमीकरीता वेळोवेळी दिलेल्या बलीदानामुळेच आपण वेळोवेळी स्वातंत्र्य उपभोगित आलो हे विसरता कामा नये. मेढामार्गे चौल या रस्त्यावरील या विरगळी त्या सर्व अज्ञात विरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फुर्ती देतात. अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा रायगड जिल्ह्यात जागोजागी आहे व या फक्त शिळा नसून त्याकाळातला इतिहास आहे जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करुन कोश तयार केल्यास प्राचिन रायगड जिल्हाचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते तेव्हा या विरांच्या स्मरणार्थ का होईना या आडवाटेवरुन एकदातरी प्रवास करावाच.