डहाणू - वारली संस्कृतीचे माहेरघर

महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या उत्तरेकडे पालघर हा जिल्हा आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याच्या ३६ व्या जिल्ह्याच्या स्थापनेची घोषणा केली.

डहाणू - वारली संस्कृतीचे माहेरघर

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पालघर हा जिल्हा विविध अंगानी नटलेला असा जिल्हा आहे. एकीकडे आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली शहरे तर दुसरीकडे आदिमकाळाची संस्कृती जपणारी गावे फक्त या जिल्ह्यातच असावीत.

महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या उत्तरेकडे पालघर हा जिल्हा आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याच्या ३६ व्या जिल्ह्याच्या स्थापनेची घोषणा केली. जुन्या ठाणे जिल्ह्यातून विभाजन काढलेल्या् या नव्या पालघर जिल्ह्यात पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि वसई-विरार या भागांचा समावेश करण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील वारली ही आदिम जमात आजही आपली संस्कृती व आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. या समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणास भेट द्यायलाच हवी. वारली संस्कृती व्यतिरिक्त जव्हार हे एक थंड हवेचे स्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे.

जव्हार हे पूर्वी संस्थान होते व या संस्थानाच्या आजूबाजूस घनदाट जंगल व अनेक डोंगर असल्याने हे संस्थान शत्रूच्या आक्रमणापासून सुरक्षित असायचे. जव्हारची उंची समुद्रसपाटीपासून ५२० मीटर आहे. 

येथील शिर्पामाळ, हनुमान पॉईंट सनसेट पॉईंट, जयविलास राजवाडा, दादर कोपरा महाल ही स्थळे प्रेक्षणीय आहेत याशिवाय परिसरात अशेरीगड, विक्रमगड हे किल्ले तर अशेरीची लेणी सुद्धा प्रसिद्ध आहेत.

शिर्पामाळ हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहे कारण ११६३ साली सुरत शहरावर मोहिमेस जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जव्हारचे राजे विक्रमशहा यांची भेट घेतली होती या भेटीच्या वेळी विक्रमशहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला आणि त्यांच्या जिरेटोपात मानाचा शिरपेच रोवला व हा ऐतिहासिक प्रसंग ज्या ठिकाणी घडला तो परिसर शिर्पामाळ म्हणून ओळखला जातो.

जव्हार येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील वारली समाजाची संस्कृती अनुभवायास मिळते. विटकरी भिंतीवर रंगवलेली पांढऱ्या रंगाची चित्रे ही वारली समाजाची अंगभूत कला आहे. या चित्रांचे संग्रहालय सुद्धा येथे उभारण्यात आले आहे. 

जव्हार हे स्थान सह्याद्रीच्या पश्चिम उताराणीवरील दऱ्याखोऱ्यांतील साग, परस, खैर, आंबा यांच्या घनदाट अशा जंगलात असल्याने वारली समाज व इतर आदिवासी समाजाचे हे प्रमुख वसतिस्थान आहे. वारली समाजाची खेडी लहान व विखुरलेली असतात. त्यांच्या शेतजमिनी एकमेकांना लागून असतात. दहा पंधरा झोपड्यांच्या वस्तीला 'पाडा' असे म्हटले जाते. वारली समाजाची वस्ती अतिशय स्वच्छ व नीटनेटकी असते. जंगलातील बांबू व पालापाचोळा इत्यादींच्या साहाय्याने वारली त्यांच्या झोपड्या तयार करतात. झोपडयांना खिडकी नसते आणि शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या सुद्धा झोपडीतच राहतात. झोपडीच्या बाहेर तीन चार फूट उंचीचा ओटा असतो ज्यावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवलेली असतात.

जव्हार पासून १५ किलोमीटर अंतरावर सिल्वासा मार्गावर असलेला दाभोसा धबधबा आणि आजूबाजूचे घनदाट जंगल आवर्जून पाहण्यासारखे स्थळ आहे. विक्रमगडपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेला पलूचा धबधबा तसेच कसाऱ्यापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेला वहीगाव धबधबा सुद्धा प्रेक्षणीय आहे.

जव्हार येथे निवासासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे निवासस्थान आहे. मुंबईहून १६६ किलोमीटर तर ठाण्याहून १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या जव्हार येथे जाण्यासाठी आपण खाजगी वाहने अथवा राज्य परिवहन मंडळ सेवेचा लाभ घेऊ शकता.