म्हसळा - निसर्गाच्या सानिध्यातले गाव

रायगड जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेले म्हसळा हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण आपल्या निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात अशा राजपुरी खाडीच्या दक्षीण मुखास असलेले म्हसळा हे एकेकाळी नावाजलेले बंदर व व्यापारी केंद्र होते. म्हसळ्याहून पश्चिमेकडे २५ कि.मी. अंतरावर अरबी समुद्र असून श्रीवर्धन व दिवेआगर ही इतिहासप्रसिद्ध गावे याच ठिकाणी आहेत किंबहूना मुंबई व पुण्याहून श्रीवर्धन्-दिवेआगर अथवा हरहरेश्वर येथे जाण्याकरीता म्हसळामार्गेच जावे लागते.

म्हसळा - निसर्गाच्या सानिध्यातले गाव
म्हसळा

या गावास म्हसळा हे नाव कसे पडले याबाबत अनेक प्रवाद आहेत मात्र सर्वात प्रमुख प्रवादानुसार या गावाचे प्राचिन नाव महेश्वर असून येथे पुर्वी असलेल्या महेश्वर नामक शिवमंदीरावरुन हे नाव या गावास मिळाल्याचे सांगितले जाते अर्थात हे महेश्वराचे मंदीर आता काळाच्या उदरात गुप्त झाले आहे. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात म्हणजे सातवाहन काळात युरोपातील ग्रिक भुगोलतज्ञ टॉलेमी याने आपल्या भारतभेटीच्यावेळी म्हसळ्याची 'मुसोपल्ली' अशी नोंद केली होती. या वरुन सातवाहन काळात गावास 'महेशपल्ली' असेही नाव प्रचलित असावे अशी शक्यता वाटते. म्हसळा या गावाचे अनेक संदर्भ निजामशाही काळापासून मिळतात निजामशाही, आदिलशाही, मराठे व सिद्दी यांच्या काळात म्हसळ्याच्या उल्लेख म्हशेळे, म्हैसळे अशा पद्धतीने केलेले आढळतात कालांतराने या शब्दांचे अपभ्रंश होऊन म्हसळे हा शब्द निर्माण झाला असावा. या गावातील काही नागरिकांची आडनावे म्हासलाई, म्हशिलकर अशीही आहेत त्यावरुनही गावाच्या प्राचिन नावाची ओळख पटू शकते.

म्हसळा हे शहर अतिशय टुमदार असून येथे हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मांचे लोक बहुसंख्य आहेत, पुर्वी हा प्रांत सिद्दी या घराण्याच्या अख्यत्यारित होता व सिद्दीच्या राज्यातल्या बारा महालांपैकी एक होता, भारतास स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा परिसर सिद्दी नवाबांच्याच ताब्यात होता व या सर्व परिसरास हबसाण असे म्हटले जात असे. अतिशय दुर्गम अशा या प्रदेशावर शिवाजी महाराजांनी सन १६४८ साली चाल करुन येथील काही किल्ले व गावे ताब्यात घेतली होती मात्र संधी मिळाली की सिद्दी परत दंडाराजपुरी खाडीतून हल्ला करुन हा मुलूख मराठ्यांच्या हातून काबिज करत असे त्यामुळे बराच काळ येथे सिद्दींची सत्ता अबाधित होती. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावरही हा भाग जंजिरेकर  नवाबांच्या ताब्यात होता कारण त्यांना स्वतंत्र रहायचे होते मात्र स्थानिक जनता विशेषतः म्हसळेकरांनी क्रांतिसुर्य नाना पुरोहीत यांच्या नेतृत्वाखाली जंजिरा मुकुती संग्रमात भाग घेऊन म्हसळा प्रांत प्रजापरिषदेच्या ताब्यात घेतला व कालांतराने जनरेट्याला मान देऊन जंजिरेकर नवाबांनी ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन केले.

म्हसळ्याची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून विवीध जाती-धर्माचे लोक येथे रहातात व विवीध आळ्यांमध्ये या जाती विभागल्या गेल्या आहेत. म्हसळ्याचा बराचसा भाग हा डोंगराळ असून तीन बाजूंनी डोंगर व एका बाजूने खाडीने वेढला गेला असल्याने गावात बाराही महिने अतिशय आल्हाददायक वातावरण असते व येथील तिनही ऋतू खर्‍या अर्थाने मन उल्हासित करणारे असतात. गावात ग्रामदैवत धाविर, गणपती, निगडेश्वर महादेव आदी प्रमुख मंदीरे व एक मशिद असून ग्रामदैवत धाविर देवाची दर चैत्र पौर्णिमेस खुप मोठी जत्रा भरते व यावेळेस नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व म्हसळेकर एकत्र येऊन जत्रेचा आनंद लुटतात. येथील लखमेश्वर महादेव मंदीर अतिशय रम्य असून येथे स्वामी समर्थ व काळभैरव यांची मंदिरे सुद्धा आहेत (रायगड जिल्हा गॅझेटिअर मध्ये मंदिराचा उल्लेख निगडेश्वर असा आला आहे.). लखमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी येथील व परिसरातील जुन्या मुर्त्या मंदिराचे प्राचिनत्व दर्शवितात विशेषतः येथील नंदीची रचना विलक्षण असून येवढा धष्टपुष्ट नंदी क्वचित दुसरीकडे पहाण्यात येतो.

म्हसळ्याच्या आसमंतात अतिशय निसर्गरम्य पर्यटनस्थळे असून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत, यातील एक म्हणजे म्हसळ्याच्या दक्षीणेस डोंगरात असलेले चिरेगणी हे शक्तीस्थळ. चिरेगणी ही देवता म्हसळेकरांचे श्रद्धास्थान असून अतिशय जागृत असल्याचे बोलले जाते. चिरेगणी देवीबद्दल जी अख्यायिका सांगितले जाते त्यानुसार ही देवी ग्रामदैवत धाविर देवी यांची पत्नी असून अतिशय शांतताप्रिय होती मात्र एकेकाळी मंदिर परिसरातल्या गजबजाटास त्रासुन हि देवी म्हसळ्याच्या दक्षीणेकडील दुर्गम डोंगरातल्या एका झर्‍याजवळ कायमस्वरुपी स्थायिक झाली व झर्‍याचे स्थळ म्हणुन या परिसरास चिरेगणी हे नाव मिळाले व देवीसुद्धा याच नावाने प्रसिद्ध झाली. नावाप्रमाणेस हा परिसर अतिशय गुढ व निसर्गरम्य असून डोंगरकपारीत बाराही महिने जिवंत झरा वाहत असतो व या झर्‍याचे अमृततुल्य पाणी टाक्या बांधून आडवले असून जलवाहिनीद्वारे हे पाणी अगदी उन्हाळ्यातही म्हसळेकरांची तहान भागवत असते. या परिसरात अनेक हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य असून पुर्वी येथे ढाण्या वाघाचा वावर असे, मात्र आता हा वाघ रायगड जिल्ह्यात दुर्मिळ झाला असला तरी अजुनही बिबटे व रानडुक्कर यांसारखे अनेक प्राणी येथे पाणी पिण्यास येत असतात. म्हसळेकरांसाठी चिरेगणी हे स्थळ कौटुंबीक सहलीचे व सहभोजनाचे सुद्धा स्थळ असून भक्तांनी येथे भक्तनिवासाची व भोजनगृहाची सोय सुद्धा केली आहे मात्र येथे आपण स्वतःच सर्व सामान आणुन चुलीवर जेवण शिजवावे लागते. म्हसळ्याच्या पुर्वेस असलेल्या देवघर येते असलेले अमृतेश्वर शिवमंदीर सुद्धा भक्तांचे श्रद्धास्थान आहे, चालुक्य कालीन या शिवमंदीराचा येथून जवळच असलेल्या व नुकत्याच उत्खननाने प्रकाशझोतात आलेल्या चांदोरे येथील मंदिरांबरोबर गहिरा संबंध आहे हे येथील मुर्त्या, विरगळी व सतीशिळा पाहील्यावर लक्षात येते.

म्हसळ्यास येण्यासाठी अनेक मार्ग असले तरी माणगाव-साईमार्गे म्हसळा हा प्रमुख रस्ता आहे, मोर्बा सोडले की हा रस्ता दर्‍या डोंगरातून जातो व अगदी म्हसळा येईपर्यंत ही डोंगरातली आडवळणी वाट आपली साथ सोडत नाही. याच रस्त्यावर म्हसळ्याकडे उतरणारी जो घाट आहे त्या घाटाच्या पायथ्याला घोणसे नावाचे गाव आहे व या गावावरुन या घाटासही घोणसे घाटच म्हणतात. एकेकाळी हा घाट अतिशय भिषण असून येथील उग्र वळणांचा अंदाज न येऊन शेकडो वाहनांचे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले होते त्यामुळे हा घाट एक भयकथाच बनली होती मात्र काही वर्षांपुर्वी याच घाटात पर्यायी रस्ता तयार करण्यात आल्याने आता अपघातांची संख्या खुपच कमी झाली आहे. तेव्हा न चुकता कधीतरी निसर्गाच्या सानिध्यातल्या या टुमदार गावास भेट देण्याचा बेत कराच, श्रीवर्धन्-दिवेआगर्-हरहरेश्वर सोबत म्हसळ्यासही भेट दिल्यास हा प्रवास एक वेगळाच आनंद देऊन जाईल.