हबसाण जुई - एक उपेक्षित जलदुर्ग

रायगड जिल्ह्यास अतिशय विपुल अशा दुर्गसंपदेचा संपन्न वारसा लाभला आहे, साक्षात दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड व इतर असंख्य भुईकोट, वनदुर्ग, जलदुर्ग व डोंगरी दुर्ग मिळून अदमासे ४५ हून अधिक किल्ल्यांचा समावेश रायगड जिल्ह्यात होतो. मात्र नवीन साधनांच्या व तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे महाराष्ट्रातील अनेक अज्ञात किल्ल्यांचा नव्याने शोध लागून दुर्गसंपत्तीमध्ये हळूहळू भर पडण्यास सुरुवात झाली आहे.

हबसाण जुई - एक उपेक्षित जलदुर्ग
हबसाण जुई

या प्रकरणात आपण रायगड जिल्ह्यातील अशाच एका उपेक्षित व अज्ञात किल्ल्याबद्दल जाणुन घेणार आहोत ज्याचा इतिहास आजतागायत प्रकाशझोतात आला नव्हता. हा किल्ला जलदुर्ग या प्रकारातला असला तरी याचे स्थान भर समुद्रात नसून पुर्वी नागोठण्याची खाडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या व सध्या धरमतरची खाडी म्हणुन ओळखल्या जात असलेल्या या खाडीस अंबा नदी ज्या ठिकाणी मिळते तिच्या मधोमध आहे या ठिकाणीच अंबा नदीने विलक्षण वळण घेतले असून या वळणाच्या मधोमध हे बेट असून बेटाच्या दोन्ही बाजूस अंबा नदीचा प्रवाह जातो त्यापैकी पुर्वेकडील प्रवाह अधिक रुंद आहे. हा किल्ला म्हणजे पुर्वीचा हबसाण जुई व सध्याची अब्बास जुई हे बेट! या नावांशिवाय या किल्ल्यास पुर्वी 'जुई शामलाची, नागोठण्याची जुई अथवा नागोठण्याचा किल्ला' अशीही नावे होती. नागोठणे हे निजामशाही काळापासून किंवा त्याअगोदरील काळापासून तर्फेचे ठिकाण होते, नागोठणे तर्फाच्या अखत्यारित सुकेळी खिंडींच्या उत्तरेपासून सध्याच्या रोहा तालुक्यातील व पेण व अलिबाग तालुक्यातील खारेपाट हा विस्तृत प्रदेश येत असे. मराठेशाहीत साठ गावांचा मिळून एक तर्फ अथवा महाल होत असे, अशा काही तर्फा मिळून सुभा व परगणा होत असे. खारेपाट या शब्दाचा अर्थ ज्या सुपिक जमिनीत खाडीचे पाणी शिरते अथवा पावसाळ्यात जी जमिन पाण्याने भरते ती जमिन अशा जमिनीत मिठाचे उत्पादन सुद्धा घेतल जाते. हा संपुर्ण खारेपाट प्रदेश मध्ययुगात ब्रिटीश, पोर्तुगिज, सिद्दी व मराठे यांच्या राज्यांच्या सरहद्दीवर असल्याने अतिशय संवेदनशिल बनला होता व अनेकदा उभयपक्षांमध्ये हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी चकमकी होत असत व खारेपाटात रक्ताचे पाट वाहत असत व अशाच संवेदनशिल अशा ठिकाणी हबसाण जुई हे नैसर्गिक बेट अंबा नदीच्या पात्रात एखाद्या देवमाशाच्या पाठीसारखे उभे आहे, नैसर्गिक बेट असल्यामुळे निसंशय प्राचिन काळापासून हे बेट अस्तित्वात असले तरी किल्ला म्हणुन याचा वापर शिवकालापासून करण्यात आल्याचे संदर्भ मिळतात मात्र हा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांनी बांधला नसून जंजिरेकर सिद्दीने बांधल्याचे संदर्भ सापडतात. त्याकाळी हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात असला तरी खाडी परिसर किंवा समुद्र यांच्यावर बहुतांशी सिद्दींचा उपद्रव होता व ते मुघलांचे मांडलिक असल्याने मुघलांचा व ब्रिटीशांचा व पोर्तुगिजांचा त्यांना कधी उघड तर कधी छुपा पाठिंबा असे. मात्र ब्रिटीशांनी नुकताच भारताच्या व्यापारात प्रवेश केल्यामुळे अगोदर बलाढ्य अशा मराठा साम्राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले असल्याने सिद्दी अनेकदा ब्रिटीशांना व मराठ्यांना एकाच वेळी उपद्रव देण्याचा प्रयत्न करत असे व त्याकाळी मुंबईकर ब्रिटीश व मराठी साम्राज्याचा महत्त्वाचा दुवा नागोठण्याची खाडी हा होता कारण मराठ्यांच्या मुलुखातून ब्रिटीशांना सरपण, तांदुळ, लाकुड इत्यादी अनेक वस्तू मिळत तर ब्रिटीशांना कोकणातून देशावर व्यापार करण्यासाठी मराठी मुलुखातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र ब्रिटीशांच्या या अंतस्थ हेतूंना सिद्दीच्या कारवायांमुळे अनेकदा तडा जात असे. शिवाजी महाराजांचा सिद्दीवर प्रचंड रोष असल्याने ते त्यांनी अनेकदा ब्रिटीशांना सिद्दीला मुंबई बंदरात थारा न देण्याबद्दल दटावले होते मात्र सिद्दी मुघलांचा सरदार असल्याने व मुघलांच्या मुलुखात ब्रिटीशांचा माल खपत असल्याने ब्रिटीशांना त्यानुसार वागणे शक्य नव्हते.

हबसाण जुईचा पुसटसा उल्लेख ऑक्टोबर १६७३ सालच्या मुंबईहून सुरतेला गेलेल्या ब्रिटीशांच्या पत्रात पुढीलप्रमाणे येतो "सिद्दीच्या आरमाराने आपल्या लिलांनी आम्हाला चकित केले. त्याने सर्व घेतलेल्या शपथा बाजुला ठेवुन करंजा, पेण व नागोठणे खाडीत प्रवेश करुन नाकेबंदी केल्याने मुंबई बेटाला फार हलाखीचे दिवस आले आहेत" मुंबईपासून नागोठण्यापर्यंत या खाडीत हबसाण जुई हे एकच असे बेट आहे ज्यावर केलेली नाकेबंदी संपुर्ण खाडीचे दळणवळ्ण ठप्प करु शकते. याशिवाय २३ ऑक्टोबर १६७३ च्या आणखी एका पत्रात मुंबईकर ब्रिटीशांनी सुरत कन्सल्टन्सी ला पाठवलेल्या पत्रात "कारंजा व साष्टी यांचे प्रभुत्व पोर्तुगिजांकडे आहे त्यामुळे या बंदरावर आपला हक्क ते सांगत असले तथापी इंग्रजांच्या रोषाने नागोठण्याजवळ सिद्दी जो किल्ला बांधत आहे त्याला ते (पोर्तुगिज) विरोध करणार नाहीत" या पत्रावरुन याच काळात हबसाण जुई बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु झाल्याचे स्पष्ट होते. दि. ३१ ऑक्टोबर १६७३ च्या एका पत्रात ब्रिटीश लिहीतात "दक्खनच्या किनार्‍यावरील हल्ल्यांत  नागोठण्याच्या नाकेबंदीच्या बाबतीत शिवाजीने ३०० लोकांनिशी बंदोबस्त केल्यामुळे सिद्दी संबुळची फजिती होऊन तो आमच्याशी स्नेह जोडू पहात आहे". सिद्दीने म्हणजे हबशांनी ही जुई ताब्यात घेऊन तेथे ठाणे दिल्यामुळे हबसाण जुई असे नाव मिळाले, मात्र याच काळात मुंबईची बेटे भराव घालून एकत्र करण्याचे जे काम ब्रिटीश करत होते त्याला या किल्ल्यामुळे हादरा बसला कारण मुंबई बेटावर भराव घालण्यासाठी लागणारे मजुर नागोठण्याच्या परिसरातले होते व यासम्दर्भात एक तक्रारवजा पत्र मुंबईकर इंग्रजांनी १५ डिसे १६७३ साली इंग्लंडच्या राजास पाठवले ते पुढीलप्रमाणे "नागोठण्याच्या खाडीच्या तोंडावर सिद्द्याने त्याच वेळी ठाणे दिल्याने तेथून मजुर मिळण्याचे बंद पडले त्यामुळे पाण्याखालील जमिन दुरुस्त करण्याचे काम झालेले नाही" अशा पद्धतीने शिवकालीन साधनांत या किल्ल्याचे संदर्भ मिळतात मात्र सिद्दीच्या ताब्यातला हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात कालांतराने आला असावा व संभाजी महाराजांच्या काळात सरखेल कान्होजी आंग्र्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस या किल्ल्याचा वापर सिद्दी व ब्रिटीशांवर वचक ठेवण्यासाठी केला असावा. संभा़जी महाराजांच्या मृत्यूनंतर या किल्ल्याचे अधिपत्य परत एकदा सिद्दीकडे गेले असावे मात्र शाहू महाराजांनी बाजिराव पेशवे व सरखेल कान्होजी आंग्र्यांच्या सहाय्याने कोकणातील जो मुलुख सिद्दीकडून ताब्यात घेतला त्यावेळी हा दुर्ग परत मराठ्यांकडे आला असावा मात्र हा किल्ला अतिशय संवेदनशिल ठिकाणी असल्याने याचे स्वामित्व अनेकदा वेगवेगळ्या सत्तांकडे जात असे. सन १७३३ साली जेव्हा शाहू महाराजांनी जंजिरा ताब्यात घेण्यासाठी आंग्रे, पेशवे, पंतप्रतिनिधी इत्यादी बलाढ्य सेनान्यांना कोकणावर चाल करण्यास सांगितले त्याकाळात हा किल्ला सिद्दीकडे असल्याचे २७ जुलै १७३३ सालच्या एका पत्रावरुन कळते हे पत्र कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांनी बाजिराव पेशवे यांना लिहीले असून त्यात पुढीलप्रमाणे मजकुर आहे "विनंती उपरी तर्फ नागोठणे येथील जुईवर शामलाकडील लोक ठाणे यास होते त्यास येथून कौल दिला होता. ते आपल्या लोकानी लुटले म्हणुन लिहीले तरी इकडील लोक जुईस गेले नाहीत व ते प्रांते स्वारी ठेवली नाही" वरील मोहिमेनंतर सिद्दीच्या ताब्यातुन हा किल्ला कायमस्वरुपी निसटला व त्यानंतर आंग्र्यांनी या किल्ल्यावर ठाणे बसवले असले तरी हा किल्ला पुढे हबसाण जुई म्हणुनच ओळखला गेला. उत्तर आंग्रे काळात सरखेल पहिले रघुजी आंग्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांत जी यादवी उफाळून आली त्यावेळी त्यांच्या जयसिंगराव नामक दासिपुत्रास रघुजींची प्रथम पत्नी आनंदीबाईंनी अटक केल्यावर जयसिंगाच्या पत्नीने म्हणजे सकवारबाईने कैदेतून निसटून 'नागोठण्याचा किल्ला ताब्यात घेतला व तेथून ति आंग्र्यांच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली' असे उल्लेख आहेत हा नागोठण्याचा किल्ला म्हणजेच हबसाण जुई.

आंग्र्यांच्या ताब्यात हे बेट असताना अनेक दर्यावर्दी घराणी या बेटावर कायमस्वरुपी स्थायिक झाली, ब्रिटीश, पोर्तुगिज व सिद्दींवर या बेटावरुन मोहिमा काढून मग परत वस्तीसाठी या बेटावर यायचे असा हा क्रम होता. परिसरात कितीही पावसाळा असला व भरतीच्या उधाणात किंवा अतिवृष्टीत खारेपाटाचा संपुर्ण प्रदेश जेव्हा पाण्याखाली जात असे तेव्हा फक्त हबसाण जुईच पाण्यापासून सुरक्षित रहात असे असा या बेटाचा महिमा होता. अर्थात ही निसर्गनिर्मित आपत्तीची गोष्ट झाली मात्र आधुनिक काळात घडलेल्या एका मानवनिर्मित आपत्तीने या बेटाचे अभेद्यत्व संपुष्टात आणले, ती घटना म्हणजे २३ जुलै १९८९ चा महापुर, अंबा नदीचा उगम ज्या खंडाळाच्या दक्षीणेकडून होते तेथील उगमावर आय. एन. एस. शिवाजी हे धरण आहे. १९८९ च्या जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे हे धरण तुडूंब भरले होते व फुटण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे या धरणाचे दरवाजे अचानक उघडण्यात येऊन पाण्याचा प्रचंड प्रवाह सह्याद्रीच्या माथ्यावरुन खाली येऊन जांभुळपाडा, पाली, नागोठणे अशी शहरे एकामागोमाग एक उध्वस्त करत निघाला व पुढे त्याने हबसाण जुई या बेटाचा सुद्धा घास घेतला, आजवर इतकी निसर्गर्निमित संकटे पचवलेली ही जुई मानवनिर्मित संकटापुढे मात्र हतबल ठरली व शेकडो वर्षांपासून या बेटावर रहिवास करणारा भुमीपुत्र एका रात्रीत पुरग्रस्त झाला, त्याचे घर दार व संसार महत्त्वाची कागदपत्र उध्वस्त झालीच पण पिढ्यानपिढ्या जपलेली हक्काची जमिनही त्यास नाईलाजाने सोडावी लागली. या महाप्रलयानंतर बेटावरील मुळ वस्ती बेटाच्या बाजुस असलेल्या परिसरात करण्यात आली, मात्र येथील नागरिकांचे मुळ स्थाने हे हबसाण जुई हे बेटच असून आजही येथे शेतीकाम करुन ते आपल्या काळ्या आईची निगा राखतात याशिवाय येथे पुर्वी काही दैवते होती जी आता बाजुच्या गावांत पुनर्प्रतिष्ठापित करण्यात आली आहेत. या बेटाला भेट देण्यासाठी होडीचाच वापर करावा लागतो कारण हे बेट चारही बाजूने पाण्याने वेढले गेले आहे. पुर्वी येथे मुंबईहून स्टीम बोट सुविधा होती मात्र नागोठण्याच्या खाडीवर धरमतर येथे पेण्-अलिबाग रस्त्यावर पुल बांधला गेल्याने नागोठणे खाडीच्या अलिकडील भागातील जलप्रवास संपुष्टात आला. सध्या अलिबाग तालुक्यातुन व पेण तालुक्यातून या बेटावर जाण्यासाठी स्थानिक जलमार्ग आहेत ज्याचा वापर फक्त स्थानिक करत असतात. मध्ययुगात पराक्रमाचा पोवाडा गायलेले हे बेट आधुनिक युगात मात्र उपेक्षित काव्य बनून राहिले आहे, नुकत्याच प्रकाशझोतात आलेल्या या किल्ल्याच्या इतिहासामुळे या बेटाच्या इतिहासास व येथील नागरिकांच्या पराक्रमाच्या इतिहासास व या बेटाचे आद्य रहिवाशी सध्या पुनर्वसित गावांत रहात असलेल्या सर्व नागरिकांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.