माहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती

‘कधी येतोयस ट्रेकला?’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस?’, ‘अहो यायचंय मला’, पुढच्या वेळी नक्की येतो’ या सर्व प्रश्नांना अस्मादिकांनी लगाम घातला त्या मोहीमेची ही गोष्ट… खूप दिवसाआधीच विवेक सरांनी या मोठ्या ट्रेक आणि शिबिराची कल्पना दिली होती व यायचंच आहे म्हणून सांगितलं होतं आणि मीही येणारच असं सांगितलं होतं. त्यानुसार सरांचं व नानांचं नियोजन चालू होतं. माझ्या या आधीच्या न येण्याच्या अनुभवावरून स्नेहाताई वारंवार खात्री करून घेत होत्या.

माहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

अखेर आदल्या रविवारी माहुली येथील शिबिराची शेवटची बैठक पार पाडली. ठरल्याप्रमाणे २२ मार्चला सकाळी विवेक सर, यादव सर, समीक्षा व वेदांत हे दोन छोटे उस्ताद आणि दिलीप इंगळे उर्फ नाना व BARC संकुलातील ५ ते १६ वयोगटातील ३० मुलामुलींचा चमू त्यांच्या कप्तानांसह माहुलीला दाखल झाला व नंतर मी, स्नेहाताई, अजय मामा, अंकिता आणि व्योम व निहार हे दोन छोटे उस्ताद संध्याकाळी माहुलीच्या पायथ्याला दाखल झालो.  खूप वर्षांनी माहुलीला आलो होतो. माहुलीचे सुळके पूर्वीप्रमाणेच उत्तुंगता नि अभेद्यता मिरवत होते पण माहुलीच्या पायथ्याला झालेला बदलही विलक्षण होता. पूर्वी पायथ्याला फक्त एक मातीचा रस्ता, एक मंदिर आणि एक दुकान इतकंच होतं तिथे आता डांबरी रस्ता, ग्रामपंचायतीचे पर्यटक निवास त्यापुढे वनविभागाच्या निवासापर्यंत जाणारी पेवर ब्लॉकची वाट इत्यादी सर्व सोयी झाल्या होत्या. आम्हीही याच वाटेने वनविभागाच्या पर्यटक निवासात आलो. याआधी सर्वांना सकाळी यादव सरांनी अग्निसुरक्षेबद्दल तसेच knots बद्दल माहिती दिली होती. आम्ही पोहोचलो तेव्हा विवेक सर प्रथमोपचाराबद्दल माहिती सांगत होते. अपघात झाल्यावर नेमकं काय करायचं, अपघातग्रस्ताला कशाप्रकारे त्या स्थळापासून दूर न्यायचं, त्याला दुखापत झाली असल्यास कोणत्या प्रकारचे प्रथमोपचार करावेत याबद्दलची माहिती सर देत होते आणि त्यावेळीच त्याचं प्रात्यक्षिक देखील मुलांकडून करवून घेत होते. मुलं देखील उत्साहाने व आवडीने ते करत होते. त्यासंबंधी जिज्ञासेने प्रश्नदेखील विचारत होते व सरांनी देखील त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं.

संध्याकाळचे सत्र संपल्यानंतर चहापानाचा छोटा ब्रेक झाला. चहापान झाल्यानंतर rope walk आणि जिम्नॅस्टिक्सचा कार्यक्रम होता. सर्वांचे चार संघात विभाजन केले होते. त्यापैकी २ संघांना स्नेहाताई आणि अंकिता यांच्याबरोबर समीक्षा, वेदांत, निहार व व्योम जिम्नॅस्टिक्स शिकवत होते. तर बाहेर २ संघ rope walkसाठी मैदानात उतरले. विवेक सर, यादव सर, अजय मामा rope walkचे set up करत होते त्यावेळी knots, बांधणी, anchor, tractor अशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. rope walkचा एकंदर प्रकार पाहून मुलांच्या व त्यांच्या कप्तानांच्या मनात धाकधूक, कुतूहल व उत्सुकता होती. एकीकडे २ संघ ropewalkचा थरार अनुभवत होत्या तर आतल्या बाजूस २ संघ जिमनॅस्टिक्सची धमाल अनुभवत होते. अखेर काहींनी धडपडत पण न पडता, काहींनी सावधपणे, काहींनी उत्साहात rope walkची मोहीम पार पडली. चारही संघांनी दोन्ही कार्यक्रम योग्यरीतीने पार पडले. आपण काहीतरी नवीन शिकलो, साहस केलं याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

ह्या कार्यक्रमानंतर सकाळी व दुपारी केलेल्या कार्यक्रमाची उजळणी घेण्यात आली व काही प्रथमोपचाराच्या इतर काही पद्धती सर शिकवत होते. कार्यक्रम सुरु असतानाच रात्रीच्या समयी DK सर दाखल झाले आणि एकूण कार्यक्रमाला अजूनच रंगत आली. या कार्यक्रमात सकाळी शिकवलेल्या सर्व गोष्टींची परीक्षा घेण्यात आली. चारही संघांनी त्यात उत्तम कामगिरी केली व त्याबद्दल त्यांना गुणही देण्यात आले. ह्यानंतर थोडा विसावा देण्यात आला. त्यात काहीजण गप्पा मारत होते, आवरत होते, आज दिवसभर जे जे केलं त्याबद्दल चर्चा करत होते. नंतर सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. घरी ‘हे नको ते नको’ बोलणाऱ्यांनीदेखील जे ताटात होतं ते आवडीने संपवलं. जेवणानंतर प्रत्येकजण उद्याच्या तयारीला लागला होता. कारण आज जरी सर्व जमिनीवर निवांत क्लास टेस्ट झाली असली तरी खरी परीक्षा उद्या होती. उद्याचं काय? याचा विचार करत असता दिवे मालवले गेले आणि सर्व झोपी गेले.

२३ मार्चच्या दिवसाची सुरुवात झाली ती पहाटे  पाच वाजता. सर्वांनी पटापट सर्व विधी आवरले. सर्वांना विशेष टीशर्ट आणि तुंगा ट्रेकर्सचा badge देण्यात आला. न्याहारी आटपली व सर्वजण रांगेत उभे राहिले. माहुलीच्या गिर्यारोहणाविषयी विवेक सरांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यादव सर आज मुंबईत परतणार होते व विवेक सर खालीच थांबणार होते त्यामुळे या मोहीमेची जबाबदारी स्नेहाताई, DK सर, अजय मामा, अंकिता, नाना व मी यांच्यावर होती. शेवटी एक सामूहिक फोटो घेण्यात आला व सर्वांची पावले माहुली गडाच्या दिशेने पडू लागली.

आजचा दिवस विशेष होता. ज्यांच्यामुळे गड-किल्ले यांना महत्त्व प्राप्त झाले, रयतेचे कल्याण झाले, महाराष्ट्रदेशीचा अंधःकार दूर झाला त्या शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे जन्मदिन होता. गडपतींच्या जन्मदिनी त्यांच्या गडावर जाण्याचा योगायोग आला. सकाळी साधारण सात वाजता ट्रेकला सुरुवात झाली. प्रत्येकजण शिस्तीत एकामागोमाग एक रांगेत मार्गक्रमण करत होता. सुरुवातील मी, अंकिता पुढे स्नेहाताई, अजय मामा मधल्या जागी आणि नाना व DK सर शेवटी होते. साधारण अर्ध्या तासाच्या चालीनंतर एका सपाटीवर आलो.

सकाळची वेळ होती तरी सूर्यराव बऱ्यापैकी वर आले होते आणि तेव्हाच त्यांनी त्यांचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पुढे काय होणार याचा अंदाज आलाच होता. थोड्याश्या विश्रांतीनंतर सर्वजण पुन्हा मार्गस्थ झाले. सूर्यराव अजून वर येत होते नि ताप वाढवत होते. वाटेत काही झाडी होती पण त्यांची सावली पुरेशी नव्हती. तरीही माहुलीच्या डोंगररांगांवरून आमचे मार्गक्रमण चालूच होते. प्रत्येकजण आपल्या वेगानुसार पण रांगेत पुढे पुढे सरकत होता. साधारण एक तासानंतर पुन्हा छोट्याश्या विश्रांतीसाठी थांबलो. इथून नवरा, नवरी, भटोबा, करवली व इतर सुळके स्पष्टपणे दिसत होते. पाणी, ग्लुकॉन-डी वगैरेचे पेट्रोल प्रत्येकाने आपापल्या गाडीत भरले नि पुन्हा सर्वजण माहुलीच्या वाटेला लागले.

आता स्नेहाताई व अंकिता सर्वात पुढे होत्या तर मामांनी त्यांचं मधलं स्थान कायम राखलं होतं तर मी आता नाना नि DK सर यांच्या सोबत मागच्या फळीत होतो. थोड्याश्या सपाटीनंतर झाडांनी आच्छादलेल्या चढावावरून वाट तुडवत सर्वजण पुढे जात होते. या वाटेवर काही रंगीबेरंगी पाने असलेली झाडे होती व त्यावर बसलेले काही पक्षी मामांनी दाखवले. झाडांनी आच्छादलेली वाटेमुळे थोडा थकवा कमी झाला होता पण ही वाट देखील लवकरच संपली व पुन्हा उजाड वाटेवरून मार्गक्रमण सुरु झालं.  स्नेहाताई व अंकिता यांच्या बरोबरच्याच्या मुलांपेक्षा आमच्याबरोबरची दोन मुलं जरा जास्तच थकली होती त्यामुळे त्यांना वर नेण्यास वेग कमी होत होता. वाटेत पुढे एक छोटा rock patch व पुढे असणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मामा पुढे निघून गेले. आता मी, नाना आणि DK सर मागून मुलांना समजावत, धीर देत पुढे नेत होतो. तर स्नेहाताई, अंकिता व मामा इतर मुलांसोबत डोंगरधारेची वाट संपवून बऱ्यापैकी पुढे गेले होते. आम्हीही हळू हळू पुढे सरकत डोंगरधारेची वाट पार केली.

‘अजून किती वेळ?’ या दोन्ही मुलांच्या प्रश्नाला ‘आलंच’, ‘थोडंच बाकी आहे’ अशी उत्तरं देत हळू हळू त्यांना पुढे नेत होतो. यादरम्यान स्नेहाताईबरोबरच्या मुलांनी rock patch सुरक्षितपणे पार केला होता. आम्ही अजून त्यांच्यापासून खूपच मागे होतो. मग पुन्हा त्यांना घेऊन हळूहळू पुढे सरकत राहिलो. आता माहुली गडाच्या प्रवेशाची लोखंडी शिडी दिसू लागली होती.

त्यामुळे लहान मुलांना देखील धीर आला होता. त्यामुळे त्यांचाही वेग आता थोडा वाढला होता. तोपर्यंत पुढच्यांनी लोखंडी शिडी पार करत माहुलीच्या माथ्यावर प्रवेश केला होता. मामा आमची वाट बघत नि pano मारत शिडीजवळ थांबले होते. थोड्याच वेळात आम्हीही तिथे पोहोचलो व अखेर लोखंडी शिडी पार करून गडप्रवेश केला. तोपर्यंत स्नेहाताई व अंकिता यांच्याबरोबरचे माहुलीच्या महादरवाजात दाखल होऊन विश्रांती करत होते. आम्हीही लवकर प्रवेशद्वार गाठायचं म्हणून निघालो. उजवीकडची वाट पकडली. या वाटेवर एक पाण्याचे टाके लागते. त्यातील पाणी जरा खाली गेले होते पण नाना आणि मामांनी मेहनत करून बाटल्या भरून घेतल्या. माहुलीच्या या भागात फक्त दोनच पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत एक हा व दुसरा महादरवाजाच्या जवळ थंडगार पाण्याचे घोट रिचवल्यानंतर सर्वांच्या अंगात नवीन तरतरी आली नि नव्या दमाने प्रवेशद्वाराची वाट जवळ केली.

साधारण ११ वाजता आम्ही महादरवाजाजवळ दाखल झालो. तिथे सर्वांनी आमचे सहर्ष टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. �� इतरांची विश्रांती झाली होती म्हणून आम्हीदेखील थोडा विसावा घेतला. सुका खाऊ वगैरे खाऊन घेतला. आता या पुढची जबाबदारी माझी होती. ती म्हणजे किल्ल्याची माहिती द्यायची. त्यासाठी सर्वजण माहुलीच्या उद्ध्वस्त महादरवाजात दाखल झालो. महादरवाजात एक शुभचिन्ह व दोन शरभ शिल्प आहेत. शरभाची कथा मुलांना सांगितली व त्यांनतर किल्ल्याची माहिती सांगितली. अशाप्रकारे माहिती वगैरे सांगण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे माझ्या मनात देखील धाकधूक आणि उत्सुकता होती. साधारण १० ते १५ मिनिटांमध्ये किल्ल्याची माहिती सांगितली. अशाप्रकारची संधी मला दिली त्याबद्दल विवेक सरांचे विशेष आभार. माझ्यानंतर अजय मामांनी इंग्रजीमध्ये किल्ल्याची व परिसराची थोडक्यात माहिती दिली.

त्यांनंतर महादरवाज्यात सामूहिक फोटोसेशन पार पडले व उन्हं वाढायच्या आत परतीच्या मार्गावर लागलो. त्याआधी सर्वांनी पुन्हा टाक्यातून पाण्याच्या भरून घेतल्या. मुंबईत शुद्ध पाणी पिणाऱ्या मुलांनी टाक्यातील पाणी चवीने प्यायले. साधारण १२ वाजता पुन्हा सर्वजण लोखंडी शिडीजवळ आले. पुन्हा आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आल्या. गड उतरण्यास सुरुवात केली. जितकं मुलांना चढवणं जबाबदारीचं काम होतं तितकंच त्यांना उतरवणं. प्रत्येकजण रांगेत गड उतरत होता. यावेळी देखील स्नेहाताई व अंकिता सर्वात पुढे होत्या, मामांनी middle order सांभाळली होती आणि नाना,मी आणि DK सर मागून गाडीला धक्का देत होतो. काही प्रमाणात निसरडी वाट नि खडक यांच्यातून सावधपणे मार्ग काढत सर्वजण उतरत होते आणि त्यात लोहगोल आग ओकत होता. त्यामुळे खडक तापले असल्याने त्यांचाही फारसा आधार घेता येत नव्हता. पण तरीही ‘थांबायचं नाय गड्या’ बोलत स्नेहाताई आघाडीवरून गड उतरवत होत्या. उतरताना सावधपणे rock patch उतरायचे असल्याने सर्वच हळू हळू पुढे सरकत होते. पण न थांबता गड उतरणे चालू होते. गड अर्ध्यापर्यंत उतरून झाला होता. पण त्यांनतर चढताना काही मुलं मागे राहिली ती व आणखी दोघांची भर त्यात पडल्यामुळे आमचा वेग मंदावला. अनेकांचा हा पहिलाच ट्रेक होता म्हणून सवय नसल्यामुळे व ऊन वाढल्यामुळे त्यांचा वेग कमी झाला होता. मग आधीसारखंच स्नेहाताई, अंकिता व मामा पुढे गेले. मी देखील दोन मुलांसोबत मध्यभागी होतो व मागची दोन मुलं खूपच हळू चालत असल्यामुळे नाना व DK सर मागून येत होते.

एकीकडे वेळ सरत होती त्यामुळे उन्हं अजून वाढत होती त्यामुळे वाटेत थोडं थांबत थांबत, सावलीत विश्रांती घेत उतरत होतो. वाटेत छोट्या साहिल सोबत गप्पा मारत बऱ्यापैकी वेळ जात होता आणि छोट्यांच्या विश्वाची नवीन माहिती कळत होती. थोड्या थोड्या वेळाने मुलं पण ‘कधी येणार, कधी येणार? विचारायची त्यावर ‘अरे आलंच, पाचच मिनिटं’ अशी नेहमीची उत्तरं देत त्यांना खाली आणत होतो. नाना आमच्यापासून ठराविक अंतरावर इतर दोघांना घेऊन येत होते पण DK सर बरोबरच्या मुलीमुळे अजून बरेच मागे होते. अडीच तासानंतर अखेर लाकडी पूल दिसला आणि माझ्याबरोबरच्या मुलांना आपण पोहोचलो याची खात्री झाली. बेस कॅम्पला पोहचलो तेव्हा उन्हावरची मात्रा कोकम सरबत बनवून ठेवले होते. ते पोटात ढकललं तेव्हा कुठे जीवात जीव आला. थोड्या वेळात नाना व इतर मुलं आली पण DK सर व त्यांच्या बरोबरचे आले नव्हते म्हणून गिरीजा सर कोकम सरबत घेऊन त्यांना आणायला गेले व थोड्याच वेळात तेही DK सर व इतरांना घेऊन परतले नि ट्रेकची सांगता झाली. DK सरांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होता. फक्त एक-दोन मुलांना थोडासा उन्हाचा त्रास झाला. नंतर पुन्हा सहभोजन झाले व दमून आल्यामुळे सर्वांना थोडावेळ आरामासाठी देण्यात आला.             आरामानंतर संध्याकाळी PT मास्तर गिरीजा सर संघ बांधणीचे खेळ घेत होते तर दुसरीकडे विवेक सर वगळता आम्ही भेळ बनवत होतो. भेळ बनवता बनवता भाजीपावची गाडी आणि त्याची विचित्र पण खास नावं यापर्यंत गाडी गेली पण चहाची वेळ झाली व त्या गाडीला ब्रेक मारत भेळसोबत चहापान झाला.

त्यानंतर “फ्रॅक्चर झाल्यावर किंवा हाडांना दुखापत झाल्यास कोणते प्रथमोपचार करावेत, अपघात झाल्यास तत्कालीन उपलब्ध साधनांच्या मदतीने स्ट्रेचर कसा बनवावा वा स्ट्रेचर उपलब्ध नसल्यास अपघातग्रस्ताला सुरक्षित स्थळी कसे न्यावे” यासंबंधीचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवण्यात आले व त्यांच्याकडून ते करवून देखील घेतले. त्यांनतर पुन्हा knotsची त्यांची उजळणी घेण्यात आली. अखेर आजच्या ट्रेकबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांना जे जे कळलं ते ते त्यांनी त्यांच्या शब्दांत मांडलं. रात्रीच्या जेवणानंतर camp fireचा कार्यक्रम होता. त्यात मुलांच्या नृत्य, गाणी, व्यायाम, किस्से, कलाकृती असे विविधगुणदर्शन झाले. सकाळपासून इतकी कसरत झाल्यामुळे सर्वजण लवकरच निद्रादेवीच्या आहारी गेले व शिबिराचा दुसरा दिवस संपला.

२४ मार्च २०१९ शिबिराचा तिसरा, शेवटचा आणि rappellingच्या थराराचा दिवस. हा दिवस देखील सकाळी ५लाच सुरु झाला. इकडे सर्वजण आवारावर करत होते आणि दुसरीकडे विवेक सर, गिरीजा सर व स्नेहाताई rappellingचं set up करण्यासाठी पुढे गेले. न्याहारी करून आम्हीही देखील निघणार त्याचवेळी रॉनी मामा दाखल झाले व त्यांच्यासोबतच सर्वजण rappellingच्या ठिकाणी दाखल झालो. रॉनी मामा, विवेक सर, स्नेहाताई डोंगरावर rappelling सांभाळत होते, गिरिजासर मुलांना rappellingच्या साहित्यांनी सजवत होते तर डोंगरावर नाना व  खाली अंकिता सप्लाय लाईनला होते आणि DK सर व अजय मामा बिले द्यायला सज्ज होते व मी कॅमेरा घेऊन एक दगड पकडला होता.

सर्वप्रथम स्नेहाताईनी rappellingचं प्रात्यक्षिक करून दाखवलं व महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानंतर एक-एक संघ rappelling करण्यासाठी वर जाऊ लागला. कालप्रमाणे आजही सूर्यराव आग ओकीत होते. आम्ही खाली खुल्या जागी असल्यामुळे चांगलेच भाजून निघत होतो.  विवेक सर, रॉनी मामा व स्नेहाताई सर्वांना कसं उतरायचं याविषयी मार्गदर्शन करत होते. काही मुलांनी घाबरत, काहींनी उत्साहात, काहींनी गडबडत, काहींनी आत्मविश्वासाने rappellingचा थरार अनुभवला. सर्वात शेवटी अस्मादिकांनी सुरवातीला ठीक आणि नंतर गोंधळत rappelling केले आणि rappellingच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

पर्यटक निवासात आल्यानंतर कोकम सरबतावर ताव मारण्यात आला. शिबीर आता अंतिम टप्प्यात आले होते. जेवणानंतर पुन्हा सर्वांना एकत्र बसवून त्यांच्याकडून एकूण शिबीरावर प्रतिक्रिया घेण्यात आली. सर्वांचाच प्रतिसाद सकारात्मक होता. “अजून काही दिवस देखील राहता येईल का?”, “पुढच्या ट्रेकला नक्की येणार” अशा समाधानकारक प्रतिक्रिया आल्या. अखेर छोटे उस्ताद वेदांत, समीक्षा यांच्या व विवेक सर नि ज्यांच्या कल्पनेचे फळ हे शिबीर होतं त्या नानांच्या छोट्याश्या भाषणाने शिबिराची सांगता झाली.     ३ दिवस आपल्या कॉलनीच्या छोट्याश्या विश्वाबाहेर जगण्याचा आनंद, असेल त्या परिस्थितीशी adjust होणं, नकार घंटा न लावता मिळेल ते अन्न खाणे, नवनवीन skills शिकणं, निसर्गात राहून त्याच्याशी एकरूप होऊन जगणं आणि मजा करत स्वावलंबन व शिस्त या सर्व गोष्टींचा अनुभव मुलांना भविष्यात उपयोगी पडेल यात शंका नाही. मला स्वतःला या शिबिरातून अनेक फायदे झाले. कोणीतरी माझ्यावर इतका विश्वास ठेवून मला बोलण्यासाठी, थोडेफार जे काही ज्ञान आहे ते इतरांसोबत वाटण्यासाठी किल्ल्यासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, rappelling सारखा साहसी खेळ ज्यापासून मी आजवर दूर होतो तो प्रत्यक्ष अनुभवता आला; फारसा चांगलं नाही करता आलं पण नंतर नक्कीच त्यात सुधारणा होईल, आजवर मी फक्त ठराविक मित्रांसोबत किंवा मर्यादित संख्येने ट्रेक केले होते पण यावेळी जास्त संख्या असलेल्या ट्रेकमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो; अश्या ट्रेकचे नियोजन कसं असतं-होतं ते जवळून पाहता आलं, rope व त्यासंबंधी इतर गोष्टी शिकायला मिळाल्या. विवेक सर, अजय मामा, स्नेहाताई, DK सर, रॉनी मामा, यादव सर, नाना, गिरीजा सर, अंकिता यांसारख्या सहकाऱ्यांच्या सहवासात अनेक गोष्टी नव्याने कळल्या व शिकता आल्या आणि म्हणजे वेदांत, समीक्षा, व्योम, निहार यांसारखे छोटे मित्र मिळाले. त्यातली समीक्षा तर आपल्या इतिहासाच्या गटातील निघाली �� . या शिबिरात अनेक गोष्टी पार पडल्या पण  काही गोष्टी देखील उदयास आल्या उदाहरणार्थ जिरू व बिर्याणीची राहिलेली मेजवानी आणि स्नेहाताईंची सुळके सर करण्याची वाढलेली यादी. या गोष्टी लवकर पूर्ण होवोत हीच सदिच्छा..

- अमित म्हाडेश्वर