केंजळगड - कोरीव पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असा किल्ला
सह्याद्रीतील शंभू महादेव डोंगररांगेची एक शाखा मांढरदेव या नावाने ओळखले जाते. याच मांढरदेव डोंगररांगेतील शाखेतील एका शिखरावर केंजळगड हा किल्ला बांधण्यात आला आहे.
केंजळगड हा किल्ला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १३०० मीटर आहे.
सह्याद्रीतील शंभू महादेव डोंगररांगेची एक शाखा मांढरदेव या नावाने ओळखले जाते.
याच मांढरदेव डोंगररांगेतील शाखेतील एका शिखरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.
उत्तर दिशेकडून गडावर जाण्याचा मार्ग असून कडा तोडून अदमासे शंभर पायर्या बांधण्यात आल्या आहेत.
पायऱ्यांच्या सुरुवातीस मोठा बुरुज आणि पहाऱ्याची जागा आपल्या दृष्टीस पडते.
थोड्याच अंतरावर कातळात कोरलेली गुहा दिसून येते. गुहेच्या अंतर्भागात साठवणुकीची व चुलीची जागा आहे.
इथून पुढे एका बाजूस उंच कडा आणि दुसऱ्या बाजूस खोल कडा यांच्या मध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या निर्माण करताना फार मेहनत करावी लागली असेल हे निश्चित.
कोरीव पायऱ्या चढून आपण थेट किल्ल्याच्या पठारावर येऊन पोहोचतो.
येथे एका उंचवट्यावर एक बांधकाम दृष्टीस पडते.
बालेकिल्ल्यावरील अनेक इमारती आता अस्तित्वात नाहीत फक्त त्यांचे अवशेष व जोती दृष्टीस पडतात.
गडावर गडदेवता केंजळाई देवीचे मंदिर आहे. आज मंदिराचे अवशेष शिल्लक असले तरी पूर्वी हे मंदिर खूप सुंदर असले पाहिजे असे जाणवते.
पूर्वी गडावरील बांधकामासाठी चुन्याचा वापर केला जात असे व त्याचे मिश्रण तयार करण्यासाठी दगडाचे वर्तुळ करून त्या गोलाकार जात्याने चुन्याचे मिश्रण केले जात असे ज्यास चुन्याचा घाणा असे म्हटले जात असे. केंजळगड किल्ल्यावर असे एक चुन्याचे घाणे दृष्टीस पडते.
किल्ल्यावरील दारूगोळ्याच्या कोठाराची इमारत प्रशस्त आहे. गडावरील ही इमारत अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.
गडावर एका ठिकाणी एका भव्य इमारतीचे जोते दिसून येते. जोते पाहून पूर्वी ही गडावरील महत्त्वाची इमारत असावी हे लक्षात येते.
गडावर एक ध्वजस्तंभ असून या ध्वजस्तंभावर स्वराज्याचा जरीपटका डौलाने फडकताना दिसतो.
केंजळगड किल्ला २५० यार्ड लांब व १०० यार्ड रुंद आहे.
केंजळगडावर किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवणारी टाकी सुद्धा दिसून येतात.
केंजळगड हा किल्ला चारही बाजूंनी तटबंदी करून भक्कम करण्यात आला आहे.
किल्ल्याच्या चौफेर पाचगणी, महाबळेश्वर, रायरेश्वर, धोम धरण, पांडवगड, कमळगड, मांढरदेवी इत्यादी स्थळे दृष्टीस पडतात.
किल्ल्याच्या तटबंदीस शत्रूचा वेध घेण्यासाठी तोफा अथवा बंदुका ठेवण्यासाठी छिद्रे कोरण्यात आली आहे.
किल्ल्यावर जाण्यास दोन रस्ते असून वाई मार्गे अस्त्रे खवली येथून तर उत्तरेकडून आंबेघर मार्गे गडावर जाता येते.
कातळात कोरलेल्या कोरीव पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असा केंजळगड प्रत्येकाने पाहायलाच हवा.