अफानासी निकितीन - भारतास भेट देणारा पहिला रशियन

अफनासी निकीतन याचा जन्म रशियातील त्वेर येथे झाला. मॉस्कोच्या वायव्येस सु. १६० किमी. असलेल्या कालीनीन या शहरी हा व्यापार करीत असे. व्यापारानिमित्त १५ व्या शतकात तो भारतात आला. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाश्याआधी पंचवीस वर्षे आलेला पहिला यूरोपियन प्रवासी म्हणून निकीतीन ओळखला जातो. १४६६ ते १४७२ या त्याच्या प्रवासातील काळात एकूण तीन वर्षे तो भारतात राहिला.

अफानासी निकितीन - भारतास भेट देणारा पहिला रशियन

मानवी स्वभावात जिज्ञासा व कुतूहल हे प्रमुख गुण असल्याने मनुष्य नेहमीच नाविन्याचा शोधात असतो. शोध घेण्याची ही परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे. व्यापार, धर्मप्रसार, राज्यप्रसार, ज्ञान मिळवण्याची इच्छा व इतर अनेक गोष्टींसाठी प्रवास केला जातो. पृथ्वी नेमकी आहे तरी कशी आणि या जगाच्या पाठीवर कुठले देश आहेत व तिथली माणसे कशी असावीत या कुतूहलापोटी अनेकांनी प्राचीन काळात प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नसतानाही जीवावरील जोखीम स्वीकारून जगाचा प्रवास केला.

आज प्रवासाच्या सर्व सोयी सुविधा असूनही माणूस इच्छा असली तरी जगभ्रमंती करत नाही मात्र त्याकाळी फक्त पाय, घोडे, उंट आणि होड्या यांचाच वापर करून मनुष्य जग पादाक्रांत करीत असे.

मार्को पॉलो, टॉलेमी, सारजा, कोलंबस, कॅप्टन कुक, हुएन त्संग, कॅप्टन रॉस, डॉ. लिव्हिंग्स्टन या व इतर असंख्य जागतिक प्रवाशांनी जगाच्या इतिहासात आपले नाव कोरले. मात्र रशिया या देशातून प्रथम भारतास भेट देणारी व्यक्ती होती अफनासी निकीतन. 

अफनासी निकीतन याचा जन्म रशियातील त्वेर येथे झाला. मॉस्कोच्या वायव्येस सु. १६० किमी. असलेल्या कालीनीन या शहरी हा व्यापार करीत असे. व्यापारानिमित्त १५ व्या शतकात तो भारतात आला. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाश्याआधी पंचवीस वर्षे आलेला पहिला यूरोपियन प्रवासी म्हणून निकीतीन ओळखला जातो. १४६६ ते १४७२ या त्याच्या प्रवासातील काळात एकूण तीन वर्षे तो भारतात राहिला.

निकीतीन रशियातील व्होल्गा नदीतून प्रवास करत बुझान येथे पोहोचला. तेथून निघून तो अस्त्रखान येथे पोहोचला. तेथे त्याला लुटण्यात आले. तेथून तो एका जहाजातून व्होल्गा नदीच्या मुखापाशी पोहोचला. तेथेही परत त्याचे जहाज लुटले गेले. पुढे कॅस्पियन समुद्रातून प्रवास करत तो डर्बेंट येथे पोहोचला. वाटेत त्याचे छोटे जहाज वादळात सापडून फुटले. पुढे जॉर्जिया, आर्मेनिया, इराण, मस्कत मार्गे प्रवास करत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दिव बंदरात उतरून खंबायतमार्गे  चौल येथे तो आला. 

चौलला त्याने ‘चीवील’ असे म्हटले आहे. तेथील लोकजीवनाचे उत्तम वर्णन त्याने केले आहे. येथील माणसे खूप कमी कपडे घालतात, पुरुष आणि स्त्रियांचा वर्ण काळा आहे, येथील लोकांना गोऱ्या माणसांबद्दल खूप कुतूहल वाटते, येथील श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून कापड घेतात आणि दुसरे एक कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात, असे वर्णन त्याने केलेले दिसून येते. चौलहून आठ दिवसांचा जमिनीवरील प्रवास करून निकितीन पाली येथे पोहोचला. पाली ते जुन्नर या प्रवासाला त्याला सोळा दिवस लागले व चौल ते जुन्नर हे अंतर एकशे तीस मैल असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.

जुन्नर येथे तो चार महिने होता. जुन्नरचे वर्णन करताना त्याने लिहिले आहे की, येथे सगळीकडे खूप पाणी आणि चिखल असून हे शहर एका खडकाळ बेटावर वसलेले आहे. येथील रस्ता खूप अरुंद असल्याने एकावेळी एकच माणूस येऊ शकतो. पुढे असेही म्हटले आहे की, येथे दारू ही एका मोठ्या मडक्यात बनवली जाते, येथील माणसे घोड्यांना वाटाणे खायला घालतात आणि आपल्या जेवणात साखर व लोणी घालून बनवलेली खिचडी व भाज्या खातात. 

एकदा असदखानाने त्याचा घोडा आपल्या ताब्यात घेतला व घोडा परत हवा असल्यास त्याला मुस्लीम धर्म स्वीकारण्याची अट घातली. यासाठी त्याला चार दिवसांची मुदत देण्यात आली होती, पण त्याचवेळी खुरासनचा महंमद नावाचा एक मोठा सरदार तेथे आला असताना निकितीनने आपले गाऱ्हाणे त्याच्यासमोर मांडले. तेव्हा महंमदाने असदखानाला त्याला सोडून देण्याची आज्ञा केली. हा घोडा भारतात येताना ऑरमुझ येथे शंभर रुबल किमतीला विकत घेतला होता, जो त्यांनी नंतर भारतात आल्यावर विकून टाकला. 

पुढे त्याने असे वर्णन केले आहे की, येथे मसाले सोडून इतर वस्तू खूप महाग मिळतात. येथे येणारा माल हा समुद्री मार्गाने येत असल्याने आमच्या सारख्या लोकांना तो खूप महाग मिळतो. येथून नंतर तो पुढे चाळीस दिवस प्रवास करून बिदर मार्गे गुलबर्गा येथे गेला. हे अंतर एकशे सत्तावन मैल असल्याचे तो म्हणतो. येथील सैनिक हे अनवाणी प्रवास करतात. काही लोक हातात ढाल आणि तलवार घेऊन तर काही लोक धनुष्यबाण घेऊन फिरतात. येथील सैन्यात पुढे पायदळ आणि मागून चिलखत घातलेले हत्ती असतात. त्यांच्या पाठीवर हौदा असून त्यात बारा माणसे बंदुका आणि भाले घेऊन बसतात असे त्याने त्याने म्हटले आहे.

तेथे काही दिवस वास्तव्य करून तो बिदरमार्गे गुलबर्गा येथे पोहोचला. तेथून तो आळंद मार्गे दाभोळ बंदरावर आला. येथून त्याने बोटीने परतीचा प्रवास सुरू केला. पुढे दोन महिन्याचा प्रवास करून तो इथिओपियात पोहोचला. तेथून निघाल्यावर तो मस्कत मार्गे इराणच्या किनाऱ्यावरील ऑरमुझ येथे उतरला. तेथून जमिनीवरून प्रवास करत लारमार्गे शीराझ येथे पोहोचला. तेथून पुढे तो याझ्ड, ताब्रीझ, तुर्कस्तान मधील सिवास मार्गे काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील ट्रेबझोन या शहरात पोहोचला. १४७२ मध्ये तो युक्रेनमधील कीवमार्गे आपल्या गावी म्हणजेच त्वेर येथे परतत असताना त्याचा मृत्यू झाला.

अफनासी निकितन याच्या भारत भेटीची आठवण म्हणून त्याच्या नावाचा स्मारकस्तंभ रायगड जिल्ह्यातील चौल रेवदंडा येथील सरदार रावबहाद्दूर तेंडुलकर शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आला आहे ज्यास भारत व रशिया या दोन देशांमधील अतूट मैत्रीचे प्रतीक मानले जाते. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या 'परदेसी' या चित्रपटात अफनासी निकीतन याच्या या सफारीची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात नर्गिस, पृथ्वीराज कपूर, बलराज साहानी यांच्यासह अफनासीच्या भूमिकेत रशियन अभिनेता ओलेग स्ट्रिझनोव्ह यांनी भूमिका केल्या होत्या.