काशिनाथ केळकर - एक अल्पपरिचित इतिहास अभ्यासक

धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९०० साली तात्यासाहेब म्हणजे श्री. न. चिं. केळकर यांच्या घरी झाला.

काशिनाथ केळकर - एक अल्पपरिचित इतिहास अभ्यासक
काशिनाथ केळकर

सन १९३७ !! फिलीप फॉक्स नामक ब्रिटीशाने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई महाराज साहेबांबद्दल अपमानकारक लेखन केलेलं होतं. ते लिखाण वाचून एका तरूणाचं मन बंड करून उठलं. या विषयावर अभ्यास करुन, त्यावर लेखन करुन, ‘सत्य काय’ ते जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी त्याने असंख्य ऐतिहासिक कागदपत्रं धुंडाळली. दुर्दैवाने त्या वेळच्या ब्रिटीश अंमलाखाली अनेक साधनं आधीच नष्ट झालेली होती. त्याच वर्षी त्याने झाशी, कानपूर, ग्वाल्हेर, ब्रह्मावर्तासारख्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. कागदपत्रं शोधून अभ्यासली, तपासली .१८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर कित्येक दशकांचा काळ उलटून गेलेला होता. १८५७ चे बंड व त्या काळचा इतिहास समजणं दुरापास्त झालेलं होतं. लॉर्ड जॉर्ज कॉनवेल या ब्रिटीशाने लिहिलं होतं - "१८५७ चा खरा इतिहास या पुढे कधी बाहेर येईल किंवा कोणाला समजेल ही आशा व्यर्थ आहे". अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर अभ्यास करुन झाशीच्या राणी साहेब आणि १८५८ विषयाबद्दलची जास्तीतजास्त योग्य ती माहिती ‘केसरी’मध्ये लेखमाला लिहून जनमानसापर्यंत पोचवायचं काम केलेलं अजोड अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९०० साली तात्यासाहेब म्हणजे श्री. न. चिं. केळकर यांच्या घरी झाला. काशिनाथ हे तात्यासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव. स्वभावाने थोडे अबोल, मितभाषी पण जुन्या काळात मनस्वी रमणारे काशिनाथ इतिहासाबद्दल रूची बाळगून होते. त्यांचा ‘१८५७’ व ‘नेपोलियन’ या दोन विषयांवरचा अभ्यास थक्क करून टाकणारा होता. बी.ए. व वकिलीसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम पार पाडतानाही त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला, त्यात संशोधन केलं, हे खरोखर विशेष!! ॲडव्होकेट होत असतानाच त्यांनी ‘ज्योतिर्भूषण' ही पदवीदेखील मिळवलेली होती ज्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

अतिशय पितृभक्त असलेल्या काशिनाथ केळकरांनी वडिलांचा लेखनवारसा पुढे चालवत ‘केसरी’ वृत्तपत्रामधून विपुल लिखाण केलं. त्यांनी केलेली वाङ्मय सेवा व साहित्य निर्मिती बहुत दखलपात्र आहे. “आपल्या वडिलांचे लेखणीशिवाय आपण दुसऱ्या कोणासही गुरू मानले नाही" असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, "वाळवंटातील पाऊले"मध्ये नमूद केलेलं आहे. जाज्वल्य पितृभक्तीचा झळाळता अभिमान त्यांनी आयुष्यभर बाळगल्याचे अशा वाक्यांतून सतत दिसत राहते. त्यांच्या जन्मपत्रिकेतला माणसाला प्रसिद्धी बहाल करणारा ग्रह मात्र अयोग्य घरात पडलेला होता. प्रसिद्धी मिळाली नाही तरीही या नादिष्ट लेखकानं केसरी पाठोपाठ ‘सह्याद्री’मध्येही पुष्कळ लेखन केलं.

स्वतःच्या लिखाणकामाखेरीज त्यांनी आपल्या वडिलांच्या हजारो पृष्ठांच्या अप्रकाशित साहित्याचे सहा ग्रंथ प्रकाशित केले. काशिनाथ केळकरांची ही कामगिरी अतिशय बहुमूल्य स्वरूपाची आहे. "केळकर निबंधमाला" या साक्षेपाने संपादित व प्रकाशित केलेला त्यांचा हा ग्रंथ ‘केळकर अभ्यासकांना’ न डावलता येण्याजोगा आहे. श्री. न. चिं. केळकर यांनी आपल्या सर्व प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे हक्क काशिनाथांकडे दिलेले होते. पूर्वपरवानगी शिवाय त्या साहित्याचा वापर करणाऱ्यांना ॲडव्होकेट काशिनाथांनी स्वतःच्या वकिली ज्ञानाची चुणूकही चांगलीच दाखवलेली होती.

घरी ते अनेकांच्या जन्म कुंडल्या तयार करून भविष्यकथन करीत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या अंताचं त्यांनी वर्तवलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं होतं. लेखन व इतर सर्व जबाबदाऱ्यांसोबत ते उत्तम चित्रही काढायचे. स्वतःच्या वडिलांचं व नेपोलियनचंही त्यांनी चित्र काढलं होतं. हे एक विशेषच म्हणावं लागेल. ऐतिहासिक लेखनामध्येही त्यांनी जुनी चित्रं शोधून आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करुन दिलेली आहेत. नानासाहेब पेशव्यांचं चित्र हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

बापूंच्या आत्मचरित्राखेरीज महत्त्वाच्या इतर वाचनीय पुस्तकांची यादी खाली देत आहे:-

  • रामायणावरील काही विचार (१९२८)
  • शेतीवाडीची आर्थिक परीक्षा (१९३५)
  • हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (१९३२)
  • नेपोलियन व हिटलर (१९४६)
  • नेपोलियन व्यक्तीदर्शन (१९४६)
  • शमीपूजन (१९४७)

‘दोन घटका मनोरंजन’ हा त्यांचा निवडक लेख संग्रहही खूप मनोरंजक आहे. ‘नेपोलियन’ व ‘१८५७’ या दोन विषयांवर बापू तासन्-तास बोलत. इतर कोणी नेपोलियनवर अभ्यास वा लिखाण केलं तर ते वाचून आवर्जून प्रतिक्रिया देत. थोर इतिहास अभ्यासक कै. म. श्री. दिक्षित यांच्या संग्रहामध्ये बापूंनी पाठवलेलं असंच एक ‘शाबासकी पत्र’ दिसून येतं.

श्री. न. चिं. केळकर यांचे अनेक गुण त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी, काशिनाथ व यशवंत यांनी, अंगी बाणवले. वडिलांनी बांधलेलं घर त्यांनी जिवापाड सांभाळलं. बापू वयाच्या ८२व्या वर्षी १० एप्रिल १९८२ रोजी देवाघरी गेले.

अतिशय विपुल काम, संशोधन आणि लेखन केलेले, वडिलांची किर्ती आपल्या कामांमधून वृद्धिंगत करणारे कै. काशिनाथ नरसिंह केळकर हे विस्मृतीत गेलेले इतिहास अभ्यासक आज आपणा सर्वांसमोर आणत आहे. माझ्या अल्पशा लेखनसेवेतून या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करतो.

- नंदन वांद्रे

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा