सिकंदराची भारत मोहीम व राजा पोरस

ख्रिस्तपूर्व ३२९ साली सिकंदर भारत जिंकण्याच्या उद्देशाने समरकंद येथून निघाला व हिंदुकुश पर्वत ओलांडून काफरीस्थान, चित्रळ आणि स्वात या प्रांतातील डोंगराळ प्रदेशातून अटक येथे पोहोचला.

सिकंदराची भारत मोहीम व राजा पोरस

आपल्या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण जग पादाक्रांत करणारा प्राचीन काळातील सम्राट म्हणून सिंकदर या ग्रीक राजाचे नाव प्रसिद्ध आहे. गादीवर बसल्यावर फक्त दोन वर्षांतच त्याने आशिया मैनर, सीरिया, ईजिप्त, इराण व तार्तर इत्यादी देश जिंकले मात्र भारत या देशात त्यास भारतीय राजांच्या पराक्रमाचा अनुभव आला तो त्याला हिंदुस्थानविषयी निर्माण झालेल्या आदरास कारणीभूत ठरला.

ख्रिस्तपूर्व ३२९ साली सिकंदर भारत जिंकण्याच्या उद्देशाने समरकंद येथून निघाला व हिंदुकुश पर्वत ओलांडून काफरीस्थान, चित्रळ आणि स्वात या प्रांतातील डोंगराळ प्रदेशातून अटक येथे पोहोचला. येथे त्याने सिंधुनदी ओलांडली आणि तिच्या पूर्वेस असलेल्या तक्षशिला या राज्यावर त्याने हल्ला केला. तक्षशिलेचा राजा सिकंदराची बलाढ्य सेना पाहून त्यास शरण गेला व सिकंदराने खंडणी घेऊन त्याचे राज्य त्यास परत केले.

झेलम या नदीच्या पूर्वेस त्याकाळी पोरस हा राजा राज्य करीत होता. सिकंदराने राज्याच्या अलीकडे तळ टाकल्यावर पोरस राजास निरोप पाठवला की 'खंडणी घेऊन मला भेटावयास ये' मात्र पोरसने सिकंदरास उलट निरोप दिला की 'मी माझी फौज घेऊनच तुझ्या भेटीस येतो तेव्हा लढाईस तयार रहा'

पौरस कडून हे उत्तर मिळाल्यावर संतप्त झालेला सिकंदर पोरस याच्या राज्यावर चालून गेला. झेलम नदीच्या तीरावर पौरस आपल्या बलाढ्य सेनेसहित तयार होताच. तो काळ पावसाळ्याचा असल्यामुळे झेलम नदी काठोकाठ भरून वाहत होती. झेलम नदी पार केल्याशिवाय सिकंदरास पोरस च्या राज्यात शिरकाव करणे अशक्य होते व नदीच्या उतारावरील जे भाग होते त्यावर पोरस राजाने मजबूत नाकेबंदी केली होती. सिकंदराने सर्व परिस्थिती पहिली व त्याने पोरसच्या सैन्यास चकवून त्याच्या प्रदेशात शिरकाव करण्याचा बेत रचला.

सिकंदराने मग आपले सैन्य वेगवेगळया तुकड्यांमध्ये विभागले आणि काही तुकड्या खाली तर काही वर ठेवून त्यांना फिरवीत ठेवले. हे करण्यामागे सिकंदराच्या काय डाव आहे हे पोरस राजास समजेनासे झाले. यानंतर सिकंदराने आणखी एक चाल खेळली व अशी हूल उठवली की जो पर्यंत झेलम नदीचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत सिकंदरची फौज नदीच्या काठावरच आपली छावणी देईल.

पोरसला ही बातमी समजल्यावर त्यानेसुद्धा झेलम नदीच्या अलीकडे आपले सर्व सैन्य घेऊन छावणी दिली. असेच काही दिवस आले व एका काळोख्या रात्री जेव्हा पावसाच्या ढगांमुळे पूर्णपणे अंधार पडला होता ती संधी साधून सिकंदराने त्याच्या छावणीपासून काही मैल अंतरावर आपले पाच हजार स्वार आणि सहा हजार पायदळ घेऊन गुप्तपणे झेलम नदी पार करून पोरसच्या राज्यात जाऊन धडकला.

पोरसच्या हेरांनी जेव्हा ही बातमी त्यास दिली त्यावेळी त्यास असे वाटले की सिकंदर हा थोडेसे सैन्य घेऊनच नदी पार आला आहे त्यामुळे त्याने आपल्या पुत्रास काही सैन्य देऊन सिकंदरावर पाठवले मात्र पोरसचा मुलगा आपल्या सैन्यासहित सिकंदराच्या सैन्याच्या समोर आल्यावर झालेल्या युद्धात सिकंदराने पोरसच्या पुत्रास ठार मारले व त्याच्या सैन्याचा सुद्धा पराभव केला.

पौरस राजास आपल्या पुत्राच्या मृत्यूची बातमी समजली व तो मोठ्या युद्धास तयार झाला व त्याने दोनशे हत्ती, तीनशे रथ, चार हजार स्वार व तीस हजार पायदळ असे सैन्य घेऊन सिकंदराच्या फौजेसमोर आला. पोरसने समोर हत्तीदल, हत्तीदलाच्या मागे रथ व पायदळ आणि दोन्ही बाजूना घोडदळ अशी रचना केली होती. सिकंदराकडे मोठे घोडदळ होते व ते घोडे युद्धासाठी तयार केले असल्याने ते हत्तीदळामध्ये शिरले व त्यामुळे हत्ती थोडे बिथरू लागले त्यामुळे पोरसने हत्तीदलाच्या पुढे आपले पायदळ उभे केले.

आणि घोडेस्वारांच्या दोन तुकड्या केल्या आणि एक तुकडी आपल्या सोबत घेतली आणि सिकंदराच्या डाव्या बाजूस असलेल्या घोडदळावर हल्ला केला आणि घोडेस्वारांच्या दुसऱ्या तुकडीस सिकंदराच्या सैन्याच्या उजव्या व मागील बाजूवर तुटून पडायला सांगितले. या युद्धनीतीने पोरसला सुरुवातीस युद्धात चांगले यश मिळाले मात्र कालांतराने सिकंदरची सर्व फौज एक झाली व पोरसच्या सर्व सैन्यास चारही बाजूने घेरले आणि गोंधळ उडवून दिला.

गोंधळ उडवतानाच सिकंदराच्या सैन्याने पोरसच्या हत्तीदलावर बाणांचा वर्षाव सुरु केला. सर्व हत्ती त्यामुळे बिथरले आणि मागे फिरले मात्र शत्रूने चारही बाजूने घेरले असल्याने व चारही बाजूनी बाणांचा वर्षाव होत असल्याने हत्ती मागच्या बाजूस पळून ते पोरसच्या सैन्यासच तुडवू लागले. हत्ती अंगावर आलेले पाहताच पोरसचे सैन्यही नाईलाजास्तव पळू लागले. अशाप्रकारे सिकंदराने आपल्या अक्कलहुशारीने पोरसच्या हत्तींनाच त्याच्याविरोधात वापरून घेतले होते.

या प्रचंड धामधुमीत स्वतः पोरसही जखमी झाला व सिकंदराच्या कैदेत सापडला. युद्धात शौर्य गाजवूनही शेवटी पौरसच्या नशिबी पराभवच आला. कैद करण्यात आलेल्या जखमी पोरसला सिकंदराच्या समोर जेव्हा आणले गेले तेव्हा पौरसचे रूप पाहून सिकंदर सुद्धा चकित झाला होता.

यानंतर सिकंदराने पोरसला विचारले की 'राजा आता तू पराभूत झाला आहेस, तेव्हा तुला कसे वागवू?'

हे ऐकून पोरसने बाणेदारपणे उत्तर दिले की, 'एका राजास शोभेल असेच वागव म्हणजे झाले'

आपल्या कैदेत असूनही शरणागती न पत्करता बाणेदार वर्तन करणाऱ्या भारतीय राजा पोरसला पाहून सिकंदर आनंदी झाला व त्याने पोरसला त्याचे सर्व राज्य परत दिले व एवढेच नव्हे तर सिकंदराने जिंकलेल्या मुलुखांपैकी काही भाग सुद्धा त्यास भेट केला.

पोरस राजाचा उल्लेख हा फक्त ग्रीक ऐतिहासिक साधनांतच उपलब्ध आहे मात्र त्यांनी पोरसचे जे वर्णन केले आहे ते पाहून जगज्जेता सिकंदरही पोरसच्या व्यक्तिमत्वाने व त्याच्या शूरत्वाने किती प्रभावित झाला याची प्रचिती येते.