छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर महाराजांचे ज्येष्ठ पुत्र या नात्याने संभाजी महाराज यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आली. अर्थात ज्येष्ठता व योग्यता या दोनही गोष्टी अंगी असूनही संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा प्रवास सोपा नव्हता.

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याची सूत्रे कोणाकडे द्यावयाची या संदर्भात कलह सुरु झाला व थेट दोन गट पडले यामध्ये एक गट संभाजी महाराज तर दुसरा राजाराम महाराज यांचे समर्थन करणारा होता . 

संभाजी महाराजांच्या रायगडावरील अनुपस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या गटाने राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा विचार केला. ३ एप्रिल १६८० साली अष्टप्रधान मंडळाने हा हेतू तडीस नेण्याचा विचार केला. संभाजी महाराज हे पन्हाळा येथे असल्याने त्यांना तिथेच नजरकैद करून राजाराम महाराजांचा मंचकारोहण समारोह करून घ्यावा असा विचार अष्टप्रधानांचा होता. या नुसार अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अण्णाजी दत्तो यांनी राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व  नंतर मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत पन्हाळ्यावर चाल करून गेले. 

संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर ही बातमी मिळाली व त्यांना अतिशय दुःख झाले मात्र आल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी आपले सावत्र मामा हंबीरराव मोहिते यांना एक पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास सांगितले. हंबीरराव हे राजाराम महाराजांचे सख्खे मामा असूनही त्यांनी काळाची गरज ओळखुन संभाजी महाराजांचा पक्ष धरला यातच त्यांची महानता समजते. 

यानंतर हंबीरराव यांनी इतर मंत्र्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्र्यांनी हट्टाने पन्हाळ्यावर हल्ला करण्याचा विचार कायम ठेवला. हा कट एवढ्या गुप्त रीतीने रचला गेला कि ब्रिटिशांनाही तेव्हा वाटले की हे मंत्री संभाजी महाराजांचा हुकूम घेण्यासाठी पन्हाळ्यास जात आहेत मात्र प्रत्यक्षात ते संभाजी महाराजांना कैद करण्यास जात होते. 

रायगडावरून जेव्हा मंत्री निघाले तेव्हा त्यांना अनेक अपशकुन झाले यावेळी त्यांनी पुढील घटनेचा अंदाज लावावयास हवा होता मात्र चुकीच्या हट्टाने घर केल्याने त्यांनी कसलाही विचार न करता पन्हाळ्यावर चाल करण्याचा आपला बेत कायम ठेवला. हंबीरराव यांनी बैठक बोलवून अण्णाजी व मोरोपंत याना पुढील कृत्य करण्यास प्रवृत्त केले मात्र या दोघांनी नकार दिल्याने नाराज होऊन हंबीरराव यांनी आपला जमाव आपल्या बाजूने वळवून घेतला. त्यामुळे अण्णाजी व मोरोपंत यांनी सैन्यासह त्यांच्यावर हल्ला केला मात्र या हल्ल्यात हंबीररावांनी अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ व प्रल्हादजी निराजी यांचा कराड येथे पराभव करून हात बांधून पन्हाळ्यास संभाजी महाराजांसमोर दाखल केले. यापूर्वी काही दिवस रायगडावरही कटातील काही लोकांना कैद करण्यात आले होते.

अशाप्रकारे कटाचे निर्दालन केल्यावर संभाजी महाराजांनी राजधानी रायगडाकडे प्रयाण करण्याचे ठरवले. पन्हाळ्यास त्यांनी २००० स्वार तयार ठेवले. सर्वाना दोन महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्यात आला. आपले सासरे पिलाजी शिर्के यांच्या सोबत पंधरा हजार मावळे देऊन किल्ल्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली. कवी कलशाने महाराजांना रायगडावर जाऊन राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला यानंतर महाराजांनी मालोजी घोरपडे यांना सरनोबतीची वस्त्रे देऊन त्यांना पन्हाळ्यास ठेवून रायगडाकडे रवाना झाले. 

कऱ्हाड वरून पुढे महाराजांनी प्रतापगड यथे आपली कुलदेवता तुळजा भवानीचे दर्शन घेतले व तेथूनच रायगडाचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी रायगडास जाण्यास मार्गक्रमण केले. १८ जूनला महाराजांनी राज्याचा योग्य बंदोबस्त करून राजधानी रायगड गाठली. अटकेत असलेल्या मंत्री मंडळींना मोठ्या उदारतेने संभाजी महाराजांनी माफ करून त्यांना पूर्वीच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या व आपले लाडके व लहान बंधू राजाराम महाराज व राजमाता सोयराबाई यांना सुद्धा अतिशय सन्मानाने वागवले. 

"साहेब सिहांसनाधीश होणार आणि प्रधान यांचे घरी चौक्या हे योग्य नाही" 

यावरून संभाजी महाराजांचे दृरदृष्टीपुरक धोरण कळून येते. प्रधानांवरील चौक्या उठवल्यावर त्यांना जबाबदाऱ्या दिल्यावर महाराजांनी आपले सरदार व सैन्य यांना योग्य त्या जबाबदाऱ्या देऊन राज्याचा बंदोबस्त केला व छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वराज्याच्या सिंहासनावर स्थानापन्न झाले. 

"रेशमी वस्त्रे धारण केलेला, अत्यंत तेजस्वी, केशरी गंध लावलेला, चंदनाची उटी व फुलांच्या माळा धारण केलेला, जरीपटका बांधलेला, चिलखत, ढाल, तलवार व धनुष्य ही आयुधे धारण केलेला. सोन्याचा कंबरपट्टा, शेला बांधलेला वर छत्र धरलेला व बाजूला चवऱ्या ढाळल्या जात असताना अधिकारानुसार आपापल्या स्थानावर बसलेल्या व हात जोडलेल्या मंत्री, सरदार व समस्त जनता यांजकडून स्तुती मिळवणारा हा स्वराज्याचा छावा सिंहासनाधीश झाला."