पेंढारी समूहाचा इतिहास

पेंढारी समूहाची पाळेमुळे मुघल काळापर्यंत मागे जात असली तरी १९ व्या शतकाच्या सुरुवातीस पेंढारी समूहाचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसू लागला होता असे इतिहासकारांचे मत आहे.

पेंढारी समूहाचा इतिहास
पेंढारी

इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी पेंढारी अथवा पिंडारी हा शब्द नवीन नाही मात्र इतर वेळी हा शब्द लेख, चित्रपट व मालिकांतून अनेकदा आपल्या कानावर येत असतो. पेंढारी म्हणजे काय व त्यांचा इतिहास काय होता हे थोडक्यात समजून घेण्याचा या लेखातून प्रयत्न करू. 

पेंढारी समूहाची पाळेमुळे मुघल काळापर्यंत मागे जात असली तरी १९ व्या शतकाच्या सुरुवातीस पेंढारी समूहाचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसू लागला होता असे इतिहासकारांचे मत आहे. मध्य भारत हे पेंढाऱ्यांचे आश्रयस्थान व येथे पेंढाऱ्यांना पिंडारी या नावाने ओळखले जात असे. पूर्वी एखाद्या राज्याकडून शत्रूंच्या राज्यावर ज्या मोहिमा काढण्यात येत त्यामध्ये मुख्य सैन्याच्या सोबत कहीवाले म्हणून पेंढारी जात असत व शत्रूच्या मुलुखात लूट व जाळपोळ करण्यासाठी पेंढाऱ्यांचा उपयोग होत असे.  

पेंढारी हा एक समूह असून त्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र येत असत मात्र त्यांच्यात पठाणांचा प्रामुख्याने भरणा असे व पेंढाऱ्यांचा प्रमुख हा बहुतांशी पठाणच असे. पठाणांचा मूळचा क्रूर स्वभाव व एका जागी स्वस्थ न बसण्याच्या सवयीमुळे पेंढारी समूहाच्या नियमांचे पालन केले जात होते.

१८०५ च्या दरम्यान परराज्यांवर काढण्यात येणाऱ्या मोहिमांची संख्या कमी झाल्यावर अनेक पेंढारी बेरोजगार झाले व त्यांनी स्वतःहूनच मोहिमा काढण्याची सुरुवात केली. मध्य भारतातील नर्मदा नदीच्या आसपासचा डोंगराळ व निर्जन प्रदेश हे पेंढाऱ्यांचे मुख्य स्थान. येथून ते दसरा झाल्यावर मोहिमेची सुरुवात करीत व एखाद्या प्रदेशावर हल्ला करण्यापूर्वी तेथील जनतेला कल्पना देत व जर रक्तपात व नुकसान नको असेल तर आपले धन निमूटपणे आमच्याकडे द्यावे अन्यथा संपूर्ण गाव जाळण्यात येईल असा इशाराही दिला जात असे.

इशारा देऊनही जर ग्रामस्थांनी ऐकले नाही तर गाव जाळण्याबरोबरच माणसांना क्रूर शिक्षा देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत त्यामुळे पेंढाऱ्यांच्या हल्ल्याची बातमी आली की संपूर्ण प्रदेश दहशतीखाली येत असे.

इसवी सन १८०७ ते १८१२ या दरम्यान पेंढाऱ्यांनी मध्य भारत हे केंद्र पकडून चारही बाजूना चौफेर लूट केली मात्र कालांतराने त्यांचा उपद्रव ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशातही होऊ लागल्याने व ब्रिटिशांना प्रत्यक्ष रित्या त्यांचा फटका बसायला लागल्याने तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग्स याने पेंढाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली. याच काळात दुसरे बाजीराव पेशवे व इतर काही संस्थानिक पेंढाऱ्यांना आश्रय देत असल्याने ब्रिटिशांना समजले होते व कालांतराने भारतातील अनेक संस्थाने खालसा झाल्यानंतर पेंढाऱ्यांना कुणीही आश्रयदाता उरला नाही आणि ब्रिटिशांनी आपली आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त अशी सैन्ये पेंढाऱ्यांवर पाठवून त्यांचा चारही दिशांनी कोंडमारा केला.

इंग्रजांच्या माऱ्यापुढे पेंढाऱ्यांची मात्र चालू शकली नाही व या लढ्यामध्ये त्यांचे काही नाईक मारले गेले तर काही शरण आले. शरण आलेल्या नाईकांना ब्रिटिशांनी काही जमिनी इनाम म्हणून दिल्या मात्र त्यांच्या हाताखालील पेंढाऱ्यांची मात्र वाताहत झाली व त्यांना पेंढरीपण सोडून अन्य व्यवसायाकडे वाळण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.