इष्टुर फांकडा - इतिहासात गाजलेलं नाव

खरं तर त्याच मूळ नाव होत कॅप्टन स्टुअर्ट पण मराठ्यांनी त्याचे नामकरण केले इष्टुर फांकडा.

इष्टुर फांकडा - इतिहासात गाजलेलं नाव
इष्टुर फांकडा

इतिहासातील काही व्यक्तिरेखा या आपल्या पराक्रमाने प्रसिद्ध आहेत तरी काही आपल्या कर्तुत्वाने. मात्र काही व्यक्तिरेखा या आपल्या नावामुळे प्रसिद्ध आहेत. तशी त्यांची नावे तुमच्या आमच्यासारखीच,  मात्र स्थानिक अपभ्रंशामुळे त्यांची नावे थोडी चमत्कारिक होऊन गेली. असेच एक चमत्कारिक नाव म्हणजे इष्टुर फांकडा. उत्तर मराठेशाहीत हे विशेष प्रसिद्ध नाव होते. 

खरं तर त्याच मूळ नाव होत कॅप्टन स्टुअर्ट पण मराठ्यांनी त्याचे नामकरण केले इष्टुर फांकडा. इष्टुर म्हणजे स्टुअर्ट आणि फांकडा म्हणजे योद्धा. पहिले बाजीराव यांचे धाकटे चिरंजीव रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांनी पेशवे दरबाराविरोधात बंड उभारले व इंग्रजांच्या आश्रयास गेले त्यावेळी इंग्रजांनी रघुनाथरावांच्या मदतीस कॅप्टन स्टुअर्टची नेमणूक केली.

१७८८ साली बोरघाटात हा राघोबादादांच्या मदतीस उतरला. स्टुअर्टला परिसरातील घाटरस्ते व चौक्या यांची इत्यंभूत माहिती असायची. नाकेबंदीच्या वेळी पेशव्यांचे सैन्य हे घाटावरील तळेगाव  पासून बोरघाटापर्यंत सर्व मोक्याच्या जागांवर नाकेबंदी करून होते मात्र यातूनही मार्ग काढून स्टुअर्टने खंडाळ्याच्या एका उंच टेकडीवर आपले निशाण लावले आणि युद्धास सुरुवात झाली.

समोरून तोफांचा भडीमार होत असूनही स्टुअर्टने खंडाळा ते कार्ला अशी मजल मारली त्यामुळे पेशव्यांच्या सैन्यात चिंता माजली. इंग्रजांचा तोफखाना मोठा असल्याने जर काही अघटित घडले आणि इंग्रजांनी पुणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर वाड्यास व शहरास आग लावून द्यावी इतपत विचार सर्व करू लागले. पेशव्यांनी मग पुण्याहून पानसे यांना तोफखान्यासहित रवाना केले. पेशव्यांच्या मदतीस महादजी शिंदे व हरिपंत फडके सुद्धा खासे हजर होते. 

पानसे आल्यावर महादजी व हरिपंत यांनी त्यांना बोलावून घेतले व म्हणाले आजची लढाई मोठी शर्तीची व्हायला हवी जेणेकरून इंग्रजांचा मोड होऊन जाईल. तोफा अशा ठिकाणी लावा जेथून थेट इंग्रजांचे प्रमुख सेनापती मारले जातील. पानसे चर्चा करून तोफखान्यापाशी गेले आणि गोलंदाजांना म्हणाले..

आज बक्षीस मिळवायची वेळ आहे, कामगिरी बजावून बक्षीस घ्यावे 

यावेळी सुदैवाने मराठ्यांना वादळाची साथ मिळाली कारण वादळी वारा मराठ्यांच्या मागून पुढे जात होता तर इंग्रजांच्या थेट तोंडावर येत होता त्यामुळे मोठी धूळ उठून ती इंग्रजांच्या सैन्याच्या समोर येत होती. याच वातावरणात लढाई झाली. दोन्ही बाजुंनी तोफांचा मारा सुरु झाला. वाऱ्याने तर आकांडतांडव केले होते त्यामध्ये लढाईच्या धामधुमीमुळे सर्वच धुळीच्या लोटात दिसेनासे होऊन गेले. 

हे पाहून स्टुअर्ट थोडा बिथरला, धुळीमुळे त्यास पेशवे यांची फौज नक्की किती आहे याचा अंदाज येत नव्हता त्यामुळे त्याने एका झाडावर जाऊन दुर्बिणीतून फौजेचा अंदाज घेण्याचा विचार केला व झाडावर चढला इतक्यात हरिपंत तात्यांनी ते पहिले आणि तोफेच्या गोलंदाजाला आज्ञा केली 

समय हाच आहे आता शिस्तबी करून निशाण लावून तोफ डागावी. 

गोलंदाजाने त्वरित नेम लावून तोफ डागली आणि गोळा थेट झाडावर बसलेल्या इष्टुर फाकड्यास लागला आणि तो जागीच ठार झाला. इष्टुर फाकडा गेल्याने इंग्रज फौज बिथरली व पळापळ झाली, पेशव्यांची फौज त्यांच्या मागे लागली तेव्हा इंग्रजांची फौज घाट उतरून पनवेलकडे गेली.

तोफेचा गोळा लागून स्टुअर्टचा मृत्यू झाला पण मराठा सैन्याने इष्टुर फांकडा शाब्बास असे म्हणून त्यास श्रद्धांजली वाहिली. त्याच काळातील एका पत्रात पुढील उद्गार आहेत. 

मुख्यत्वे श्रीमंतांचे पुण्य विचित्र! अवतारी पुरुष. त्यासारखे योग घडले. ज्या माष्टीनाने मसलत केली तो घाटावर येताच समाधान नाही म्हणून मुंबईस गेला तेव्हा मृत्यू पावला. इष्टुर फांकडं लढाव इकडील फौजेचा कार्ल्याच्या ठिकाणी गोळा लागून ठार झाला.

ब्रिटिशांनी स्टुअर्टच्या मृत्यूनंतर पुढील उद्गार काढले.

On the same day, they met with a very heavy loss by the death of captain stewart. who was a most active, gallant, and judicious officer and possessed of the true military spirit.

आजही वडगाव मावळ येथे इष्टुर फाकड्याची समाधी पाहावयास मिळते व ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणीही एक छोटी समाधी आहे.