रायगडाची विविध नावे

गड-किल्ले तसेच अनेक इतिहास ग्रंथामध्ये रायगडाच्या नावांची एक यादी आढळून येते. रायगडाची ही अनेक नावे केव्हा व कशी पडली हा प्रश्न मला पडला. ह्या नावांमागील तथ्य शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.

रायगडाची विविध नावे

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

ग.ह.खरे संपादित दुर्ग (१९८०) ह्या पुस्तकात भरताग्रज मळेकरांनी त्यांच्या लेखात ही यादी बहुधा सर्वप्रथम छापली गेली. (पान ७३-७४) ती यादी पुढिल प्रमाणे -

१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टर

"किले रायगड हा किला पेशजी डोंगर होता त्याचे नाव तणस कोणी म्हणत व कोण्ही रासीवटा म्हणत नंतर माहराजा याणी पाहून डोगर माटा जबुदीप दिसतो म्हणोन न कोणी नंदादीप ऐसे म्हणतात"

रायरीच्या डोंगराची अनेक नावे होती, असे ह्या चित्रे घराण्यातील एका उत्तरकालीन कागदातील नोंदीवरुन कळते. तणस , रासीवटा , नंदादीप ही ह्या डोंगराची नावे. रायगडाच्या नावांच्या यादीतील जंबुद्वीप हे नाव ह्या नोंदीत आले आहे, तरी हे ह्या डोंगराचे किंवा गडाचे नाव नसून गडाला जंबुद्वीपाची उपमा दिलेली आहे.

तणस हे रायगडाच्या डोंगराचे नाव 'रायगड किल्ल्याची हकीकत' ह्या धुळे येथील हस्तलिखितातही आले आहे, तसेच जबुद्विपाची उपमा महाराजांनी दिली असेही ह्याच कागदात आले आहे.

रायरी हे गडाचे शिवपुर्वकालीन नाव. हे नाव १६१८ ते १६५६ पर्यंतच्या अनेक कागदपत्रांमधून आढळते. राईर, रायेर, राहीर, राहेर अश्या स्वरुपात रायरी हे नाव कागदांमध्ये आढळते... अर्थातच रायरी हेच मूळ नाव असून बाकी इतर नावे ही त्याच नावाचे अपभ्रंश आहे आहेत.

१६५६ च्या एप्रिल नंतर केव्हातरी रायरी महाराजांनी जिंकला व पुढे त्याचे नामकरण रायगड करण्यात आले.

रायगिरी हे रायगड ह्या नावाचे संस्कृत रुप गडावरील जगदिश्वराच्या शिलालेखात आले आहे.

राजगिरी या संस्कृत नावाचा अपभ्रंश रायगड असा झाला आहे, असे वि.वा.जोशी त्यांच्या 'राजधानी रायगड' ह्या ग्रंथात म्हणतात. ह्यासाठी ते संदर्भ असा काहीच देत नाहीत.

पण राजगिरी हे संस्कृत रुपांतरीत नाव राजगडाचे आहे, रायगडाचे नव्हे. शिवभारच्या २६ व २७ व्या अध्यायात अनेकदा राजगडाचे नाव राजगिरी असे आले आहे.

१६८९ ला गड औरंगजेबाचा ताब्यात गेला. औरंगजेबाने गडाचे इस्लामगड नामकरण असे केले. १६९५ ला औरंगजेबाच्या अधिकाऱ्याने या नावाचा शिलालेखही तयार करुन घेतला. औरंगजेबाच्या मृत्यू नंतर गडाचा ताबा जंजिरेकर सिद्दी कडे सांभाळण्यासाठी देण्यात आला. १७३३ पर्यंत गड सिद्दीच्या ताब्यात होता. त्यांच्या कागदपत्रात 'किले इस्लामगड उर्फ रायगड' हेच नाव आढळते. सारांश, १६८९ ते १७३३ अशी ४४ वर्षे रायगड 'इस्लामगड' ह्या नावाने ओळखला जात असे.

भिवगड हा एकदाच आलेला उल्लेख विश्वसनीय नाही. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ (पान. ३३४) च्या एका पत्रात हा फेब्रुवारी १६६८ चा उल्लेख आहे. त्या पत्रतील पहिल्या ओळीतील काही शब्द असे - " मलई केळनई तरफ भिवगड उर्फ रायगड ?"

येथे संपादकांनी रायगड ह्या शब्दापुढे प्रश्नचिन्ह दिले आहे. आणि रायगडाच्या इतिहासात कुठेही हे नाव सापडत नाही. तेव्हा भिवगड ह्या नावाचा आणि रायगडाचा काहीही संबंध नाही , असा निष्कर्ष निघतो.

रेड्डी हे वेगळे नाव नसून रायरी ह्या नावाचा चुकीचा उच्चार किंवा अपभ्रंश म्हणता येईल. इंग्रज किंवा पोर्तुगीज ह्यांच्या ग्रंथात व कागदपत्रांमध्ये रायरी हे नाव Rayry, Rairee, Raighur असे वेगवेगळ्या प्रकारात लिहीलेले आढळून येते. ह्या शब्दांचा उच्चार रेरी, रेडी असा सहज होऊ शकतो.

ह्याला जोडूनच आणखी एक उल्लेख करतो - दक्षिण कोकणच्या किनाऱ्यावर रेडी हे बंदर आहे. ह्या बंदराचे नाव युरोपियन नकाशांवर व कागदपत्रांमधे Raree , Rari , Rary, Rery अश्या प्रकारे आढळते. ह्या रेडी बंदराच्या नावाचा उच्चारही सहज रायरी असा केला जाऊ शकतो. थोडक्यात काय तर रेड्डी हा रायरी ह्या नावच्या चुकीच्या उच्चारामुळे तयार झालेला शब्द आहे.

शिवलंका हे नाव रायगडास होते, असा उल्लेख ऐतिहासिक साधनामधून आढळून येत नाही. शिवलंका म्हणून सिंधुदुर्गचा उल्लेख चित्रगुप्त बखरीत आढळतो, तो असा - "चौऱ्यायशी बंदरात हा जंजिरा मोठा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक जागा निर्माण केला." (पान.१३४)

पूर्वेकडील जिब्राल्टर - जेम्स डग्लस त्याच्या १८८३ साली प्रकाशित झालेल्या बुक ऑफ बॉम्बे ह्या पुस्तकात महमतो की, "(रायगडाला) पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात." [ It (Raighur) has been called the Gibraltar of the East ] (Page.405)

युरोपियन लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे फक्त रायगडलाच म्हणत असे नाही. ग्वाल्हेरचा किल्ला, वियजदुर्ग तसेच सिंगापूरलाही पूर्वेकडील जिब्राल्टर ची उपमा दिली गेली आहे.

बदेनूर ह्या नावाबद्दल काहीच माहिती मला उपलब्ध झाली नाही.

सारांश ,

तणस, रासीवटा, नंदादिप ही रायगडाच्या डोंगरांचे जूने नाव.

रायरी, रायगड, इस्लामगड ही गडाची official नावे.

बाकी इतर काही अपभ्रंश आहेत, तर काही नावे चुकीने रायगडाला जोडली गेली आहेत.

- © दिपक पटेकर