अली बहादूर - थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचे नातू

बुंदेल खंडात मोठा पराक्रम गाजवून पाऊण कोटींचा मुलुख प्राप्त करण्याचे श्रेय अली बहादूर यांस जाते.

अली बहादूर - थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचे नातू
अली बहादूर

बाजीराव बल्लाळ उर्फ थोरले बाजीराव पेशवे यांना मस्तानी पासून जो पुत्र प्राप्त झाला ते म्हणजे समशेर बहादूर.

समशेर बहादूर यांच्यापासून जो वंश वाढला तो बांदा नवाबांचा वंश म्हणून ओळखला गेला व या वंशातील एक कर्तबगार नवाब म्हणजे बाजीरावांचे नातू व समशेर बहादुर यांचे पुत्र अली बहादूर.

अली बहाद्दूर हे समशेर बहाद्दूर व मेहेरबाई यांचा पुत्र असून त्यांचा जन्म १७६० साली झाला.

पानिपतच्या युद्धात समशेर बहादूर धारातीर्थी पडल्याने अली बहादूर यांस वर्षाचे होण्यापूर्वीच पोरकेपण आले असले तरी पेशव्यांनी बांदा घराण्यास कधी अंतर पडू न दिल्याने त्यांच्या खर्चाची व शिक्षणाची उत्तम सोय करण्यात आली.

यमाजीपंत हे अली बहादूर यांचे शिक्षक असून त्यांच्याकडून अली बहादुर यांस चांगले शिक्षण प्राप्त झाले.

वयात आल्यावर अली बहादूर सैन्यात भरती झाले आणि नाना फडणवीस यांनी त्यांना बुंदेलखंडात मुलुखाची व्यवस्था पाहण्यासाठी व महादजी शिंदे यांची साथसोबत करण्यासाठी पाठवले.

सुरुवातीस महादजी आणि अली बहादूर यांच्यात चांगला सलोखा होता मात्र हिंमत बहादूर प्रकरणामुळे दोघांत वैतुष्ट्य आले.

पुढील काळात तर अली बहादूर हे थेट पेशव्यांना सुद्धा न जुमानते झाले व स्वतंत्र पणे वागू लागले असे उल्लेख आढळतात.

बुंदेल खंडात मोठा पराक्रम गाजवून पाऊण कोटींचा मुलुख प्राप्त करण्याचे श्रेय अली बहादूर यांस जाते.

दिल्लीच्या बादशहाचा गुलाम कादर याच्याकडून छळ सुरू होता त्यावेळी बादशहाच्या मदतीस राणे खान गेला असता त्याच्या सोबत अली बहादूर सुद्धा होते.

बुंदेलखंड जिंकल्यावर त्याने छत्रपती व पेशव्यांची आज्ञा घेऊन सागरच्या ईशान्य दिशेस असलेल्या बांदा येथे आपले संस्थान निर्माण करून पुण्याहून लोक आणून अठरा कारखान्यांची स्थापना केली आणि लोकवस्ती वाढवली.

गोरे नामक मराठी माणूस त्यांनी संस्थानाच्या दिवाण पदी नेमला होता.

अली बहादूर यांचे दुसरे नावं कृष्ण सिंह असे असून ते मोठे कृष्ण भक्त होते. त्यांची मुद्रा पुढील प्रमाणे होती 

श्री माधव चरणी तत्पर, अली बहादूर निरंतर

अली बहादूर यांना एकूण तीन बायका असून समशेर बहादुर (द्वितीय) आणि झुल्फिकार अली असे दोन पुत्र आणि काही कन्या होत्या.

१८०२ साली कलिंजर येथील किल्ला घेत असताना अली बहादूर यांचा मृत्यू झाला.

बांदा संस्थानचे संस्थापक म्हणून अली बहादूर यांची ख्याती आजही आहे.