भारतावर झालेले पहिले मुस्लिम आक्रमण

इसवी सनाच्या सातव्या शतकात मुस्लिमधर्मीय राजाकडून भारतावर झालेले पहिले यशस्वी आक्रमण म्हणून मुहम्मद बिन कासिम याच्या आक्रमणाकडे पाहिले जाते. त्याकाळी सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांत भारत देशाचा भाग होता व त्या भागावर दाहीर नावाचा एक हिंदू राजा राज्य करीत होता.

भारतावर झालेले पहिले मुस्लिम आक्रमण

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारत देशावर आक्रमण करून लूट अथवा राज्य करणाऱ्या परकीय आक्रमकांची उदाहरणे फार जुनी आहेत. इसवी सनाच्या मागील शतकापासून ग्रीक, कुशाण, हूण, शक अशा अनेक आक्रमकांनी भारतावर हल्ला करून तेथे काही काळ राज्य केले. यातील काही राज्ये कालांतराने एतद्देशियांकडून पराभूत झाली तर काही इथलेच नागरिक झाले.

इसवी सनाच्या सातव्या शतकात मुस्लिमधर्मीय राजाकडून भारतावर झालेले पहिले यशस्वी आक्रमण म्हणून मुहम्मद बिन कासिम याच्या आक्रमणाकडे पाहिले जाते. त्याकाळी सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांत भारत देशाचा भाग होता व त्या भागावर दाहीर नावाचा एक हिंदू राजा राज्य करीत होता.

मुहम्मद बिन कासिम हा मूळचा अरब असून तेथील खलिफाचा सेनापती होता. अरब राष्ट्रांत इस्लामचा उदय झाल्यावर भारतावर ज्या स्वाऱ्या काढण्यात आल्या त्यापैकी पहिली स्वारी मुहम्मद बिन कासिम याची होती असे मानले जाते मात्र यापूर्वीही अरब आक्रमकांनी भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना त्यामध्ये फारसे यश मिळाले नव्हते. यापूर्वी अरबस्थानचा मुख्य खलिफाचा ओमान येथील राज्यपाल उस्मान याने सिंधच्या राज्यावर थेट स्वारी केली होती मात्र सिंधचा तत्कालीन राजा चाचा याने अरबांचा पराभव करून अरबांचा सेनापती अब्दुल अजीज यालाच ठार मारले होते. यानंतर अरबांनी काही काळ भारतावरील आक्रमणाचा बेत रद्द केला होता.

यानंतर इसवी सन ७११ साली मुहम्मद बिन कासिम याने सिंधवर केलेला हल्ला अधिक शक्तिशाली होता. अरबांनी पहिल्याच प्रयत्नात सिंधचे प्रवेशद्वार म्हणून प्रख्यात असलेले देवल (देबल) हे शहर जिंकून घेतले. देवल शहर आक्रमकांच्या हाती पडल्याचे दाहीर राजास समजताच तो आपले सर्व सैन्य सज्ज करून अरबांच्या विरोधात लढण्यास तयार झाला. एका बाजूने मुहम्मद बिन कासिम सुद्धा देवल प्रांताच्या आसपासचा मुलुख ताब्यात घेत पुढे निघाला.

राजा दाहीर व मुहम्मद बिन कासीम यांच्या सैन्याची गाठ ब्राह्मणाबाद या ठिकाणी पडली आणि दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले. त्याकाळात तोफांचा शोध लागला नसला तरी दुरून मारा करणारी जी अस्त्रे अरबांकडे होती ती राजा दाहीरच्या सैन्याकडे नव्हती. यामुळे दाहीरच्या सैन्याचे बळ कमी पडू लागले. असे म्हणतात की राजा दाहीरच्या सैन्यात काही भाडोत्री अरब होते व या युद्धाच्या वेळी त्यांनी अचानक बंड करून मुहम्मद बिन कासिमचा पक्ष स्वीकारला. 

दाहीरच्या सैन्यामध्ये हे अरब सैन्य मिसळले असल्याने अचानक या सैन्याने बंड करून दाहीरच्या सैन्यावरच हल्ला करावयास सुरुवात केल्याने दाहीरने आपल्या सैन्याची जी व्यवस्था केली होती ती साफ ढासळली.

समोर आलेला प्रसंग पाहून राजा दाहीर हत्तीवर आरूढ होऊन रणांगणात घुसला आणि अरब सैन्यावर हल्ला करू लागला मात्र अरबांकडे दुरून मारा करणारी शस्त्रे असल्याने अशाच एका शस्त्राने थेट हत्तीवरील दाहीरचा वेध घेतला व दाहीर राजा धारातीर्थी कोसळला.

दाहीर राजा युद्धात मारला गेल्यानंतर अर्थातच अरबांना विजय प्राप्त झाला व दाहीरच्या सैन्याने शरणागती पत्करली. बघता बघता ही बातमी राजधानीत पोहोचली आणि अरबांच्या हाती लागण्यापेक्षा मृत्यू पत्करणे श्रेयस्कर हा विचार करून दाहीरच्या राणीने आणि राज्यातील अनेक स्त्रियांनी सामूहिक जोहार केला. मात्र दुर्दैवाने दाहीर राजाच्या सूर्यदेवी आणि परिमलादेवी या दोन कन्या अरबांच्या हाती लागल्या याशिवाय आणखी अनेक स्त्रिया अरबांच्या हाती लागून त्यांना कैद करण्यात आले व दासी म्हणून त्यांना पुढील आयुष्य कंठावे लागले. 

पराभूत सैन्याचीही अरबांकडून बेसुमार कत्तल करण्यात आली. या युद्धानंतर दाहीरच्या राज्यात लूट, जाळपोळ, हत्यांचे सत्र अनेक दिवस सुरु होते. अरब मुस्लिमांचे भारतावरील पहिले आक्रमण म्हणून सिंधचे युद्ध प्रख्यात आहे. दुर्दैवाने या घटनेपासून एतद्देशीय राजांनी फारसा बोध न घेतल्याने पुढे अशा आक्रमकांची परंपराच आपल्याला पाहावयास मिळाली.