बहामनी राज्याचा इतिहास व माहिती

जफरखान उर्फ हसन याने या बंडाच्या अखत्यारीत तुघलखी राज्यातील एक भाग ताब्यात घेतला आणि स्वतःस स्वतंत्र घोषित केले आणि हसन गंगू बहामनी असा किताब धारण केला.

बहामनी राज्याचा इतिहास व माहिती
बहामनी राज्याचा इतिहास व माहिती

इसवी सन १३४७ ते १५२६ अशी तब्बल १७९ वर्षे दक्षिणेतील महाराष्ट्र आणि इतर राज्यांत अमल असलेली एक सत्ता म्हणजे बहामनी राज्य. इतिहासात ज्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही या सत्तांचा उल्लेख येतो त्या सर्व सत्ता बहामनी राज्यापासूनच तयार झाल्या होत्या त्यामुळे बहामनी राज्याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.

अल्लाउद्दीन खिलजी या खिलजी वंशाच्या शासकाने उत्तर व दक्षिण भारतात आपले आसन स्थिर केल्यावर पुढील काळात त्या राज्यात अनेक तंटे होऊन राज्याची शकले उडाली आणि त्यातून तुघलख, लोदी, सय्यद, तैमूरलंग आदींनी विविध प्रांत ताब्यात घेतले व यापैकी तुघलख वंशाचा अमल हा दक्षिण भारतात सुद्धा काही ठिकाणी होता.

तुघलख वंशाची राजधानी ही दिल्ली येथे असून त्याच्या पदरी एक ब्राह्मण ज्योतिषी होता व त्याचे नाव गंगू असे होते. गंगू हा मुहम्मद तुघलकाच्या अत्यंत मर्जीतील होता. या गंगूकडे हसन नावाचा एक उमदा तरुण काम करीत असे. त्याची हुशारी पाहून गंगूने त्याची शिफारस महम्मद तुघलखाकडे केली आणि हसनला दरबारात नोकरी मिळाली. फार कमी काळात हसनने आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवल्यामुळे तुघलखाने त्यास जफरखान हा किताब दिला. 

एक वेळ अशी आली की महम्मद तुघलकाच्या मनात राजधानीच बदलण्याची इच्छा झाली आणि त्याने महाराष्ट्रातील देवगिरी उर्फ दौलताबाद ही राजधानी करण्याचे निश्चित केले आणि तो दिल्ली सोडून दौलताबाद येथे राजधानीतील तमाम लोकांसह येऊन पोहोचला. यावेळी सोबत हसन उर्फ जफरखान सुद्धा होता. 

महम्मद तुघलख हा एक विक्षिप्त सुलतान असल्याने त्याचे अनेक निर्णय हे अनेकांना पटत नसत आणि राजधानी अचानक बदलण्याचा निर्णयही अनेकांना पटला नव्हता मात्र काळ जसा पुढे जाऊ लागला तसतसा तुघलखाचा विक्षिप्तपणा वाढत चालला आणि शेवटी सहनशीलतेचा अंत होऊन त्याच्या सैन्याने मोठे बंड केले आणि या बंडाचे पुढारीपण हसन याच्याकडे होते.

जफरखान उर्फ हसन याने या बंडाच्या अखत्यारीत तुघलखी राज्यातील एक भाग ताब्यात घेतला आणि स्वतःस स्वतंत्र घोषित केले आणि हसन गंगू बहामनी असा किताब धारण केला. या किताबातील गंगू हे नाव त्याचा मालक गंगू यावरून घेतले होते कारण गंगूच्या उपकारामुळेच आपण या स्थानावर येऊन पोहोचलो अशी त्यास जाणीव होती.

हसन गंगू बहामनी याने कर्नाटक राज्यातील सध्याचे कलबुर्गी आणि तेव्हाचे गुलबर्गा हे स्थळ आपल्या राजधानीचे ठिकाण केले आणि येथून त्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी भागांत आपले राज्य विस्तारले.

बहामनी राज्याची गुलबर्गा ही राजधानी असली तरी त्याकाळी बेदर उर्फ बिदर या स्थळासही खूप महत्व असल्याने बहामनी राजवटीस बेदरचे राज्य म्हणूनही ओळखले जात असे. बहामनी राज्यकाळात महंमद गवान नावाचा एक हुशार मुख्य प्रधान अर्थात पेशवा होता आणि त्याने बहामनी राज्याच्या उत्कर्षात मोठा हातभार लावला.

अशाप्रकारे १७९ वर्षे बहामनी राज्य दक्षिण भारतात शासन करीत होते मात्र इसवी सन १५२६ च्या सुमारास बहामनी राज्यातील वेगवेगळ्या प्रांतातील सुभेदारांनी मोठे बंड उभारून स्वतःस स्वतंत्र घोषित केले आणि बहामनी राज्याची पाच शकले उडाली व ही शकले म्हणजेच अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि बेदरची बरीदशाही.  या पाच शाह्यांपैकी इमादशाही आणि बरीदशाही यांचे लवकरच विघटन होऊन त्या निजामशाही, अदिलशाही आणि कुतुबशाही या तीन शाह्यांमध्ये विभागल्या गेल्या.