बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे

बापूजी मुद्गल यांचे शिवचरित्रातील महत्त्वाचे काम म्हणजे कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्ला स्वराज्यात आणण्याच्या कामी त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती.

बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे
बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना जसे अनेक शत्रू आड आले त्याचप्रमाणे स्वराज्य कार्यात मोलाचा वाटा देणारे व वेळप्रसंगी प्राण अर्पण करणारे सहकारी देखील लाभले.

स्वराज्याचा श्रीगणेशा केल्यावर अगदी सुरुवातीस शिवरायांना जे सहकारी लाभले त्यापैकी एक म्हणजे बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे.

बापूजी मुद्गल यांचे स्वराज्य कार्यात मोलाचे योगदान असूनही त्यांची दखल आधुनिक काळातील इतिहासात फारशी घेतली गेली नाही.

बापूजी मुद्गल हे खेडेबारे मावळचे देशपांडे असून ज्यावेळी शिवराय हे जिजाबाईंसहित बंगरुळ हून पुणे प्रांताची देखभाल करण्याच्या उद्देशाने आले असता त्यांचा मुक्काम प्रथम खेडेबारे येथेच झाला होता.

खेडेबारे येथे महाराजांना व जिजामातांना राहण्यासाठी मोठ्या वाड्याचे बांधकाम सुरू होते त्यावेळी काही दिवस शिवरायांचा मुक्काम बापूजी मुद्गल यांच्या वाड्यात होता.

पुढे ज्या स्थळी शिवरायांचे वास्तव्य झाले तो भाग खेड शिवापूर या नावे प्रसिद्ध झाला.

बापूजी मुद्गल यांचे शिवचरित्रातील महत्त्वाचे काम म्हणजे कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्ला स्वराज्यात आणण्याच्या कामी त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती व ही कामगिरी शक्तीच्या नव्हे तर युक्तीच्या जोरावर त्यांनी पार पाडली होती.

शिवरायांनी सर्वप्रथम तोरणा, राजगड, चाकण आदी किल्ले स्वराज्यात आणल्यावर त्यांचे लक्ष बळकट अशा कोंडाण्याकडे गेले.

हा किल्ला ताब्यात असेल तर पुणे प्रांत पूर्णपणे सुरक्षित करता येईल हे त्यांस माहीत होते मात्र या ठिकाणी आदिलशाहने मोठा बंदोबस्त केला होता आणि एक प्रबळ हवालदार मोठ्या सैन्यासह या किल्ल्यावर तैनात होता.

थेट युद्ध करून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केल्यास आदिलशहाशी उघड वैर केल्याचे निमित्त होऊन आदिलशाह आपल्या नाशासाठी पूर्ण प्रयत्न करेल हे सुध्दा शिवरायांना माहीत होते त्यामुळे त्यांनी हा किल्ला साम, दाम, दंड, भेद यापैकी दाम या नीतीचा वापर करून हस्तगत करण्याचे ठरविले आणि आपले विश्वासू बापूजी मुद्गल यांना सिंहगडाच्या हवालदारासोबत चर्चा करण्यास पाठवले.

यानंतर सिंहगडच्या हवालदाराला रक्कम देऊन तो किल्ला त्याच्याकडून स्वराज्यात घेण्यात आला. हा किल्ला स्वराज्यात आल्यावर महाराजांनी त्याची व्यवस्था लावून त्यास सिंहगड हे नावं दिले.

शिवचरित्रात केवळ बापूजी मुद्गल यांचेच नव्हे तर त्यांचे पुत्र बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी यांचे सुद्धा योगदान आहे.

ज्यावेळी महाराजांनी शाईस्तेखानास अद्दल घडवण्यासाठी लाल महालावर छापा घातला होता त्यावेळी प्रथम बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी यांनी तेथील माळ्यास वश करून लालमहालात जाण्याचा मार्ग जाणून घेतला.

यानंतर महाराजांच्या मागून आलेल्या सैन्यास चौकी पहाऱ्या करिता गेलेले लोक अशी बतावणी करून पहाऱ्यातून आत घेतले आणि आत गडबड करणाऱ्या काही खोजा लोकांना कंठस्नान घातले.

महाराजांनी नंतर शाईस्ते खानाची बोटे कलम करून त्यास शासन केले त्यावेळी मोठी गडबड झाली तेव्हा सर्व मराठ्यांनी मोठी लढाई करून खानाच्या छावणीत हाहाकार करून आंबील ओढ्याच्या मार्गे सर्व बाहेर आले.

या कामगिरीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल महाराजांनी बाबाजी व चिमणाजी या दोघांचा इतर सर्व लोकांसह सत्कार करून दोघांना पालखीचा मान दिला.

शिवकाळात स्वराज्याची सेवा करून महाराजांना मोलाची साथ देणाऱ्या बापूजी मुद्गल आणि त्यांचे पुत्र बाबाजी आणि चिमणाजी यांच्या कार्याची दखल इतिहासाने घेतली मात्र ती दखल भविष्यातही घेण्यात यावी हीच माफक अपेक्षा.