श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर - श्रीशैलम आंध्रप्रदेश

श्रीशैलम येथील श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामींचे मंदिर पाहण्यास जगभरातून भाविक येत असतात.

श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर - श्रीशैलम आंध्रप्रदेश

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतातील प्रसिद्ध अशा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे श्रीशैल मल्लिकार्जुन. श्री शैल मल्लिकार्जुन हे देवस्थान आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यातील श्रीशैलम या ठिकाणी आहे.

हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असे हे स्थळ महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पाऊन कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश असा प्रवास करीत बंगालच्या उपसागरास  मिळणाऱ्या कृष्णा नदीच्या तीरावर असून नल्लमल डोंगररांगेतील श्रीशैलम नामक  पहाडावर वसले असून दत्त संप्रदायासाठी अतिशय पवित्र असलेले कर्दळीवन याच परिसरात आहे.

२०१४ साली आंध्र प्रदेश राज्याचे दोन भाग करून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण करण्यात आले व श्रीशैलम हे स्थळ सध्या आंध्र प्रदेशात येत असले तरी तेलंगणा व आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरच आहे.

श्रीशैलम हे स्थळ येथील मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगामुळे प्रसिद्ध आहे हे तर आपण जाणून घेतलेच मात्र याच ठिकाणी भ्रमराम्बा देवीचे जागृत पीठ आहे. स्कंद पुराणातील श्री शैल कांड नामक अध्यायात या देवस्थानाचे वर्णन आले आहे. या मंदिराच्या माहात्म्यामुळे आदी शंकराचार्य यांनी सुद्धा या स्थळास भेट देऊन शिवानन्दलहरी या ग्रंथांची रचना केली होती.

श्रीशैलम या स्थळाचे भौगोलिक स्थान सुद्धा विलोभनीय असून एका उंच टेकडीवर निबिड अरण्यात हे स्थान असून या टेकडीच्या बाजूने एका खोल खोऱ्यातून कृष्णा नदी वाहते. या ठिकाणी कृष्णा नदीला धरण बांधण्यात आले आहे व ते सुद्धा एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

श्रीशैलम येथील श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामींचे मंदिर पाहण्यास जगभरातून भाविक येत असतात. हे मंदिर अतिशय भव्य आणि पुरातन असून मंदिराच्या चोहोबाजूस करड्या रंगाचे पाषाण वापरून तटबंदी करण्यात आली आहे आणि या तटबंदीसाठी जे पाषाण वापरले गेले आहेत त्या प्रत्येक पाषाणावर विविध प्रकारची चित्रे कोरण्यात आली आहेत.

तटबंदीच्या मध्यभागी मुख्य मंदिर असून तटबंदीस एकूण चार प्रवेशद्वारे आहेत ज्यांना गोपुर म्हटले जाते. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात जागोजागी पहारे बसवण्यात आले असून एकाच मार्गाने मंदिरात प्रवेश करणे शक्य होते आणि आतमध्ये भ्रमणध्वनी वापरण्यास बंदी आहे.

मंदिराची रचना अतिशय अद्भुत असून काळ्या पाषाणातील मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर विविध प्रकारच्या शिल्पाकृती कोरलेल्या दिसून येतात आणि जमिनीवर वेगवेगळ्या काळातील शिलालेख दिसून येतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील नंदी अतिशय भव्य असून रेखीव असा आहे. मुख्य गाभाऱ्यात मल्लिकार्जुन दिव्य ज्योतिर्लिंग असून ते पाहून जीवनाची कृतकृत्यता झाल्यासारखे वाटते.

या देवस्थानाचे एक प्रमुख वैशिट्य म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्थळी भेट देऊन काही काळ वास्तव्य केले होते व या प्रसंगाचे उल्लेख अनेक ऐतिहासिक साधनांत आढळतात.

शिवराय ज्या वेळी या स्थळी आले त्यावेळी या स्थळाचे अवणर्नीय दृश्य पाहून साक्षात कैलास पर्वतचाच भास झाला आणि या देवस्थानास आपल्या देहाचे अपर्ण करून जीवितसार्थक करावे असे त्यांना वाटले मात्र त्यांनी आपली तलवार उपासल्यावर भवानी मातेचे दर्शन त्यांना झाले आणि त्यांना सांगितले की देशाच्या व जनतेच्या रक्षणासाठी आपला जन्म झाला असून आपल्याला यापुढेही मोठे कार्य करायचे आहे. भवानी मातेचा उपदेश ऐकल्यावर त्यांनी या रम्य स्थळी कायमचे राहून तपस्वीवृत्तीत पुढील काळ व्यतीत करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि लोकांस म्हणाले आमचे सर्व मनोरथ जगदंबेच्या कृपेने पूर्ण झाले असून आता सर्व गोष्टींतून निवृत्त होऊन याच स्थळी मोक्षसाधनेत उरलेले दिवस घालवावेत असे मला वाटत आहे तेव्हा तुम्ही हि मोहीम पूर्ण करून रायगडास जावे आणि संभाजी राजेंना गादीवर बसवून त्यांचे नावे राज्यकारभार चालवावा.

महाराजांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला मात्र महाराज या ठिकाणी तपस्विवेश धारण करून अंगास भस्म लावून ध्यानधारणेस बसले व तब्बल नऊ दिवस त्यांनी या स्थळी ध्यान केले. ध्यानातून बाहेर आल्यावर रघुनाथपंत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत व अशा प्रकारे अनेकांनी हट्ट केल्याने महाराजांनी पुन्हा एकदा क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचा विचार केला आणि या ठिकाणी खूप दान धर्म करून एक घाट बांधला व त्याचे नाव श्रीगंगेश असे ठेवले. तपस्वी लोकांना तप करण्यासाठी गुहांची निर्मिती केली, धमर्शाळा आणि मठ बांधले, मंदिराच्या उजव्या दिशेस एका गोपुराची निर्मिती केली ज्यास आजही श्री शिवाजी गोपुरम या नावाने ओळखले जाते व या ठिकाणी महाराज आणि भ्रमराम्ब्रा देवीची भव्य मूर्ती आहे.

अशाप्रकारे अदमासे वीस दिवस महाराजांनी श्रीशैलम येथे वास्तव्य केले आणि पुढील कामगिरीस रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे या स्थळी वास्तव्य झाल्याने त्यांनी ज्या स्थळी ध्यान केले त्या ठिकाणीच श्री शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र आणि ध्यान केंद्राची नव्याने स्थापना करण्यात आली आहे आणि या परिसरातील सर्व नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात व जागोजागी महाराजांची चित्रे व नावे दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने प्रसिद्ध झालेल्या श्रीशैलम या जागृत व निसर्गरम्य स्थळास एकदातरी भेट द्यायलाच हवी.