अलिबाग - एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ

रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे विद्यमान ठिकाण असलेले अलिबाग हे निसर्गसंपन्नतेसोबत पराक्रमाचा वारसा जपणारे शहर आहे.

अलिबाग - एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ

सुरुची उंचच उंच झाडं, त्यांच्याशी हितगुज करणारी नारळाची झाडं गालिचा अंथरल्यासाखी मऊशार वाळु, समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारासारखा ताठ मानेनं उभा असलेला कुलाबा किल्ला हे वर्णन दुसरं तिसरं कुठलंही नसुन प्रवाशांचं आकर्षण ठरलेल्या अलिबागचं आहे. अलीबाग (Alibaug) बसस्थानकात उतरल्यानंतर साधारणत: १ कि.मी. पश्चिमेला चार ते पाच कि.मी. लांबीचा वालुकामय समुद्रकिनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदुषणमुक्त किनारा म्हणुन अलिबागचा किनारा ओळखला जातो.

हे ठिकाण पुर्वीच्या चौल (Chaul) बेटावरील साखर या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाडीच्या मुखावर वसले असून पुर्वी विलग असलेली ही बेटे आधुनिक युगात रस्ते व पुलांनी  जोडली गेल्याने जवळ आली आहेत. अलिबागचा आसमंत चौल या बंदरामुळे प्राचिन काळापासून प्रसिद्ध होता. अलिबाग हे नाव १७ व्या शतकात उदयास आले, पुर्वी या परिसराचे मुख्य गाव रामनाथ होते कारण गावात असलेले पुरातन राम मंदीर.. याशिवाय मूळ गावठाण हे रामनाथ येथेच असल्यामुळे गावदेवी मंदीरही रामनाथ येथेच आहे. त्याकाळी अलिबाग ही फक्त एक बाग होती जी अली नावाच्या धनिक व्यापार्‍याची होती, याच नावावरुन या बागेस अलिबाग असे नाव मिळाले. सध्याचे अलिबाग शहर हे अशा अनेक बागा व वाड्या मिळून तयार झाले आहे ज्यामध्ये श्रीबाग, हिराबाग, मोतीबाग इत्यादी अनेक बागांचा समावेश होतो.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात झाला अलिबागचा उत्कर्ष

अलिबागचा उत्कर्ष प्रामुख्याने सरखेल कान्होजी आंग्रे (Kanhoji Angre) यांच्या काळात झाला, अलिबाग या बागेचे रुपांतर त्यांनी संपन्न अशा शहरात केले, आंग्रे काळात येथे अनेक विकासकामे व बांधकामे झाली तसेच मंदीरांची निर्मिती व जुन्या मंदीरांच्या जिर्णोद्धाराचे कार्यही झाले या मंदिरांत मारुती मंदीर, बालाजी मंदीर, राम मंदीर, काशि विश्वेश्वर मंदीर, गणपती मंदीर, काळंबिका मंदीर, विठ्ठल रखुमाई मंदीर, दत्तमंदीर, विष्णू मंदीर इत्यादींचा समावेध आहे. याशिवाय शहरात दोन मशिदी आहे ज्यातली एक २०० वर्षे जुनी असून एक १०० वर्षे जुनी आहे. अलिबागेत बेने इस्त्रायली लोकांची संख्या खुप मोठी आहे यांचे एक सिने गॉग सुद्धा येथे पहावयास मिळते. खुद्द अलिबागेत दोन किल्ले आहेत, एक म्हणजे प्रसिद्ध कुलाबा किला जो शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) बांधला व दुसरा हिराकोट किल्ला.  कुलाबा (Kulaba Fort) हा जलदुर्ग दक्षिणोत्तर २६७ ते ९२७ मीटर लांब व पूर्व-पश्चिम १०९ मीटर रुंद अशा बेटावर आहे. कुल म्हणजे किनारा आणि आप म्हणजे पाणी यावरुन कुलाप आणि अपभ्रंशाने कुलाबा असे या किल्ल्याला नाव पडले असावे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जाता येते. भरतीच्या वेळेस मात्र किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात ३.५ कि.मी. नैऋत्येकडे ६० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. अली याने बागायतीला पाणी मिळावे यासाठी अनेक विहीरी या बागेत बांधल्या त्यातल्या ११-१२ विहीरी आजही अस्तित्वात आहेत.

सन १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे आरमारप्रमुख झाल्यावर त्यांनि अलिबाग शहराची निर्मिती केलि मात्र त्यांचा निवास कुलाबा किल्ल्यातच होता मात्र राजवाडा, पागा व खजिन्यासाठी त्यांनि अलिबागची निवड केली. १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा झाले व तेथे इंग्रजांचा अमल सुरु झाला १८४० साली अलिबागला कुलाबा एजन्सीचे मुख्यालय करण्यात आले व १८५२ सालि ते तालुक्याचे ठिकाण झाले. सन १८६९ साली निर्माण झालेल्या कुलाबा जिल्ह्याचे मुख्यालय म्हणुनही अलिबागचीच निवड करण्यात आलि व कुलाबा जिल्ह्याचे रायगड नामांतर झाल्यावरही मुख्यालय अलिबागच राहीले. अलिबाग शहराची प्रमुख आकर्षणे आहेत त्यामध्ये कुलाबा किल्ला, हिराकोट किल्ला, आंग्रे वाडा, छत्री बाग, चुंबकिय वेधशाळा इत्यादींचा समावेध होतो. कुलाबा किल्ल्याची निर्मिती १६६२ सालि शिवाजी महाराजांनि केली यानंतर दर्यासारंग व दौलतखान यांनी येथून कारभार पाहिला व नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांनि कुलाब्यास आपल्या प्रमुख हालचालींचे ठिकाण केले.

शहरातील प्रसिद्ध हिराकोट किल्ला व तलाव १७२० साली कान्होजी आंग्र्यांनी खजिन्याच्या ठिकाणासाठी बांधला येथे हिरा नामक एका स्त्रीची बाग होती. हा किल्ला बांधण्यासाठी जेथे खोदकाम करण्यात आले तेथेच नंतर तलाव बांधण्यात आला. या किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून वापरण्यात आलेले पाषाण प्रशस्त आहेत. किल्ल्यात देवीचे मंदीर असून बाहेर मारुती मंदीर व एक छोटा दर्गा आहे. सध्या याचा वापर तुरुंग म्हणुन केला जतो. येथील छत्रीबागेत कान्होजी आंग्र्यांसहित घराण्यातील पुरुषांच्या व स्त्रीयांच्या समाध्या आहेत. बस स्थानकावरुन थोड्याच अंतरावर जुन्या धाटणीचा आंग्रे वाडा आहे, आजही या वाड्याने आपले भव्यपण जपले असले तरी सध्या हा भग्नावस्थेत आहे. येथे पुर्वी आंग्रेकालीन टाकसाळ होती व त्यास 'अलिबागी रुपया' असे नाव होते. येथील चुंबकिय वेधशाळा विज्ञानाचा अजब नमुना आहे, १९०४ साली स्थापन झालेल्या या वेधशाळेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या चूंबकिय शक्तीमधले फेरफार या शाळेत नोंद केले जातात यासाठी इमारतीची बांधणी विशिष्ट अशा दगडांनी केली असून लोखंडाचा बिलकुल वापर करण्यात आलेला नाही. अलिबागेस नैसर्गिक व ऐतिहासिक पार्श्वभुमी आहेच मात्र या भुमीने अनेक नररत्नांची निर्मिती सुद्धा केली आहे यामध्ये सरखेल कान्होजी आंग्रे, जनरल अरुणकुमार वैद्य, कै. नारायण नागू पाटील, कै. प्रभाकर पाटील व अनेकांचा समावेश होतो.

सायंकाळच्या वेळेस अलिबाग समुद्रकिनार्‍यावरचे दृष्य अवर्णनीय असते. मावळतीला जाताना समुद्रात डुबणारा तांबडा भडक सूर्य पाहताना माणूस देहभान विसरुन जातो. सूर्य डुबल्यानंतरही त्याच्या नयनमनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग, फिरण्यासाठी आलेले अलिबागकार हा देखावा अनुभवण्यासारखा आहे.

अलिबाग समुद्रकिनार्‍यावर सूर्यास्त जेवढा आकर्षक आहे तेवढाच सूर्योदय देखील. कुलाबा किल्ल्याजवळून सूर्योदय बघताना किनार्‍यावरील बंगले, मंदिरे, नारळी-पोकळीच्या लांबवर पसरलेल्या राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते. अलिबाग समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाण्यार्‍या पर्यटकांनी अहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरती सुरु झाल्यानंतर किनार्‍याला येण्याची घाई करु नये. ओहोटी सुरु होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे. भरतीच्या पाण्याची पर्वा न करता किनार्‍याकडे येणार्‍या अनेक पर्यटकांना प्राणास मुकावे लागले आहे.

Blue Host