नाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी

नाशिक शहराचे नाव हे नासिक्य या संस्कृत नावापासून निर्माण झाले आहे व नासिक्यचा अर्थ होतो नाक अथवा नासिका.

नाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी
नाशिक

गोदावरी नदीच्या किनारी वसलेले नाशिक शहर हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख महानगरांपैकी एक मानले जात असले तरी नाशिक शहराचे महत्व अत्यंत प्राचीन आहे.

प्राचीन काळी पश्चिम महाराष्ट्रात दंडकारण्य नावाचे एक घनदाट अरण्य होते व ज्यावेळी प्रभू श्रीराम हे सीतामाई व लक्ष्मणासहित अयोध्येहून दक्षिण दिशेस वनवासास आले त्यावेळी त्यांनी आपल्या वनवासाचा कालावधी हा दंडकारण्यात व्यतीत केला व याच दंडकारण्यात नाशिकचा समावेश होत असे.

नाशिक शहराचे नाव हे नासिक्य या संस्कृत नावापासून निर्माण झाले आहे व नासिक्यचा अर्थ होतो नाक अथवा नासिका. ज्यावेळी लंकाधिपती रावणाची बहीण शूर्पणखा रामावर भाळून त्यास लग्नासाठी मागणी घातली असता लक्ष्मणाने आपल्या तरवारीने तिचे नाक याच ठिकाणी कापले होते व त्यामुळेच या स्थळास नासिक्य असे नाव प्राप्त झाले अशी माहिती जुन्या साहित्यांत आढळते.

नाशिक शहराचे दुसरे महत्व म्हणजे भारतातील ज्या अतिपवित्र नद्या मानल्या गेल्या आहेत त्यापैकी एक गोदावरी व महाराष्ट्राची गोदामाई हिच्या तीरावर हे शहर प्राचीन काळापासून वसले असून गोदावरी नदीचे महत्व सिंहस्थ पर्वणीस मोठे असल्याने या परिसरात दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यास समस्त जगभरातून हिंदू भाविक येतात व गोदावरी नदीत स्नान करून पुण्यसंचय करतात.

नाशिक शहरासहित नाशिक परिसर सुद्धा अतिशय ऐतिहासिक असून येथे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, पंचवटी, सीतागुंफा, तपोवन, वेणनदी कपिला, ब्रह्मयोनी, पंचतीर्थे, सप्तऋषींचे स्थान, शूर्पणखा मूर्ती, गंगापूर, रामशैय्या, सीतासरोवर, टाकळीचा हनुमान, पांडवगुफा, पवित्र कुंड आदी अनेक प्राचीन तीर्थस्थाने नाशिकच्या आसमंतात आहेत.

खुद्द नाशिक शहरात बालाजी, रामचंद्र, सुंदरनारायण, देव मामलेदार, काळाराम, मुरलीधर, कपालेश्वर आणि इतर असंख्य मंदिरे असल्याने नाशिक शहरास महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हणणे संयुक्तिक राहील.