स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड
रायगड जिल्ह्यास 'रायगड' हे नाव ज्या किल्ल्यामुळे मिळाले तो अभेद्य व शिवछत्रपतींच्या राजधानीचे ठिकाण असलेला किल्ला हा रायगड जिल्ह्याची मुख्य ओळख आहे.
रायगड किल्ल्याची किर्ती आजच नाही तर पूर्वीही इतकी दुरवर पसरली होती की, पाश्चिमात्य यास 'पुर्वेकडील जिब्राल्टर' म्हणुन ओळखत. केळनृपविजयम या कानडी काव्याचा कर्ता रायगडचा उल्लेख 'भुतलावर आश्चर्यकारक म्हणुन गणला जाणारा रायरी' असे करतो.
सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून विलग झालेला तरिही तब्बल एक मैलाची दरी असलेला हा किल्ला शिवाजि महाराजांनी त्यांच्या राजधानीचे स्थळ म्हणुन निवडला यात नवल ते काय? रायगडचे प्राचिन नाव रायरी, याशिवाय यादवकाळात या किल्ल्यास तणस व रासिवटा अशिही नावे होती. दुरुन हा किल्ला पाहिल्या एका तेवत्या नंदादिपासारखा दिसतो त्यामुळे यास नंदादिप असेही म्हणत. यादवकाळानंतर जेव्हा दुर्गांचे महत्त्व कमी झाले तेव्हा या किल्ल्यांचा वापर फक्त टेहळणी अथवा कैदखाना म्हणुन केला गेला, निजामशाही काळात रायगडाचाही वापर कैदखाना म्हणुनच केला गेला.
आदिलशाही काळात हा परिसर जावळीच्या मोर्यांच्या अखत्यारित होता. या मोर्यांच्या प्रमुखास 'चंद्रराव' हा किताब असे, १६४८ च्या दरम्यान जेव्हा प्रमुख दौलतराव मरण पावला तेव्हा त्याच्या वारसांमध्ये किताबासाठी झगडा सुरु झाला तेव्हा त्याच्या बायकोने शिवाजी महाराजांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्याने पोलादपुरकर घराण्यातला 'यशवंतराव' हा मुलगा दत्तक घेतला व त्यास चंद्रराव हा किताब दिला. मात्र एवढी मदत करुनही कालांतराने मोरे शिवाजी महाराजांना न जुमानते झाले त्यामुळे १६५५ नंतर जावळीवर हल्ला करुन शिवाजी महाराजांनि मोर्यांचा नि:पात केला व जावळी सोबत याच प्रांतातला रायगड सुद्धा ताब्यात घेतला. हा किल्ला स्वराज्यात आल्यामुळे शिवाजी महाराजांचा खुप फायदा झाला कारण रायगडपासून मुंबई, पुणे व सातारा ही प्रमुख शहरे सारख्याच अंतरावर आहेत, तसेच समुद्र येथून फक्त ४८ मैल असल्यामुळे सिद्दीवर वचक ठेवणे शक्य होणार होते. तसेच किल्ल्याचे भौगोलिक स्थान इतके दुर्गम आहे की सह्याद्रीच्या रांगानी वेढल्यामुळे अगदी जवळ जाईपर्यंत किल्ल्याचे दर्शन होत नाही.
रायगड किल्ल्यावर जाण्यास पुर्वी अनेक मार्ग होते, आजही हे दुर्गम मार्ग अनेक स्थानिकांकडून अथवा गिर्यारोहकांकडून वापरात आणले जातात मात्र आधुनिक काळात सर्वसामान्यांनाही जाण्यास सोपा असा मार्ग म्हणजे महाड मार्गे रायगडास जाणारा गाडीमार्ग, या मार्गे महाडपासून रायगड अदमासे १४ मैल अंतरावर आहे. पुर्वी हा मार्ग कोंझर पर्यंत होता व येथून पायी चालत जावे लागायचे मात्र आता थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जातो, अबालवृद्धांना हा दुर्गम गड चढण्यास सोपा जावा म्हणुन काही वर्षांपुर्वी येथे रोप वे ची सुवीधा सुरु करण्यात आली आहे ज्याचा लाभ लक्षावधी नागरिकांनी घेतला आहे.
गडवाटेवरुन जेव्हा चालत आपण रायगडावर जाण्यास सुरुवात करतो तेव्हा प्रथम लागतो खुबलढा बुरुज येथेच पुर्वि प्रसिद्ध चित दरवाजा होता. येथून पुढे गेल्यावर लागतो नाणे दरवाजा, पुढे काही बुरुज व नंतर महादरवाजा लागतो. येथे पहारेकर्याच्या चौक्या व कोठारे आहेत. पालखी दरवाज्यानंतर बालेकिल्ल्यास सुरुवात होते. रायगडावरील महत्त्वाची ठिकाणे म्हणजे शिवरायांची समाधी, जगदिश्वर मंदीर, राजवाडा, सिंहासनाची जागा, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी टोक, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, शिर्काई मंदीर. या किल्ल्याचे बांधकाम वास्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांनि केले त्यांच्या नावाचा शिलालेख जगदिश्वर मंदीराच्या पायरीवर आहे. याशिवाय आणखी एक संस्कृत शिलालेख एका चौथर्यावर आहे. किल्ल्यावर एक पोलादी स्तंभ आहे ज्यास संभाजी महाराजांचा मल्लखांब म्हणतात त्यावर सुद्धा एक लेख आढळुन आला आहे. असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रियांचे एक तिर्थस्थानच आहे.