एकदरा येथील एकदरकरिण देवी

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील एकदरा गावातील एकदरकरीण देवीचे मंदिरही असेच एक अप्रसिद्ध देवस्थान.

एकदरा येथील एकदरकरिण देवी

महाराष्ट्रात विपुल प्रमाणात देवस्थाने आहेत व काही देवस्थाने ही राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहेत तर काही देवस्थाने ही खऱ्या अर्थी कानाकोपऱ्यात असूनही अनेकांना माहिती नाहीत.

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील एकदरा गावातील एकदरकरीण देवीचे मंदिरही असेच एक अप्रसिद्ध देवस्थान. एकदरा हे राजपुरी खाडीवरील एक महत्वपूर्ण गाव. राजपुरी खाडीवरील मुरुडच्या दक्षिणेस एका समुद्रात शिरलेल्या बेटावर हे गाव असून गावास प्राचीन काळापासून ऐतिहासिक महत्व होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी पदमदुर्ग हा जलदुर्ग निर्माण केला तसाच एकदरा गावाच्या डोंगरावर सामराजगड हा किल्ला बांधला. आजही या किल्ल्याचे अवशेष पाहावयास मिळतात. एकदरा गावातील गोमुख, शिवमंदिर व राम मंदिर ही धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत मात्र येथील एकदरकरिण हे शक्तीपीठ सुद्धा स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या मुरुड शहरातून दक्षिण दिशेस जो रस्ता समुद्राला खेटून दंडाराजपुरी आणि जंजिरा किल्ल्याकडे जातो त्याच मार्गात मुरुड सोडल्यावर खाडीवर एक मोठा पूल बांधण्यात आला असून तो पूल ओलांडल्या ओलांडल्या आपण एकदरा गावात पोहोचतो. एकदरा गावातील प्रमुख वस्ती येथील भूमिपुत्र कोळी व भंडारी यांची असून रस्त्याच्या उजव्या बाजूस ७५ मीटर उंच अशा टेकडीच्या पायथ्याशी हे गाव आहे.

गावात न शिरता मुख्य रस्त्यापासून थोडे पुढे गेल्यास एक चिंचोळा भाग आहे तेथून उजव्या बाजूस एकदरा जेट्टीकडे जाणारा रास्ता दिसून येतो. एकदरा धक्क्याची लांबी ४९.४ मीटर असून येथून जलमार्गाने जंजिरा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे जाता येते.

मात्र आपल्याला एकदरा जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीसच डाव्या बाजूच्या एका कड्यावर चढायचे असते कारण हा कडा चढूनच आपण देवळात पोहोचू शकतो. पूर्वी या ठिकाणी जाण्यास पायवाट होती मात्र आता पायऱ्या बांधण्यात आल्याने मार्ग भाविकांसाठी सुरक्षित झाला आहे. एकदरा गावाचे मुळात दोन भाग आहेत यापैकी एक भाग सामराजगडाच्या पायथ्याशी असून दुसरा भाग हा एकदरकरिण देवीचे स्थान असलेल्या डोंगराच्या माथ्यावर ४० मीटर उंचावर आहे.

या डोंगराच्या पश्चिमेस सरळ तुटलेला एक भीषण कडा आहे व या कड्यावरच एका कपारीत एकदरकरीण देवीचे स्वयंभू स्थान आहे. देवीचे स्थान ज्या ठिकाणी आहे तेथे पोहोचणे सामान्य भाविकांसाठी अशक्यच कारण फक्त एक पाऊल बसेल एवढीच जागा तेथे असून खाली सरळ कडा आणि अगदी शेवटी टोकदार व भल्यामोठ्या दगडांचा समूह असल्याने येथून खाली कोसळल्यास काय गत होईल असाच विचार मनात येतो.

मात्र आजतागायत येथून भाविकांस एकही अपघात झाला नसल्याचे सांगितले जाते. देवीचे सेवेकरी स्वतः मंदिरात जात असल्याने भाविकांना थोड्या सुरक्षित जागेवरून देवीचे दर्शन घेता येते व नवस, नैवेद्य देवीस पुजाऱ्यामार्फत देता येतो.

मुरुड जंजिरा परिसर हा पूर्वीपासून सिद्दी या आफ्रिकन वंशाच्या समूहाच्या अधिपत्याखाली राहिला आहे मात्र येथील बहुतांश नागरिक हे हिंदू सुद्धा आहेत व जंजिरा संस्थानाचे बरेचशे कारभारी हे हिंदू होते. या कारभाऱ्यांची दैवते ही या परिसरात होती. एकदरकरीण देवी सुद्धा असेच मुरुड जंजीऱ्यातील हिंदू रहिवाशांचे आराध्य दैवत.

एकदरकरीण देवीस कालिका या नावानेही ओळखले जाते व मूळच्या हबसाण परिसरातील मात्र कालांतराने विस्थापित झालेल्या प्रभू समाजातील काही कुटुंबांचे ते कुलदैवत आहे व दरवर्षी ही कुटुंबे देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

देवीच्या मूळ स्थानाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा देव्हारा असून भाविकांना तेथे बसून प्रार्थना अथवा नवस करता येतो. मुख्य स्थानी तांदळा स्वरूपात देवीची व इतर देवतांच्या मूर्ती आहेत ज्या थोडे कष्ट घेतल्यास दिसू शकतात.

देवीचे स्थान हे उंचावर व अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असल्याने येथून जंजिरा किल्ला, सामराजगड, एकदरा जेटी आणि अरबी समुद्राचा नयनरम्य देखावा दृष्टीस पडतो. याच ठिकाणाहून वर जाणाऱ्या काही कोरीव पायऱ्या दिसून येतात ज्या डोंगरावरील गावात जाण्याची जुनी वाट होती मात्र आता या वाटेचा वापर फारसा होत नसावा.

आपल्या देवतांना मुळात शांत ठिकाणी निवास करणे आवडते मात्र गेल्या हजारो वर्षांत लोकवस्ती वाढून अनेक देवस्थानांच्या आजूबाजूस शहरीकरण झाले मात्र काही देवस्थाने आजही शांततेची झालर पांघरून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीत आहेत व कडेकपारीतील एकदरकरीण देवी सुद्धा अशाच देवस्थानांपैकी एक आहे त्यामुळे मुरुड जंजिरा येथे भेट देण्याचा विचार असेल तर या अपरिचित देवस्थानास नक्की भेट द्या.