समुद्रगुप्त - गुप्त वंशातील प्रख्यात राजा

उत्तर भारतातील नऊ राजे, दक्षिणेतील अकरा आणि सरहद्दीवरील अनेक राजांचा पराभव करून समुद्रगुप्ताने आपले राज्य वाढवले व या कर्तृत्वामुळे त्यास विक्रमादित्य असे नाव प्राप्त झाले.

समुद्रगुप्त - गुप्त वंशातील प्रख्यात राजा
समुद्रगुप्त

भारतास महान राज्यकर्त्यांची परंपरा आहे व या परंपरेतील एक नाव म्हणजे समुद्रगुप्त. समुद्रगुप्त हा गुप्त घराण्यातील एक प्रख्यात राजा. इसवी सन ३२० मध्ये चंद्र गुप्त या राजाने गुप्त साम्राज्याची स्थापना केली व या चंद्र गुप्ताचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त हा होता.

समुद्रगुप्ताचा जन्म इंद्रप्रस्थ अर्थात सध्याच्या दिल्ली शहरात झाला व चंद्र गुप्ताने पाटलीपुत्र या ठिकाणी गुप्त वंशाची राजधानी स्थापली मात्र समुद्रगुप्ताने पद्मावती उर्फ नरवार या ठिकाणाहून राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.

समुद्रगुप्ताचे राज्य एवढे मोठे होते की सम्राट अशोकानंतर एवढा राज्यविस्तार करणारा राजा म्हणून त्याचे नाव घेतले जाते. समुद्रगुप्ताचे राज्य हुगळी पासून यमुना आणि चंबळ या नद्यांच्या तटापर्यंत आणि हिमालयाच्या पायथ्यापासून नर्मदेपर्यंत दक्षिणोत्तर पसरले होते.

उत्तर भारतातील नऊ राजे, दक्षिणेतील अकरा आणि सरहद्दीवरील अनेक राजांचा पराभव करून समुद्रगुप्ताने आपले राज्य वाढवले व या कर्तृत्वामुळे त्यास विक्रमादित्य असे नाव प्राप्त झाले.

स्वतःच्या राज्यासोबत त्याने शेजारील काही राज्यांना मंडलिक सुद्धा केले होते व ती राज्ये म्हणजे गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मधील समतट, आसाम अर्थात कामरूप, दुवाक, नेपाळ, कर्तीपूर, पंजाब, माळवा आणि पूर्व राजपुताना हे होत. 

समुद्रगुप्ताच्या दरबारी गांधार, काबुल, श्रीलंका आदी राज्यातून वकील येत असत. सिंहलद्वीपाचा अर्थात श्रीलंकेचा राजा मेघवर्णाने आपला भाऊ समुद्रगुप्ताकडे वकील म्हणून पाठवल्याचा उल्लेख आढळतो. समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ सुद्धा केला असल्याचा उल्लेख आढळतो. या प्रसंगी त्याने सोन्याची लक्षावधी नाणी निर्माण करून ती दान केली व या नाण्यांवर होमकुंड असून शेजारी यज्ञाचा अश्व उभा असल्याचे चित्रित केले आहे. 

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील संग्रहालयात समुद्रगुप्ताच्या अश्वमेध यज्ञप्रसंगी वापरण्यात आलेला एक पाषाणी घोडा आजही पाहावयास मिळतो. उत्तर प्रदेशातील प्रयाग येथील किल्ल्यावरील एका स्तंभावर समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचे वर्णन लिहिण्यात आले आहे.

समुद्रगुप्ताचा समकालीन कवी हरिषेण याने त्याच्या पराक्रमाचे व गुणांचे वर्णन केले असून समुद्रगुप्त हा उत्तम कवी व लेखक असून गायन आणि वादनशास्त्रातही निपुण असा होता असा उल्लेख हरिषेण करतो. इसवी सन ३७५ साली पाटलीपुत्र अर्थात पटना येथे समुद्रगुप्ताचा मृत्यू झाला व त्याच्यानंतर त्याचा पुत्र चंद्रगुप्त (द्वितीय) हा गादीवर विराजमान झाला.