पन्हाळा किल्ल्याचा प्रसिद्ध अंबारखाना

पन्हाळा किल्ल्यावरील अंबारखान्याची इमारत ही दगड व चुना यांच्या मिश्रणाने बांधली असून शेकडो वर्षे झाली तरी इमारत आजही सुस्थितीत आहे.

पन्हाळा किल्ल्याचा प्रसिद्ध अंबारखाना
अंबारखाना पन्हाळा

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा या गडावर ज्या विपुल ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे किल्ल्याचा अंबारखाना. 

आकाराने अतिशय भव्य अशा या अंबारखान्यात पूर्वी गडावरील धान्य साठवण्याची व्यवस्था केली जात असे.

अंबारखाना हा मूळचा फारशी शब्द असून त्याचा मराठीतील अर्थ धान्याचे कोठार अथवा धान्यागार असा होतो याशिवाय अंबारखान्यास अंबरखाना या नावानेही ओळखले जाते.

पन्हाळा किल्ल्यावरील अंबारखान्याची इमारत ही दगड व चुना यांच्या मिश्रणाने बांधली असून शेकडो वर्षे झाली तरी इमारत आजही सुस्थितीत आहे.

अंबरखान्याचा वापर प्रामुख्याने धान्य साठवण्यासाठी केला जात असला तरी विविध राज्य काळात या वास्तूचा इतर कारणांसाठी सुद्धा वापर केला गेला. 

अंबारखान्याचे बांधकाम हे सुरक्षेच्या दृष्टीने बहुतांशी गडाच्या बालेकिल्ल्यावर करण्यात येत असे.

पन्हाळा किल्ल्यावरील अंबारखान्यात एकूण तीन कोठ्या आहेत व त्यांची नावे गंगा, यमुना व सिंधू अशी नद्यांच्या नावावरून देण्यात आली आहेत. 

या कोठ्यांमध्ये गंगा कोठी सर्वात मोठी असून तिला दोन दारे आहेत. कोठीच्या दोन्ही बाजूस वर जाण्यास जिने असून माथ्यावर धान्य ओतण्यासाठी मोठी छिद्रे निर्माण करण्यात आली आहेत. 

असे म्हणतात की या अंबारखान्यात एकावेळी तब्बल २५ हजार खंडी धान्य मावत असे व अंबरखान्याचे भव्य रूप पाहून याची प्रचिती सुद्धा येते.

तर असा हा पन्हाळगडाचा भव्य दिव्य अंबारखाना मध्ययुगीन इतिहासात धान्य साठवणुकीची व्यवस्था किती उत्तम होती याचा प्रत्यय देणारा एक ऐतिहासिक ठेवा आहे व तो ठेवा एकदा तरी पाहायलाच हवा.