खांदेरी किल्ला - माहिती व इतिहास

रायगड जिल्ह्यातील जलदुर्गांपैकी एक महत्वाचा दुर्ग म्हणजे खांदेरी जलदुर्ग. हा किल्ला अरबी समुद्रात अलिबाग तालुक्यातील थळच्या अगदी समोर आहे.

खांदेरी किल्ला - माहिती व इतिहास

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

खांदेरी व थळ यांच्या मधोमध उंदेरी हा किल्ला आहे व खांदेरीच्या दक्षिणेकडे कुलाबा जलदुर्ग आहे. पूर्वी थळ येथे खुबलढा नावाचा एक भुईकोट होता मात्र तो आता नष्ट झाला आहे.

मुंबईपासून समुद्रामार्गे खांदेरी १७ किलोमीटर आहे तर अलिबाग पासून ९ किलोमीटर आहे. मूळ बेट २.५ किलोमीटर लांब व ८०० मीटर रुंद आहे. ब्रिटिश खांदेरी उंदेरीस हेनरी व केनरी असे म्हणत. कधी कधी खांदेरीचा उल्लेख कुंद्रा अथवा कुंद्री असाही केला गेला आहे.  १८५२ साली ब्रिटिशांनी खांदेरी किल्ल्यावर दीपस्तंभाची उभारणी केली कारण मुंबई बंदरातून प्रवास करणारी जहाजे खांदेरी व उंदेरीच्या आसपासच्या खडकांवर आदळून फुटत. १८६६ साली त्याहूनही मोठा दीपस्तंभ खांदेरी येथे उभारला गेला. 

किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे म्हणजे तटबंदी, बुरुज, वेताळ मंदिर, हनुमान मंदिर, वेतोबा मंदिर, पाण्याच्या टाक्या व काही तोफा सुद्धा किल्ल्यावर आजही उभ्या आहेत. तटरक्षक दलाच्या अखत्यारीत किल्ला येत असल्याने किल्ला पाहावयाचा असल्यास पूर्वपरवानगी घ्यावी लागते. किल्ल्यावरील वेताळ मंदिर हे किनाऱ्यावरील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने अनेक जण दर्शनासाठी खांदेरी बेटास भेट देतात.

शिवकाळात खांदेरी किल्ल्याचे महत्व मुंबईवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते कारण या किल्ल्याच्या उत्तरेस सरळ रेषेत मुंबई आहे. त्याकाळी सिद्दी व इंग्रज यांचा घरोबा होता कारण इंग्रजांना मोगलांच्या मुलुखात व्यापार करणे गरजेचे होते व सिद्दी हा मोगलांचा मांडलिक असून मराठ्यांचा शत्रू होता.

महत्वाचे म्हणजे समोरासमोर असलेले खांदेरी व उंदेरी हे दुर्ग अनुक्रमे मराठे व ब्रिटिशांच्या ताब्यात होते त्यामुळे या दोन किल्ल्यांच्या परिसरात उभय सैन्यात अनेक चकमकी होत असत. खांदेरीच्या इतिहासात डोकावून पहिले असता पुढील माहिती मिळते.

१६७८ च्या ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा जंजिऱ्यावर तोफा डागल्या. यावेळी शिवाजी महाराजांना हे कळून चुकले की, सिद्दी मराठ्यांच्या मुलुखांमध्ये मुंबईमार्गे हल्ला करतात याचे कारण त्यांना इंग्रजांनी मुंबई बंदरात दिलेला थारा होय. त्यामुळे त्यांनी इंग्रजांना परत एकदा तंबी दिली आणि सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी अरबी समुद्रातील खांदेरी हे मोक्याचे बेट काबीज केले.

खांदेरी बेट काबीज केल्यानंतर मायनाक भंडारी व दर्यासारंग यांनी माती व दगड यांची मजबूत भिंत बेटाभोवती बांधण्यास सुरुवात केली पण सिद्दीला हे खपले नाही.  त्याने आपले आरमार खांदेरी येथे नेऊन खांदेरीवर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु केला.  मराठ्यांचे खांदेरीवरील वर्चस्व हे इंग्रजांनासुद्धा धोकादायक होते. कारण हे बेट मुंबईच्या समोर असल्याने मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी मराठ्यांना सोयीचे होते. म्हणून परत एकदा खांदेरी ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी खांदेरीवर काही जहाजे घेऊन हल्ला केला. 

या मोहिमेचे नेतृत्व केगविन आणि गेप नामक कप्तानांकडे होते आणि डोवर आणि रिव्हेंज ही इंग्रजांची जहाजे तैनात केली गेली होती. या जहाजांनी खांदेरीवर मुंबईच्या दिशेने हल्ला केला. तेव्हा मराठ्यांच्या सैन्याची कुमक चौलवरून खांदेरीवर धाडली गेली. यामध्ये डोवर हे जहाज मराठ्यांच्या हाती लागून कॅ. गेप ठार झाला.

दोनच दिवसांनी मराठा आरमाराने पुन्हा एकदा इंग्रजांवर हल्ला केला. स्वत: केगविनने तक्रार केली होती की, मराठ्यांची गलबते चलाख असल्याने आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरतात. यानंतर सिद्दीचे आरमार इंग्रजांना येऊन मिळाले आणि खांदेरीवर दोघांच्या सैन्याने मिळून तोफा डागल्या पण मराठ्यांच्या सैन्याने दोघांच्याही आरमारांचा अक्षरश: धुव्वा उडवला. मात्र सिद्दींबरोबर एकत्रित लढून आपण खांदेरी जिंकून घेतला तरी सिद्दी आपणास तो न देता स्वत:च्याच ताब्यात ठेवणार आहे हा सिद्दीचा डाव इंग्रजांच्या लक्षात आल्यावर इंग्रजांनी खांदेरीचा नाद सोडून दिला.

मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत या लढाईचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.

दौलतखान, मायनाईक भंडारी व दर्या सारंग यांजकडे आरमाराचा सुभा होता. ते खांदेरीच्या किल्ल्याचे काम बांधत होते. त्यांजवर सुरतेहून याकूबखान व सिद्दी बहलोल आपापले फौज सरंजामनिशी धावून आले. जंजिरा किल्ल्यातील पोलादखान त्यांना सामील झाला. इंग्रजांकडील सरंजामही त्यांच्या कुमकेसी आला. बंदरावर आले. त्यांची व यांची लढाई झाली. दौलतखान मारला. आरमाराची तारांबळ झाली. शिकस्त होता हार व खांदेरी दिली नाही. हबशी यासी खांदेरी दिली नाही.

संभाजी महाराजांनी जेव्हा जंजिरा किल्ल्याभोवती सेतू उभारण्याचे काम सुरु केले त्यावेळी त्यांनी ५०००० माणसे या कार्यास लावली. आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक दगड, कापूस, गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हसन अलिखानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण जिंकून घेतल्याने महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभु देशपांडे यांच्याकडे सोपवून रायगडी यावे लागले. जंजिऱ्याला मराठा सैन्याचा वेढा पडला असताना सिद्दीची काही जहाजे मुंबई बंदरात आली, तेव्हा संभाजी महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला ती जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश दिले. 

१७३५ च्या दरम्यान बाजीराव पेशवे यांनी सरखेल मानाजी आंग्रे यांना राजमाची, कुलाबा, खांदेरी व कोर्लई जिंकून घेण्यास मदत केली आणि आंग्रे बंधू यांच्या मधील वाद सोडवण्याकरिता संभाजी व मानाजी यांना अलिबाग येथे नवेदर बेलीला बोलावून तह करून घेतला. संभाजीस सरखेल पद व मानाजीस वजारत माब किताब देऊन कुलाबा किल्ला त्याच्या स्वाधीन ठेवला.

१७९९ मध्ये बाबुराव आंग्रे यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने आपला पती जयसिंग यांच्या  मदतीस जाऊन खांदेरी किल्ला काबीज केला. जयसिंग यांचे दोन पुत्र पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुराव यांनी नंतर खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली.

बाबुरावांना खांदेरी किल्ला जिंकून घेणे अवघड होते. कारण तो जयसिंगाची पत्नी सकवारबाईकडे होता मात्र जयसिंग बाबुराव यांच्या ताब्यात होता. जमेची बाजू असल्याने बाबुराव यांनी सकवारबाईंना सांगितले की, जर खांदेरी आम्हाला द्याल तर जयसिंगास सोडेन. तेव्हा सकवारबाईने खांदेरी किल्ला बाबुरावांच्या ताब्यात दिला मात्र बाबुरावांनी जयसिंगास सोडून न देता ठार मारले व सकवारबाई आणि इतरांना कैद केले यावेळी जयसिंगाचा मोठा मुलगा मुंबईस पळून गेला.

खांदेरी परिसरात घडलेल्या इतिहासाला शेकडो वर्षे झाली मात्र या मध्ययुगीन रंजक इतिहासाच्या सांजसावल्या आजही या परिसरात गेल्यावर पहावयास मिळतात. अष्टागाराच्या कुठल्याही किनाऱ्यावरून खांदेरी व उंदेरी या दोन जलदुर्गांचे होणारे दर्शन आल्हाददायीच असते. त्यामुळे अष्टागर परिसराची सफर काढण्याचा बेत भविष्यात केल्यास खांदेरी व उंदेरी ही दुर्गजोडी पाहण्याचा नक्की प्रयत्न करा.