सज्जाकोठी - किल्ले पन्हाळा

सज्जेकोठी पन्हाळा किल्ल्याच्या उत्तर भागात असलेल्या राजवाड्याच्या पूर्वेस तटाशेजारी असून तिचे बांधकाम दुमजली आहे. 

सज्जाकोठी - किल्ले पन्हाळा
सज्जाकोठी पन्हाळा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ला हा एक विस्तीर्ण किल्ला असून प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीनही कालखंडांचा साक्षीदार आहे. पन्हाळा किल्ल्याच्या वैभवाची प्रचिती देणाऱ्या असंख्य वास्तू गडावर आजही आहेत व त्या वैभवात भर घालणारी एक वास्तू म्हणजे सज्जाकोठी.

सज्जेकोठी पन्हाळा किल्ल्याच्या उत्तर भागात असलेल्या राजवाड्याच्या पूर्वेस तटाशेजारी असून तिचे बांधकाम दुमजली आहे. 

एका द्वारातून आपण जेव्हा सज्जाकोठीत प्रवेश करतो त्यावेळी तळमजल्याच्या खोलीतील एका भिंतीवर एक फारशी शिलालेख आपल्या दृष्टीस पडतो. 

सज्जेकोठीची स्थापत्यशैली पाहता तिचे बांधकाम हे इसवी सनाच्या सोळाव्या शतकात झाले असावे असे अभ्यासकांचे मत आहे.

या इमारतीस सज्जा कोठी हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे या इमारतीस अतिशय सुंदर असा सज्जा अर्थात बाल्कनी आहे.

या सज्जातून पन्हाळा किल्ल्याच्या आसमंतातील विस्तीर्ण प्रदेश दिसून येतो. 

सज्जा कोठी दुमजली असल्याने वरील मजल्यावर जाण्यासाठी इमारतीच्या बाहेरून वर जाणाऱ्या एका जिन्यातून आपल्याला वर जावे लागते व हा जिना अतिशय चिंचोळा आहे.

जिना चढताना प्रकाशासाठी एका ठिकाणी झरोका तयार केलेला दिसून येतो.

जिना चढून आपण पहिल्या मजल्यावर येतो आणि अतिशय सुंदर असे स्थापत्य आपल्या दृष्टीस पडते आणि या इमारतीस सज्जाकोठी असे नाव का पडले असावे याचे उत्तर मिळते. पहिल्या मजल्यावर काही छोट्या खोल्याही दिसून येतात.

ही इमारत कलात्मक नजरेतून तयार झाली असून किल्लयावरून आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी अथवा काही काळ निवांत क्षण घालवण्यासाठी या इमारतीची निर्मिती करण्यात आली असावी.

या इमारतीस गच्ची असून तेथे जाण्यास पहिल्या मजल्यावरून जिना आहे मात्र ही वाट सध्या बंद आहे मात्र दोन मजल्यांवरून जर एवढे अवर्णनीय दृश्य दिसते तर गच्चीवरून किती सुंदर दिसेल असे जाणवल्याशिवाय राहत नाही.

मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना असलेली सज्जाकोठी पन्हाळा किल्ल्यास भेट देणाऱ्यांनी पाहायलाच हवी.