लोणार - खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध सरोवर
लोणारची मुख्य ओळख म्हणजे येथील खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे.
महाराष्ट्र राज्यात जी जागतिक दर्जाची वारसास्थळे आहेत त्यापैकी एक म्हणजे जगप्रसिद्ध लोणार सरोवर.
हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असून ज्या ठिकाणी हे सरोवर आहे त्या गावाचे नाव सुद्धा लोणार हेच आहे.
लोणारची मुख्य ओळख म्हणजे येथील खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे.
अभ्यासकांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी ६९ मी. रुंदीच्या व वीस लक्ष टन वजनाची उल्का पडल्याने १९०० मी. व्यासाचे व १९० मी. खोलीचे विवर निर्माण होऊन तेथेच या गोलाकार सरोवराची निर्मिती झालेली असावी.
या सरोवराचा बाह्य परिघ ६ किमी. अंतर्परिघ ३.५ किमी. व खोली ९० ते १९० मी. आहे. सरोवराच्या कडा १३० मीटरपर्यंत उंचावलेल्या आहेत. कडांवर काचेच्या छोट्या कणांपासून १० ते १५ सेंमी.पर्यंत आकाराचे काचेचे तुकडे पडलेले आढळतात.
सरोवराचे पाणी अत्यंत खारट व मचूळ आहे. मात्र काठावरील व आजूबाजूच्या विहिरींमधील पाणी गोड आहे. सरोवराच्या पाण्यात आढळणारे क्षार, मीठ आणि अन्य पदार्थ अन्यत्र कोठेही न सापडणाऱ्या प्रकारचे आहेत.
काहींच्या मते चुनखडीयुक्त विवराचे प्रचंड छत कोसळून तेथे या सरोवराची निर्मिती झाली असावी तर दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीउद्रेकाच्या वेळी जोराच्या वायुरूप स्फोटामुळे ज्वालामुखीच्या खोलगट भागात हे सरोवर निर्माण झाले असावे, असेही काहींचे मत होते.
परंतु अलीकडील काळात केलेल्या संशोधनावरून उल्कापातामुळेच हे सरोवर तयार झाले असावे, असे शास्त्रज्ञांच निश्चित मत बनले आहे.
बेसॉल्ट खडकरचना असलेल्या प्रदेशातील अशा स्वरूपाचे हे जगातील एकमेव विवर असावे. जगातील उल्कापाषाण पतनामळे निर्माण झालेल्या विवरांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे विवर आहे.
या विवरात दडला गेलेला उल्कापाषाण साधारण ६०० मी. खोलीवर रुतून बसला असावा, असा अंदाज आहे.
लोणार हे गाव विदर्भातील सर्वात प्राचीन गावांपैकी एक आहे व या गावास लोणार या सरोवरामुळेच ही ओळख प्राप्त झाली. मिठास संस्कृत भाषेत लोणार म्हणतात व हे सरोवर खाऱ्या पाण्याचे असल्याने त्यास प्राचीन काळी लोणार हे नाव मिळाले असण्याची शक्यता आहे.
या परिसराची स्थापना ही कृतयुगात झाली व त्याचे जुने नाव विरजक्षेत्र असे होते. विराजमहात्म्यात या परिसराचा तीर्थ म्हणून उल्लेख आला आहे.
लोणार सरोवर वैरज तीर्थ या नावाने ओळखले जात असे. स्कंदपुराणातील कथेनुसार विष्णूने याच ठिकाणी लवणासूर नामक राक्षसाचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले.
लवणासुराच्या रक्तापासून सरोवरातील पाणी तयार झाले, अशी आख्यायिका आहे. दुसरी आख्यायिका अशी आहे की लवणासुराचा वध केल्यावर विष्णूचे रक्ताने माखलेले हात धुण्यासाठी स्वतः गंगा येथे अवतीर्ण झाली व हे सरोवर निर्माण झाले.
सरोवराच्या एका बाजूस स्वच्छ पाण्याची अखंड वाहणारी धार (झरा) असून त्या धारेचा उगम गंगे पासून झाल्याचे भाविक मानतात तर दुसऱ्या बाजूस देवीचे मंदिर आहे.
याशिवाय येथे सीताना हिनी व रामगया असे दोन झरे आहेत. लोणार सरोवराभोवती अनेक मंदिरे असून ती बव्हंशी मोडकळीस आलेली आहेत. लोणार गावाच्या मध्यभागी विष्णूने ज्या ठिकाणी लवणासुरावर विजय मिळविला असे मानले जाते, तेथे दैत्य-सूदन हे सुंदर व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय नरसिंह, गणपती, रेणुकादेवी, कुमारेश्वर व मारुती यांची अन्य उल्लेखनीय मंदिरे आहेत.
लोणार सरोवर व त्याच्या परिसराच्या नयनरम्य सृष्टिसौंदर्यामुळे लोणार हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनले आहे. हे सरोवर लोणार गावाच्या नैऋत्य दिशेला असून त्याचा परिसर हा वनस्पती, प्राणी, पक्षी इ. जैवविविधतेचा असल्याने ते प्रतिबंधित अभयारण्य म्हणून राखीव आहे.
लोणार हे गाव मेहकर बुलढाणा हमरस्त्यावर बुलढाणा शहराच्या आग्नेय दिशेला ९० किमी. अंतरावर असून मुंबई ते लोणार हे अंतर ४८७.५ किमी व पुणे ते लोणार हे अंतर ३७४.५ किमी आहे.
लोणारच्या नजीकचे विमानतळ औरंगाबाद येथे असून नजीकची रेल्वे स्थानके परतूर व जालना ही आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या बसेस लोणारपर्यंत जातात. असे हे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध लोणार सरोवर व येथील प्राचीन मंदिरे व जैववैविधतेने समृद्ध असा परिसर एकदातरी पाहायलाच हवा.