आंबोली - थंड हवेचे ठिकाण
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात आहे. सावंतवाडी म्हणजे पूर्वीचे संस्थान, खेमसावंत्-भोसल्यांची राजधानी. हे गाव अतिशय रम्य आहे. राजाश्रयामूळे कलांना येथे चांगला वाव मिळाला. तुर्तास हे गाव लाकडी कलाकुसरीच्या वस्तू व हस्तकला उद्योगांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. लाकडी खेळणी, मेणाची व लाकडाची हुबेहूब दिसणारी फळे, वेताच्या व बांबूच्या छड्या, रंगित पाट, दरवाज्याला लावायच्या माळ, शोभेच्या वस्तू येथे तयार केल्या जातात. येथील चित आळी या परिसरात या वस्तूंचे एक दालनच उभे झाले आहे. येथील मोती तलाव, नरेंद्र डोंगर, आत्मेश्वरी तळे, विट्ठ्ल मंदीर, राजवाडा सुध्दा तितकेच प्रेक्षणीय.

सावंतवाडीपासून आंबोली आहे ३५ कि.मी. अंतरावर. मुंबई-रायगडकडून येर्णाया पर्यटकांसाठी येथे जाण्यास आंबोली घाट चडून जावा लागतो तर पुणे-कोल्हापूर्-बेळगाव मार्गे सरळ रस्ता आहे कारण हे गाव ऐन घाटमाथ्यावरच वसले आहे. काही वर्षांपूर्वी आंबोलीचे पर्यटन महत्त्व फार कोणास माहित नव्हते मात्र इतर थंड हवेची ठिकाणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी इत्यादी ठिकाणी झालेल्या पर्यटकांचा वाढता ताण पाहता या स्थळांना पर्याय शोधणे गरजेचे वाटू लागले व आंबोली हा यासाठी उत्तम पर्याय होता.
आंबोलीचा घाट हा मध्यकाळापासून दळणवळणाचा एक प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जाई. सध्याचा पक्क घाट १८६८ मध्ये इंग्रजांन बांधला. कोकण त्याकाळी ब्रिटीशांच्याच ताब्यात असल्याने व समुद्रमार्गे येर्णाया शत्रूंचा धोका असल्याने तोफांची वाहतूक मुख्यतः याच मार्गाने करण्यात येत होती. इतर संस्थानिकांसारखेच खेमसावंत्-भोसले सुध्दा ब्रिटीशांचेच मांडलीक झाले होते. १८२६ च्या दरम्याने या मार्गावरुन गोवे ते दक्षीणेचा भाग अशी वाहतूक होवू लागली नंतर मात्र वेंगुर्ला बंदर ते बेळगाव अशा सध्या अस्तित्वात असलेला मुख्य मार्ग तयार झाला.
जुलैचे शेवटचे दोन आठवडे हे कोकणात दमदार पावसाचे असतात आणि आंबोली हे असे ठिकाण आहे जेथे महाराष्ट्रातील सर्वाधीक पावसाची नोंद होते. अशावेळी डोंगरातून पाण्याचे अनेक प्रवाह कार्यान्वीत होतात. या प्रवाहांचा जोर जुलै महिन्यात प्रचंड असतो. गटार नसल्याने घाटात वरुन येणारे पाणी थेट रस्त्यात कोसळते. अशावेळी कड्याच्या भेगा पाणी गेल्याने कोसळतात व दुर्घटना होतात. घाटांतील कठड्यांची सुद्धा फार काहि चांगली अवस्था दिसून येत नाही. त्यामुळे अतीवृष्टीच्या काळात या मार्गावरील वाहतूक दरडींच्या दररोज कोसळण्यामुळे पुर्णपणे बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यासारख्या हंगामात कोकणात जाताना सारखी चौकशी करत राहणे गरजेचे असते.
कोकणातून या घाटास पाच पर्यायी मार्ग आहेत मात्र अंतर थोड्या फरकाने वाढते. यातील दोडामार्ग्-अकेरी-चंदगड मार्ग बर्यापैकी चांगला आहे. या मार्गे आंबोलीत प्रवेश करताना तुम्हास प्रथम दिसतो तो नांगरतास धबधबा मात्र या धबधब्यात भिजण्याचा विचारही करता येणार नाही, भिजण्यासाठी हा धबधबा नव्हेच. फक्त त्याचे छातीत धडकी भरवणारे रुप मनात साठवावे व बाजूस असलेल्या नांगरेश्वराचे दर्शन घेऊन पुढे निघावे. भुका लागल्या असल्यास धबधब्याच्या परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात आहेत. पावसात भिजल्या भिजल्या वडापाव, कणसे, चहा-कॉफी, आमलेटवर येथेच्छ ताव मारावा.
नांगरतास वरुन आंबोलीच्या दिशेने जायला निघाल्यावर काही कि.मी. अंतरावर डावीकडे हिरण्यकेशी अशी पाटी दिसते. येथून खाली गेल्यावर हिरण्यकेशी या नदीचा उगम पहावयास मिळतो. महाशिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते. विवर आणि गुहांमध्ये या नदीचा उगम झालेला परिसर गुढ आहे. पुढे रस्त्यावरुन उजवीकडे चार कि.मी. आत कावळेसाद पॉईंट आहे येथील कड्यावरुन खाली कोसळर्णाया सहा-सात धबधब्यांचे दर्शन अवर्णनीय आहे. या शिवाय परिसरात शिरगावकर पॉईंट, परीक्षीत पॉईंट, सनसेट पॉईंट, नारायणगड पॉईंड तसेच महादेवगड पॉईंट अशी स्थळे आहेत. यातील महादेवगड व नारायणगड पॉईंट म्हणजे आंबोलीच्य पठारावरून दिसणारे मुख्य सह्यधारेतले महादेवगड व नारायणगड नावाचे किल्ले होत. सह्याधारेतून पश्चिमेकडे पसरलेल्या रांगेत रांगणा, मनोहरगड तसेच मनसंतोषगड हे किल्ले सुद्धा आहेत.
घनदाट जंगल असल्याने वनखात्याने आंबोलीत एक सुंदर वनोद्यान निर्माण केले आहेत. साळिंदर, खवलेमांजर, रानडुकर, सांबर, चितळ, पिसई, भेकर, शेकरु इत्यादी प्राणि येथे पहावयास मिळतात. दुर्मिळ वनौषधी सुद्धा येथे विपुल प्रमाणात आहेत. याशिवाय पक्ष्यांच्या तसेच फुलपाखरांच्या अनेक दुर्मिळ जमाती येथे पहावयास मिळतात यातील काही पक्षी स्थलांतरीत असतात. दाट जंगलात शिरल्यास अस्वल, वाघ, बिबट्या, गवा, कोल्हे इत्यादी श्वापदांचा वावर दिसून येतो. प्रसन्न वातावरण, आल्हाददायक हवा, रस्त्याच्या सभोवताली दाटलेली वृक्षराजी, धुक्यात हरवलेला आसमंत, घाटमाध्यावर लपंडाव खेळर्णाया ढगांच्या जोड्या, असंख्य प्रपात-झरे, र्दयार्खोयांमधून दिसणारे अवर्णनीय दृश्य, घाटमाथ्यावरुन दिसणारे तळकोकण आणि निरव शांतता मिळवण्यासाठी आंबोली हा उत्तम पर्याय आहे.
दोन दिवसांच्या आंबोली भेटीत अनेक गोष्टी पहावयास मिळतात. या सुंदर स्थळाला एकदातरी भेट द्या. लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वर्-पाचगणी सारखेच मात्र निसर्गाच्या अधिक जवळ नेणारे हे स्थळ आहे. उन्हाळ्यासह सर्वच ऋतूत येथील हवामान आल्हाददायक असते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने येथे पर्यटकनिवास बांधला आहे याखेरीज वनखात्याचे विश्रामगृह व इतर अनेक खाजगी हॉटेल्स येथे उपलब्ध आहेत.